शांता शेळकेंनी अश्लिल गाणं लिहिलं होतं? दादा कोंडकेंना ठाऊक होतं.....

दादा कोंडके हे नाव जरी उच्चारलं तरी आजही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नकळत एक स्मित हास्य येतं. त्यांच्या सिनेमातले संवाद किती द्विअर्थी असत याबद्दल न बोललेलच बरं... त्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांसोबत त्यांच्या बैठकांवर बैठका होत असतील यात काही प्रश्नच नाही. त्यांच्या या बैठकीतला एक किस्सा त्यांनी पत्रकारांसोबत शेअर केला होता तो एका मासिकात छापुन सुध्दा आला आहे. काय होता हा किस्सा जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.....

Update: 2022-06-03 07:57 GMT

दादा कोंडके दर मे महिन्यात मुंबईतून काही निवडक पत्रकारांना सोबत घेऊन गोव्याला जायचे. रोज काही काळ त्यांच्यासोबत घालवायचे. गप्पांची रसाळ मैफल रंगायची. त्यांच्या आयुष्यातल्या अशा शेवटच्या गोवावारीत त्यांचा सहवास लाभला होता. त्यांच्या तोंडूनच ऐकलेली ही माहिती.

दादांच्या सिनेमांवर द्व्यर्थी संवाद आणि गीतांमुळे सेन्सॉरची कैची चालायची आणि एकेक कट रद्द करून घेण्यासाठी दादा तुफान आवेशाने लढायचे. दादांचे अफलातून युक्तिवाद ऐकण्यासाठीच तत्कालीन सेन्सॉरवाले कट सुचवत असावेत, अशी शंका येते.

दादांच्या एका गाण्यात खंडाळ्याच्या घाटात वाटेत बोगदा लागतो, या अर्थाच्या ओळीत बोगदा याच शब्दावर आक्षेप आला. हा शब्द बदला, असं सांगितलं गेलं.

दादा म्हणाले, पण हे तर भूगोलाच्या पहिलीतल्या पुस्तकातसुद्धा सामान्यज्ञान म्हणून छापलेलं आहे. यात अश्लील काय आहे?

सेन्सॉर सदस्या म्हणाल्या, तो बोगदा हा शब्द अश्लील आहे.

दादा म्हणाले, त्यात काय अश्लील आहे?

त्या म्हणाल्या, ते सांगता येणार नाही. पण, शब्द बदला.

दादा म्हणाले, बदलतो, पण तुम्ही बोगदाला मराठी प्रतिशब्द सांगा.

त्या बाईंनी आणि इतर सदस्यांनी बराच वेळ डोकं खाजवलं, पण प्रतिशब्द काही सापडला नाही.

दुसऱ्या एका वादाच्या वेळी दादा म्हणाले, अश्लीलता तुमच्या डोक्यात आहे. दादाचा सिनेमा म्हणजे डबल मीनिंग हे तुम्ही धरून चालता आणि मग माझ्या सिनेमातल्या निरागस संवादांवर आणि गाण्यांवर कैची चालवता. तुमच्या लाडक्या, सोज्वळ (त्या वेळी बहुदा सेन्सॉर सदस्य असलेल्या) शांता शेळके बाई अश्लील गाणी लिहितात, तेव्हा कसं चालतं तुम्हाला?

हा गुगली भारीच होता.

शांताबाईंनी कोणतं अश्लील गाणं लिहिलंय, असं सेन्सॉर सदस्यांनी संतापून विचारलं.

दादांनी घरकुलमधलं हाऊस ऑफ बँबू गाऊन दाखवलं. म्हणाले, बांबूच्या वनात फिरायला हवे, बांबूवरती बसायला हवे, वगैरे मी लिहिलं असतं, तर फाडून खाल्लं नसतं का तुम्ही मला!

सेन्सॉरवाले अर्थात निरुत्तर!

दादा उगाच चावटपणा कशाला करता, असं जेव्हा एका सदस्याने विचारलं, तेव्हा दादा उत्तरले, अहो, थोडा चावटपणा आवश्यक आहे आयुष्यात. तुमच्या आईबाबांनी चावटपणा केला नसता, तर तुमचा जन्म झाला असता का?

Tags:    

Similar News