बापमाणूस असलेली माझी आई – वैभव छाया
हा लेख वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या आई वडिलांना घट्ट मिठी मारल्याशिवाय राहणार नाही. मायेच्या ओलाव्याने गदगद करणाऱा वैभव छाया यांचा लेख वाचल्यानंतर कमेंट करायला विसरु नका...;
फादर्स डे च्या पोस्ट पाहून मन खूप आनंदून जात होतं. बाप नावाची किमया आहेच अफाट. फादर्स डे ला आपणही पोस्ट लिहावी का हा पीअर प्रेशर मला कधीच आला नाही. तसं पाहीलं तर कधीच कोणत्याही घटनेसाठी किंवा औचित्यासाठी कसलाच पीअर प्रेशर मी आजवर बाळगला नाही. यापुढेही तो कधीच बाळगणार नाही ही पक्की खात्री आहे.
कौटुंबिक कलहात पिचलेल्या आईला नियतीने तिला तिच्या संसाराच्या सुरूवातीच्या काळात दुष्टपणाचीच वागणूक दिली. तिनं काही केलं असेल अथवा नसेल ही पण साधी शाबासकीची पाठीवर थाप ही कुणाकडून मिळाली नाही. लौकिकार्थाने आई आणि बाप दोघेही कधी कोणत्या चळवळीत सामील नव्हते, ना कोणत्या संघटनेत. गेलाबाजार कोणत्या पक्षाचं सभासदस्यत्व ही कधी नव्हतं. बाप गावाहून आला तोच नोकरीच्या शोधात. नोकरी मिळालीही. लग्नही झालं. पण अन्नपाण्यासाठी संघर्ष करणारी समष्टी दोघांच्याही वाट्याला कधीच चूकली नाही. आपण त्या समष्टीचे एक घटक आहोत. हे त्यांच्या ध्यानी मनीही नसेल. पण ते दोघे वाहक होते हे निश्चित. बापानं गाडा मध्येच सोडला. पण आई धीराने उभी राहिली.
आई जास्त वाहक होती. ती गाडा वाहत राहिली. बापानं वारसा म्हणून जे काही दिलं ते सर्व आईनं आपल्या वाट्याला ओढून निभावलं. बापानं दिलेला त्रास, अवहेलना, अफाट कर्ज, ससेहोलपट अन् बरंच काही. आईनं त्याच्या कर्माची वाटेकरी होतं सर्व काही निभावलं. कर्ज फेडून काढलं. त्याच्या नावावर बसलेला कर्जाचा डागही तिनं पुसून काढला. सात आठ गर्भ गमावावी लागली तिला. ती गमावली नसती तिनं. पण झालं. बापानं ते ही दान तिच्या पदरात टाकून दिलं. परांगदा झाला तो कायमचाच. तीच माझी आई.. तीच माझा बाप झाली.
लहान वयात सातत्याने प्रश्नांचा भाडीमार असायचा. वडील कुठे काम करतात. कुणी विचारत नव्हतं. आई कुठे आणि काय काम करते. माझं उत्तर ठरलेलं असायचं. वडील नाहीत. प्रतिप्रश्न असायचा.. वारलेत का ते? मी आपलं खोटं उत्तर टेकवायचो. हो वारलेत. आजारी होते. आज वयाच्या ३३ व्या वर्षांत उभा असताना मला माझ्या बापाचा चेहराही आठवत नाही. साधी मेमरीही आठवत नाही.
२००४ साली झालेल्या दोन पुसट भेटी आठवतात. त्याही एकदम त्रयस्थासारख्या भेटी होत्या. २०१३ साली झालेली भेट नीट आठवते. जेव्हा रागाच्या भरात कानफडवलं होतं बापाला. ते वय नादान होतं. राग डोक्यात होता. म्हणून स्वतःवर ताबा ठेवू शकलो नव्हतो. त्यानंतर कधीच भेट झाली नाही.
बापाचा चुलत भावाशी संपर्क होता. गेल्या चार पाच वर्षांत त्यालाही एक फोन आलेला नाही. भाऊ म्हणाला कदाचित काका ऑफ झाले असतील. मी ऐकलं... एक दीर्घ उसासा सोडला. आणि... शांत झालो. मला शेवटपर्यंत एकच जबाबदारी ओझ्यासारखी वाटत राहीली होती.
जर का आज उद्या कधी मधी खबर आली तर शेवटची माती नीट करावी लागेल. उभं राहून करून घ्यावी लागेल. खैर.. बापाने ती ही वेळ येऊ दिली नाही यातच त्याचे आभार मानावे तितके थोडे आहेत. तशी जबाबदारी कधीच त्यानेही स्वीकारली नव्हती. म्हणून फिट्टूस व्हावं अश्या पद्धतीने त्याने ती वेळ येऊ दिली नसावी असं मनोमन वाटत राहतं.
आपण ज्या मुलाला जन्म दिला तो मुलगा कसा राहत असेल, कसा शिकत असेल, त्याची आई त्याला कशी वाढवत असेल याचा कधी विचारही आला नसावा का? मी लहानपणापासून भयानक आजारपणातून गेलोय. ती स्थिती त्याला ठाऊक नव्हती असे नाही. सर्व काही ठाऊक होतं. तरी कधी साधं विचारण्यासाठी देखील येण्याची तसदी घ्यावीशी न वाटणाऱ्या माणसाबद्दल का म्हणून ममत्व निर्माण होईल हा ही प्रश्नच आहे.
