#InternationalWomensDay ; एक दिवसाचं आईपण...!
'तुला घरात काय काम असतं' असं अनेक वेळा पुरुषांकडून आईला, बायकोला किंवा आजीला कधी ना कधी तर सुनावलेल असतंच. मात्र ज्यावेळी घरची सर्व काम करून मुलाला सांभाळण्याची जबाबदारी स्वतःवर येते त्यावेळी आपल्यामध्ये असलेला पुरुषी अहंकार कसा कुठच्या कुठं गायब होतो वाचा पत्रकार सुनील भोंगळ यांनी शेअर केलेला त्यांचा अनुभव… एकदिवसाचे आईपण पुरुषांना जड होते मात्र महिला आयुष्यभर हे आईपण जबाबदारीने आणि तितक्याच संयमाने सांभाळतात असतात.;
आज सकाळी घरात खूप लगबग होती आणि माझ्या मनात विचारांचं काहूर होत, कारणही तसंच होतं. एरवी घरात मुलावर छोट्याशा कारणावरून जरी बायकोने सक्ती केली तर ओरडणारा मी, आज दिवसभर मला माझ्या मुलाचं आई व्हायचं होतं. केवळ घरात बसून त्याला खाऊ पिऊ घालणंच नाही तर दिवसभरातील माझी सर्व कामं सांभाळून त्याला सांभाळण्याची जबाबदारी आज माझ्यावर होती.तसं काल रात्री जेवतांनाच मनात विचार सुरू होता जमेल का मला? माझी कामं कशी होतील? पण मग मनात विचार आला बायको मुलाला सांभाळून क्लासेस घेऊ शकते, त्याचवेळी आपल्याला सर्व गोष्टी हातात देऊ शकते तर काय हरकत आहे आज आपण थोडं जास्त काम करायला
आज बायकोची एक परीक्षा असल्याने दिवसभर तिला घराबाहेर राहावं लागणार होतं, आणि मला माझी कामं सांभाळून मुलाला सांभाळायचं होतं. पण, जेंव्हा प्राथमिक शाळेत शिकत होतो तेंव्हा शाळेतील शिक्षिका थोरात मॅडम कधी कधी त्यांच्या लहान मुलाला शाळेत घेऊन यायच्या तो प्रसंग आठवला, मॅडम या वर्गातून त्या वर्गात शिकवायला जायच्या आणि त्यांचा मुलगा त्यांच्या मागे मागे असायचा, शाळेतीलच दुसऱ्या शिक्षका भालेराव मॅडमला तर शाळेतील पडवीत झोळी बांधून बाळाला त्यात झोपवायांच्या आणि त्यांचं कामं करायाच्या. तसाच काहीसा प्रकार आज माझ्यासोबत घडणार होता. मात्र, पत्रकारिता करताना मुलाला फिल्डवर घेऊन जाणं जरा कठीणच होतं.
आज अहमदनगर भरोसा सेलच्या वतीने 'निर्भया न्याय दिना' निमित्त एक मोहीम हाती घेण्यात आली होती, ते कव्हर करण्यासाठी मला जावं लागणार होतं, 'निर्भया'ची बातमी करताना माझ्या मनात 'भय' होतं. एरवी बाळासह कुठे बाहेर जायचं असेल तर बायको त्याला काय हवं नको ते तिच्या पर्समध्ये घेत असायची. मग दिवसभर त्याच्यासाठी खाण्याच्या गोष्टी , पिण्याचे पाणी वैगरे..आज मी देखील गाडीत त्याला हव्या त्या गोष्टी सोबत घेतल्या अगदी त्याच्या काही खेळण्या देखील सोबत घेतल्या आणि आम्ही फिल्डवर पोहचलो. माझ्यापुढे आणखी एक समस्या होती ती म्हणजे मुलाला पोलिसांची प्रचंड भीती वाटते आणि मी जी न्यूज कव्हर करण्यासाठी जाणार होतो तिथे पोलीसच असणार होते , मग त्यांना बघून तर मुलगा आपल्याला कामच करू देणार नाही याची मला चिंता होती. एका हातात बुम वैगरे घेऊन, एका हातात मुलाला घेऊन फिल्डवर पोहचलो अपेक्षेप्रमाणे पोलिसांना पाहून मुलाने रडायला सुरुवात केली, कसं बस त्याला समजावत एका खुर्चीवर बसवलं, आणि काम सुरू केलं पण अवघ्या 10 मिनिटांत त्याने 'मला मम्मी पाहिजे' म्हणून आरोळी ठोकली...मग ,मात्र माझी एकच धांदल उडाली. कसं बसं त्याची समजूत काढली आणि तेथील कार्यक्रम आटोपून पुढच्या कार्यक्रमासाठी निघालो पण, त्यात त्याचा रस्त्यात एकच सूर होता 'मम्मी कुठंय?'. मुलाला घेऊन काम सुरू करून 15 ते 20 मिनिटं देखील झाली नसतील, त्यातच माझ्या नजरेसमोरून त्या सर्व महिला येऊन गेल्या ज्या आपल्या बाळाला सोबत घेऊन काम करतात, मग अगदी लहान बाळाला पाठीवर बांधून ऊसतोड करणाऱ्या महिला ते चंदीगड येथे आपल्या 2 महिन्याच्या बाळाला कडेवर घेऊन ड्युटी करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबल...