एकतर्फी प्रेमाची मानसिकता काय?
I LOVE YOU म्हणजेचं प्रेम असतं का? एकतर्फी प्रेम म्हणजे काय? ही मानसिकता कुठून कशी तयार होते? भावनांच्या वादळात अडकून तुम्ही गुन्हा किंवा आत्महत्या करण्याचा विचार करत असाल तर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटील यांचा लेख नक्की वाचा...;
एकतर्फी प्रेमातून खून करणे चालूच आहे ! एकतर्फी प्रेम हे खूपच कॉमन आहे.
जेव्हा तुम्ही आम्ही वयात येतो तेव्हा आपल्याला कोणी ना कोणी तरी आवडतं आणि तेव्हा या आवडण्याचा त्या व्यक्तीला पत्ताच नसतो ! आपल्याला हे सांगायचं असतं की, "आय लव यू". पण पहिला प्रश्न मनात निर्माण होतो.
तिला किंवा त्याला ते आवडेल का? आणि मग दीर्घ काळ आपण एकतर्फी प्रेमाचे रंग स्वतःच्या मनात उधळत राहतो. तिचा किंवा त्याचा वावर मनातून हवाहवासा वाटू लागतो. समोरच्याची कृती आपल्यासाठीच आहे असं मनात दाटून येऊ लागतं. समोरची व्यक्ती आपल्यासाठीच बनलेली आहे असे आपणच ठरवून मोकळे होतो. समोरचीचा मनमोकळेपणा आपल्यासाठीच आहे हे गृहीत धरू लागतो.
आपली मैत्री एवढी घनदाट आहे की समोरची व्यक्ती आपणास नाही म्हणूच शकणार नाही असे आपणच घोषित करतो. खरंतर या सगळ्या आपणच तयार केलेल्या भ्रामक समजुती असतात आणि आपण समोरच्या व्यक्तीला विचारून आपल्या या समजुती बरोबर आहेत की चूक हे नीट व्यवस्थित विचारतच नाही. किंवा विचारलं तरीही समोरच्या व्यक्तीचं उत्तर आपल्याला पटत नाही !
काहींना प्रपोज केल्यावर यश मिळतं आणि काहींना नकार मिळतो. नकार मिळतो तेव्हा आपल्या मनात भावना ज्या निर्माण होतात त्या असतात. निराशा, हतबलता, स्वतःला कमी लेखणं, तीव्र चिंता आणि मूड्स चे सैरभैरपण. म्हणजे एकदम प्रचंड दुःख होणे आणि एकदम दुसऱ्या टोकाला जाऊन स्वतःवरच जोरात हसणे.
भावनांचा हा खेळ आपल्याला क्रेझी बनवतो. त्यातून अपराधीपणा टोचू लागतो. आपण केलं ते चूक की बरोबर या हिंदोळ्यावर आपण झोके घेता घेता कधी तरी वाटू लागतं.
"ती माझी नाही तर मग ती कोणाचीच नाही" !
या त्या भावनांचा बाजार सूडाकडे घेऊन जातो.
भावना जेव्हा मनाचा ताबा घेतात तेव्हा त्या विचारांचा खुर्दा करतात, लगदा बनलेल्या विचारातून मग खूनापर्यंत मजल जाते. नकार देणाऱ्याचे सुद्धा काहीतरी म्हणणं असतं...
ज्या व्यक्तीने प्रपोज केलेलं असतं ती व्यक्ती शारीरिक दृष्ट्या आकर्षक नाही... ती रोमँटिक वाटत नाही... ती आपल्या लेव्हलची वाटत नाही... मैत्रीचा गैरफायदा घेते असं वाटतंय... आपण कधीच त्या नजरेनं मैत्रीकडे पाहिलंय असं वाटत नाही... मित्र आणि सहकारी त्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काही दिसतच नाही...
अनेक कारणं असली तरी नकार देणाऱ्याला सुद्धा एक प्रकारचा अपराधीपणा, एक प्रकारचं गिल्टी फिलिंग मनात दाटून येतं. आणि आयुष्यभर बऱ्याच वेळा ते पाठ सोडत नाही! असंही वाटतं आपली फसवणूक झाली..
आपल्या भावनांचा चुकीचा अर्थ काढून आपल्याला वाईट नजरेने पाहण्यात आलं... नकार घेणारा आणि नकार देणारा दोघे भावनांच्या वादळातून प्रवास करत राहतात. हे का घडतं?
एक साधं आणि महत्वाचं कौशल्य आपण विकसित केलेलं नसतं त्याचं हे फळ आहे. ज्याला स्किल ऑफ एक्सप्रेशन म्हणतात, ते वयात आल्यानंतर फक्त आय लव यू एवढ्यापुरतंच म्हणायला वापरल जात!!
