सरकारी माध्यमं असलेल्या सह्याद्री वाहिनीवरून अंधश्रद्धा पसरवली जात आहे का?
सरकारी माध्यमं असलेल्या सह्याद्री वाहिनीवरून अंधश्रद्धा पसरवली जात आहे का? अध्यात्मिक गुरु डॉ. सुनील काळे यांनी सरकारी माध्यमांवर वैज्ञानिक दृष्टीकोन मांडण्याऐवजी अशा मुलाखती दाखवून समाजात काय पसरवू पाहत आहे? नक्की काय आहे ही मुलाखत? डॉ. निशिगंधा वाड यांनी घेतलेल्या मुलाखतीचा ओमकार शिरळकर यांनी घेतलेला समाचार नक्की वाचा
रविवारी गोडधोडाचं जेवण करून टीव्ही लावावा आणि काहीतरी विनोदी बघायला मिळावं या सारखं सुख नाही. सह्याद्री वाहिनीवर आत्ताच बघितलेल्या अध्यात्मिक गुरू डॉ. सुनील काळे यांच्या मुलाखतीनं जीवनाचे आरस्पानी दर्शन तर घडलेच शिवाय हसून हसून पोटात दुखायला लागले. पेशाने डॉक्टर असलेले काळे कुठलीतरी चॅरिटेबल संस्था चालवतात आणि आध्यात्मिक लेक्चर वगैरे देतात. दुपारची झोप उडवण्याची ताकद त्यांच्या विश्लेषणात आहे.
सदर मुलाखतीतून अनेक नवीन गोष्टी समजल्या. लाखो लहान मुलांनी प्रार्थना केल्याने आपली ऊर्जा कमी करणारा सूर्य, पाकिस्तानमध्ये ज्याच्या दर्शनाने महिलांची अबोर्शन होतात. म्हणून झाकून ठेवलेला नरसिंह, आपल्या स्टेजचा आकार अष्टकोनी ठेवल्यामुळे लोकप्रिय झालेला शेक्सपिअर असे अनेक अध्यात्मिक अनुभव ऐकायला मिळाले.
गुरुतत्व म्हणजे काय?
असा प्रश्न विचारताच डॉ. काळेंनी चक्क व्हर्लपूल वॉशिंग मशीनची जाहिरात म्हणून दाखवली आणि त्या आकाराला गुरुतत्व म्हणतात असे सांगितले. कॉसमॉस, ब्लॅक होल, इव्हेंट होरायझन, आईन्स्टाईनचा सिद्धांत याचे अध्यात्माशी असलेले नाते उलगडून दाखवल्यावर मुलाखतकार डॉ. निशिगंधा वाड या तर सद्गतीतच झाल्या होत्या! हे कमीच की काय म्हणून बोलण्याच्या भरात डार्विनचा सिद्धांत देखील डॉ. काळेंनी साफ खोडून काढला!
इच्छाशक्तीचा प्रभाव यावर बोलताना डॉ. काळे एक इरसाल अनुभव सांगतात.
"आत्ता मी स्टुडिओत आहे. समजा नागपुरी संत्राबर्फी खाण्याची माझी इच्छा होते. घरी जाऊन पोचतो तोच कोणीतरी नागपूरहून कुरिअरने पाठवलेली संत्राबर्फी घरी पोचलेली असते. हे कसं काय होतं ? तर इच्छाशक्ती भूतकाळात जाऊन काम करतात. मारुती स्तोत्रात हेच सांगितलं आहे. मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे! मन मागे जाते, भूतकाळात इच्छा पूर्ण करण्यासाठी!" त्यांचे हे विवेचन ऐकून मारुती स्तोत्र लिहिणाऱ्या रामदास स्वामींनी देखील डॉ. काळेंनी गुरू केलं असतं!
एक किस्सा तर अगदीच भन्नाट होता.
एका प्राध्यापक बाईंची पीएचडी पदवी अडकली होती म्हणून डॉ. काळे गुरुजींचे मार्गदर्शन घ्यायला त्या बाई आल्या. आपल्या कर्मात काही खोट आहे का असं वाटल्याने त्या निराश झाल्या होत्या. "तुमच्या सासूबाईंची तुमच्या हातून चहा पिण्याची इच्छा होती, ती अपूर्ण राहिली" असे निदान डॉ. काळे यांनी केले आणि त्या बाईंचा अडथळा दूर झाला. डॉ. काळे ग्रेटच. सासूबाईंना चहा पाजून पीएचडी पदरात पाडणाऱ्या ताई त्याहून ग्रेट आणि अशा महान माणसाची ओळख आपल्याला करून देणाऱ्या डॉ. निशिगंधा तर ग्रेटेस्ट म्हटल्या पाहिजेत! एकेकाळी पुलं वगैरे येऊन गेलेल्या 'प्रतिभा आणि प्रतिमा' या कार्यक्रमाला त्यांनी वेगळ्याच उंचीवर नेले आहे.