गाडी चालवताना मनात एकच विचार सुरू होता कसं करतात महिला हे सर्व? अगदी सकाळी उठल्यापासून बाळाचे , स्वतःचं आणि नवऱ्याचं आवरून दिवसभर बाळाला सांभाळत कामं पण करायचं, खरं तर माझी पहिल्या 15 ते 20 मिनिटांतच चिडचिड व्हायला लागली होती. पण ठरवलं होतं की नाही आपल्याला हे करायचंच आहे. दुसऱ्या ठिकाणी न्यूज कव्हर करायला गेलो.एका हातात माझं सर्व साहित्य दुसऱ्या हातात बाळ आणि स्टेजवरील सर्व लोकं माझ्याकडे बघत होते, सर्व कठीण होतं...त्यात मुलाच्या 5-5 मिनिटाला वेगवेगळ्या डिमांड असायच्या कधी त्याला हत्ती पाहिजे असतो तर कधी स्पायडरमॅन... त्यात मधून-मधून 'मम्मी कुठंय' चा जप सुरूच होता. न्यूजसाठी मला आवश्यक अँगलने शॉट्स घ्यावे लागणार होते, त्यामुळे माझी पुरती सर्कस उडाली होती. एरवी तोंड वर करून 'तुला घरी तरी काय काम असतं' म्हणणारे आम्ही पुरुष एक दिवस घरची सर्व कामं करून मुलांना सांभाळत स्वतःच कामं करायची वेळ आली की किती चिडके होते याचा अनुभव मला आला होता. पण, त्रागा करायला बायको जवळ नव्हती.
त्यात माझ्या सुदैवाने बराच वेळ पोलिसांना बघून मुलगा काहीसा शांत झाला. पण त्याला भूक लागली मग गाडीत नेऊन त्याला खाऊ घातलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो पण रस्त्यात त्याने हत्तीचा पुतळा बघितला आणि मग काय बालहट्ट...! हत्तीवर बसायचंय! , एक तर पुढे जाण्याची घाई त्यात मुलाने केलेला हट्ट, पण मन शांत ठेवत त्याला हत्ती जवळ घेऊन गेलो. तेंव्हा विचार केला बायकोचा क्लास सुरू असताना मध्ये मध्ये ती त्याचे हट्ट देखील पुरवते. त्यात क्लासकडे लक्ष कमी होऊ देत नाही. इथे आमची तासाभरात फरपड झाली होती. माझी सर्कस लक्षात घेऊन अहमदनगर भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी API पल्लवी देशमुख आणि इंगवले मेजर यांनी आधी, तुम्हाला बाईट देतो मग पुढच्या कार्यक्रमाला जातो म्हणून थेट गाडी त्यांच्या कार्यालयाकडे नेली. कार्यालयात जाताना माझ्या हातात साहित्य आणि बाळाला बघून कार्यालयातील कर्मचारी आणि तिथे आपली कामं घेऊन आलेली लोकं माझ्याकडे बघत होती. कार्यालयात बाईट घेतल्यावर मी बाहेर पडलो , भरोसा सेलचे ते कार्यालय असल्याने, तिथे कौटुंबिक वाद घेऊन आलेल्या अनेक महिला बसलेल्या होत्या. मनातून त्या प्रत्येक महिला भगिनींना सलाम करावासा वाटला, कारण 'एक दिवसाचं आईपण' मला जड झालं होतं , पण माझ्या नजरेसमोर अशा अनेक माता होत्या ज्या आयुष्यभर हे 'आईपण' जबाबदारीने आणि तितक्याच संयमाने सांभाळत असतात. दुसरा विचार होता की, या 'भरोसा सेल' मध्ये कौटुंबिक वाद घेऊन आलेल्या काही महिला या ही कारणाने येथे आल्या असतील की, मुलांवरून त्यांच्यात वाद झाले असतील. पण छोट्या- छोट्या कारणांवरून बायकोशी वाद घालणाऱ्या पुरुषांना एक विनंती आहे की, एक दिवस बाळाची शी-शू करून बघा. तुमच्यातील अहंकार कुठे जाईल तुम्हालाच समजणार नाही. "आई म्हणजे आई असते
तिला सर्व गोष्टींची घाई असते" अशा ओळी कुठंतरी वाचण्यात आल्या होत्या. लेकराच्या ओढीने बायकोचा ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास आधीच 'घ्यायला या' असा फोन आला, स्वाभाविक मुलाच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता कारण बाप कितीही हट्ट पुरवत असला तरी शेवटी आई ती आई असते.
- पत्रकार सुनील भोंगळ