विवेकी व्यक्त होणं हे एक कौशल्य आहे. ते नकार देणारा आणि नकार घेणारा या दोघांनीही शिकणे आवश्यक आहे. विवेकी व्यक्त होणे हे जर शिकलं नाही तर आपण पारंपारिक रित्या व्यक्त होतो आणि पारंपारिकरित्या त्याचे परिणाम पण बघतो. खून हे पारंपारिक व्यक्त होण्याचं अपत्य आहे.
जवळपास 98% लोकांनी एकतर्फी प्रेमाचा आयुष्यात एकदातरी हा अनुभव घेतलेला असतो. हायस्कूल आणि कॉलेज मधील वयोगटात याचं प्रमाण सर्वाधिक असतं. सामान्यतः एकतर्फी प्रेम "क्रश" या शब्दातून व्यक्त केलं जातं. बहुसंख्य एकतर्फी प्रेमात दुसऱ्या व्यक्तीला प्रेमाचा पत्ताच नसतो.
'फ्रस्ट्रेशन अट्रॅक्शन' नावाचा एक प्रकार आहे. ज्यांचे ब्रेकअप झाले आहेत अशांना डिप्रेशन आलेले असते. आणि मग अशा व्यक्ती लगेच जवळच्या दुसऱ्या व्यक्तींवर प्रेम करून आपले डिप्रेशन घालवण्याचा प्रयत्न करतात.
एकतर्फी असो किंवा दुतर्फा असो प्रेमात पडल्यावर मेंदूत रसायने पाझरू लागतात. त्यातील डोपामिन आणि नाॅरएपिनेफ्रिन हे डोकं भन्नाट करून सोडतात. प्रेमाशिवाय दुसरा विचारच ते काही करू देत नाहीत! आणि मग या रसायनांची जी किक बसते ती पाठ सोडायला तयार होत नाही. आणि ही किक एकतर्फी प्रेमात नंतर ही हिंसेमध्ये रुपांतरीत होते. आत्महत्या किंवा खून हे या रसायनांच्या आहारी गेल्याने घडत राहतात. युफोरिया किंवा अत्यानंद मग तो कसा का असेना मिळवायचाच अशी जेव्हा मानसिकता तयार होते तेव्हा एकतर्फी प्रेमातील नकार हिंसेला उद्युक्त करतो.
काहीवेळा फसवाफसवी देखील घडते. समोरची व्यक्ती तिच्या स्वार्थासाठी आपल्या प्रेमात पडली आहे असे दाखवतेय असे कळते तेव्हा हिंसेने त्याचा शेवट होतो.
खरंतर एकतर्फी प्रेमात आहोत हे सहज ओळखता येतं. म्हणजे असं....
समोरची व्यक्ती गोंधळल्यासारखे प्रतिक्रिया देत राहते.
समोरच्या व्यक्तीला तुम्ही प्रेमात आहात असे सांगत राहत आहात पण ती त्यावर एक अवाक्षर बोलत नाहीये. तुम्ही शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहात आणि तेवढ्याच तीव्रतेने ती त्याला नकार देते किंवा कानउघडणी करते.
तुम्ही ज्या पद्धतीने प्रेम करता त्या प्रेमात दम नाही किंवा त्याच्यात दोष आहेत हे समोरची व्यक्ती सांगत राहते. तुम्हाला जाणून घेण्याची कोणतीही तसदी इच्छा किंवा ओढ समोरची व्यक्ती दाखवत नाही.
....तेव्हा समजावे आपले प्रेम एकतर्फी आहे आणि शांतपणे बाजूला व्हावे.
प्रेम म्हणजे काय याचा नीट अभ्यास जर केला नसेल तर प्रेमाच्या परीक्षेत आपण निश्चित नापास होणार. माझ्या गेल्या पंचवीस वर्षांच्या अनुभवातून यासाठी 'मी प्रेम म्हणजे काय?' हे पुस्तक लिहिले ज्यातून असे लक्षात आले की प्रेमात पडताना प्रेम म्हणजे काय याची जाणीव शून्य असते. आणि त्यातूनच प्रेमरोग व प्रेमविकृती तयार होतात. प्रेमात पडण्याअगोदर प्रेम या भावनेची ओळख करून घेणे हास्यास्पद समजले जाते. आणि तीच मोठी अंधश्रद्धा नंतर जीवघेणी ठरते हे लक्षात ठेवले तरी पुरे !!
- डाॅ. प्रदीप पाटील, मानसोपचारज्ज्ञ