बाप हुशार होता. त्याचे मित्र सांगायचे. वयाच्या २४ व्या वर्षी रेल्वेत सुपरवायजर होता तुझा बाप. पाठांतर चांगलं होतं. पत्त्यांचा नाद होता. पत्त्यांच्या जादू यायच्या. जादू म्हणजे खेळ. नंतर या पत्त्यांनीच त्याचा खेळ केला. दारू रक्तात भिनली होती. जोपर्यंत अपडेट यायच्या तोवर हे कळून चूकलं होतं आता दारू या माणसाला प्यायला लागली आहे.
माणूस हुशार होता. पण हिम्मतवान नव्हता. कुटूंब पुढे हाकण्याचं कसब आणि बळ दोन्ही नव्हतं. प्रेम आणि करूणा अर्पण करू शकेल अशी दानत नव्हती स्वभावात. त्याचं फळ मिळालं त्याला. माझा जन्म झाला आणि घर दार (जे स्वतःचं नव्हतं ते सर्व सोडून) जबाबदाऱ्या सोडून तो निघून गेला. कधी इलेक्ट्रीशनचं काम कर, कधी वेटरचं काम कर असले बरेच उद्योग केले. योगायोगानं एकदा मलाच सुप सर्व केलं होतं ऐरोलीच्या हॉटेल मध्ये. नजरानजर झाली. त्याची बोलण्याची इच्छा असावी असं वाटलेलं मला. पण त्यानं बोलण्याची हिम्मत केली नाही.
पण एक खरं... मी कायम बापाला आभार देत राहीन, धन्यवाद देत राहीन. त्यानं कसंही का वर्तन केलं असेना.. जरी ते अक्षम्य असलं तरी... आज त्या परिस्थितीमुळे मी आणि आई फार वेगळ्या पद्धतीने उभे आहोत. आयुष्यातून सर्व काही गमावून बसलेली आई फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा उभी राहीली.
लग्न-संसारात कधी स्वतःचं घर न मिळालेल्या बाईनं एकावर एक करत तीन घरं घेतली. तीन कार घेतल्या. वयाच्या ३६ व्या वर्षी नव्याने शिक्षणाला सुरूवात केली. नोकरी काबीज केली. मानासन्मानाने ती नोकरी २५ वर्षे पूर्ण केली. माझं आजारपण काढलं. मला घडवलं. मला अशा काबील बनवलं की मी आज अजून चार लोकांसाठी काही तरी भरीव काम करू शकेल.
मी आज जो काही आहे तो तीच्याच मुळे आहे. आईला जास्त बोलता येत नाही. ती बोलतही नाही. कर्तृत्ववान माणसं खुप कमी बोलतात. माझी आई कर्तबगार बाई आहे. ती कधीच खचली नाही. परिस्थितीसमोर तिनं हात टेकले नाही. पण हे सगळं सांगताना बोलताना बापाचं आभार जरूर मानावंसं वाटलं. कारण तो जर नीट वागला असता तर कदाचित आईला नव्याने जन्मून उभी राहण्याची, संघर्षाची जिद्दही कधी दाखवता आली नसती.
आईचं मोठेपण सांगताना बापाचं नालायकपण सांगणं कधी तोंडावर आलं नाही. तशी गरज वाटली नाही. तसं करणं हा माझा करंटेपणा ठरला असता. आईनं मला ज्या करूणेची शिकवण दिली त्या शिकवणूकीचा तो अपमान ठरला असता. द्वेष हलक्या मनाची आणि क्षुल्लक बुद्धीची माणसं करतात. प्रेम मोठ्या मनाची माणसं करतात. हेच ती मला सांगत आली. शिकवत आली. मी शिकत आलो. आज माझं जे काही आहे ते सर्व तिचंच आहे. तिनंच मला दिलेलं आहे. अगदी माझं वैभव छाया असणं ही तिचंच देणं आहे. बाकी काही नाही.
बापानं मला जन्म दिला माझ्यासाठी हेच पुरेसं राहील. पण, बाप काय असतो, कसा असतो हे मला ठाऊक नाही. बाप नावाचा माणूस मला माहीत नाही. पण बापाचा बाप होऊन जगणाऱ्या मुलांच्या बापपणाचा मनमुराद सहवास लुटतोय. बक्कळ आनंद असतो त्यात. त्या आनंदाची शिदोरी जन्मासाठी पुरेशी असते. पण आईच्या बाबतीत तसं नसतं. कोणी म्हणेल की मी ग्लोरीफाय करतोय तर म्हणू द्यात. माझ्याकडून तेच होईल. कारण माझ्यासाठी बाप ही व्यक्ती नाही. तर एक संकल्पना आहे. साध्या शब्दात सांगायचं तर एक प्रॉडक्ट आहे. ते मला फक्त झगमग करून विकता येऊ शकतं. रेखाटता येणार नाही. तेवढी ताकद, अनुभव, अनूभूती नखाएवढी सुद्धा माझ्या ठायी नाही.
बापाबद्दल आयुष्यात लिहीलेलं हे पहिलं आणि शेवटचं. कदाचित तो माणूस या जगात नसेलही. पण त्याचा अपमान व्हावा म्हणून लिहीलं आहे असंही नाही. मी काही फिल्मी नाही. अजय देवगनच्या गैर, नाजायज टाईप इंप्रेशन मध्ये येऊन लिहावं इतकाही नाटकी नाही. वाटलं म्हणून लिहीलं असाही भाग नाही. बाप बनणं सोपी गोष्ट नसते. बापपण निभावणं त्याहून कठिण गोष्ट असते. माझ्या बापानं तेवढी हिम्मत दाखवली असती तर कदाचित मी अजून दहा डोंगरं वर चढलेलो असतो.. लेकीन करे क्या..
यही जिंदगी है... तक्रार न करता, दोषारोप न करता जगण्यातच खरी मजा असते.
सर्वांना फादर्स डेच्या उशीराच शुभेच्छा. बाप जवळ असेल तर घट्ट मिठी मारून घ्या.