गोधडी : मायेचं अस्तर

Update: 2023-11-21 09:45 GMT

माणूसपणा जिथून सुरू झाला तिथूनच माणसाने स्वत: उभारलेली संस्कृती जपण्याची माणसाला इच्छा झाली. मग अनेक कला, साहित्य, कौशल्ये, विद्या वगैरेंना मौखिक, कायिक आणि वाचिक परंपरेतून जपण्यासाठी माणसं तोशीस घेऊ लागली. असंच एक कौशल्य ज्याचे धागेदोरे अगदी ख्रिस्तपूर्व शतकांमध्ये जाऊन पोहोचतात, ते म्हणजे रजई किंवा वाकळ विणण्याची कला. याची आपल्याकडे अनेक रूपं सापडतील; भारतातील विविध भाषांमध्ये दोहर, बोंथा, लेप, बालापोश, हासिगे, रजाई अशा कित्येक नावांनी ओळखलं जाणारं इंग्रजीतलं हे क्विल्ट. घराघरात आवर्जून सापडेल असं हे पांघरूण. पण पांघरूणांच्या कांबळ, दुलई, चादर अशा अनेक प्रकारांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आणि आकर्षक असते ती गोधडीच. नाव ओबडधोबड वाटत असलं तरी त्यात कलाकुशल आजीच्या हातांनी मायेची उब भरलेली असते. त्यामुळे आपल्याकडे गोधडीला मायेचं पांघरूण म्हणून ओळखलं जातं. मात्र पूर्वी गोधडीला कष्टमय जीवनाचं प्रतिक समजलं जायचं, आता गोधडी हे कलाप्रदर्शनाचं आणि व्यवसायाचं नवं माध्यम झालेलं दिसतं.

गोधडी विणण्याचं काम ही एक केवळ कला किंवा ठेवा नाही, तर स्त्रीला तिच्यातल्या गुणांची जाणीव करून देणारी प्रेरणा देखील आहे. ज्यातून अनेकींना आत्मविश्वास आणि आर्थिक आधार मिळालेला आहे. आता पुरूष देखील या कलेत वाकबगार आहेत. प्रसिद्ध साहित्यिका दुर्गाबाई भागवतांना आणीबाणीच्या काळात म्हणजे १९७६ ते १९७७ सालामध्ये तुरुंगवास झाला होता. कोणत्याही विशेष सोयीसुविधा नसणा-या त्या कारागृहाच्या बंदीवासातही दुर्गाबाईंना याच गोधडीने मैत्रिणी मिळवून दिल्या आणि त्यांच्यातील कलोत्सुक मनालाही जिवंत ठेवलं. सामान्य महिला कैद्यांबरोबर राहात असताना त्यांच्याकडून दुर्गाबाई गोधडी शिवायला शिकल्या. गोधडी विणायचं काम हे ख-या अर्थाने आजच्या गावागावातल्या महिला बचत गटांचं आद्यरूप. पूर्वी घराघरात अशी थंडीपावसाच्या गारठ्यात उपयोगी येणारी गोधडी किंवा वाकळ शिवली जायची. मग तेव्हा घरातल्याच बायका मिळून बसायच्या किंवा शेजारणींना एकत्र घेऊन अशा गोध़ड्या शिवल्या जायच्या. घरातल्या बायकांच्या जुन्या साड्यांचे तुकडे या कामी यायचे आणि सुंदरशी गोधडी शिवून तयार व्हायची. गोधडी म्हणजे निरंजनातल्या त्या ज्योतीचं मूर्त स्वरूपच जणू ! ज्योत जशी जळता जळता लख्ख प्रकाश देऊन अंधाराचे चार क्षण दूर करून सर्वांना सहाय्य करते अगदी त्याचप्रमाणे गोधडी असते. घरातल्या स्त्रियांनी वापरलेल्या साड्या अगदी फाटून जाईस्तो त्यांचा आपल्याला उपयोग होतो. आणि यात आजीच्या साड्या असतील तर मिळणारी उब अधिकच मायेची भासते. एखाद्या अत्तराप्रमाणेच मायेची ही उब देखील मनात आणि घरात दीर्घकाळ गोधडीच्या रूपात जाणवत राहाते. सुंदरशा रंगीत रेशमी साड्यांच्या तुकड्यांपासून बनवलेली गोधडी दिसायला तर छान दिसतेच शिवाय अशी प्रेमाने बनवलेली गोधडी मिळवून ती पांघरून झोपण्यासाठी घरातल्या मंडळींमध्येही स्पर्धा असते.




Photo Credit : पिटेझरी गावातील आदिवासी महिला व निसर्गवेध संस्थेमार्फत तयार झालेली गोधडी


गोधडी बनवण्याचं काम ग्रामीण भारताला नवीन नाही पण आज याच गोधडीकडे ग्रामीण महिलांचा रोजगाराचा आणि उन्नतीचा मार्ग म्हणून देखील पाहिलं जातंय. जुन्या कपड्यांच्या रंगीबेरंगी तुकड्यांपासून बनवलेली गोधडी किंवा रजई घरात वापरली जात असते मात्र गृहउद्योग म्हणून ग्रामीण तसंच शहरी भागातल्या महिलांनीही गोधडी विणण्याचं काम स्वीकारलेलं आहे. गावांमधील बचतगटही गोधड्या बनवून विकतात. त्यासाठी कापड कारखाने किंवा घराघरातून जुने-नवीन कपड्यांचे चांगले तुकडे विकत आणून त्यापासून गोधड्या बनवल्या जातात. साधारणत: एक मोठी गोधडी तयार व्हायला एक दिवस ते एक आठवडा लागतो. गोधडीचे स्तर, त्याचं डिझाईन आणि त्यात वापरल्या जाणा-या कपड्यांची संख्या यावर हा अवधी अवलंबून असतो. खरं तर गोधडी म्हणजे रांगोळीप्रमाणेच एक कल्पनाचित्र. आपल्या कल्पनेप्रमाणे कापडी तुकड्यांची जोडणी आणि मांडणी करताना सुंदरशी रचना किंवा चित्रही गोधडीवर साकारता येऊ शकते. अर्थात व्यवसाय म्हटला की त्यातून भावना वजा होतातच. पण काही का असेना, या प्राचीन कलेने आज अनेकींना उदरनिर्वाहाचं साधन मिळवून दिलं आहे. बायका अगदी छंद म्हणून देखील घरगुती स्तरावर गोधड्या शिवण्याचं काम करतात. नागझिरा जंगलाजवळच्या पिटेझरी गावात सौ. अनघा किरण पुरंदरे यांच्या निसर्गवेध संस्थेतंर्गत गावातील कुशल कलाकार आदिवासी स्त्रिया गोधडी तसेच इतर अनेक कापडी वस्तू बनवण्याचं काम करतात. गोधडी म्हणजे फक्त जुन्याच कपड्यातून शिवलेला प्रकार या समजाला त्यांनी छेद दिला आहे. इचलकरंजीवरून खास नवीन सुती मऊ उबदार साड्या विकत आणून त्यातून निसर्गवेधच्या आदिवासी महिलांनी हाताने शिवलेल्या अतिशय सुंदर गोधड्या आज परदेशातही जातात.

भारताच्या सर्व प्रांतांमध्ये गोधडीसारखे पांघरूण शिवलं जातं. हि कला वैयक्तिक कौशल्य आणि कलाचातुर्य यावर अवलंबून आहे. बंगालमधील स्त्रिया ‘कथानाम’ हे गोधडीसारखं पांघरूण तयार करतात. ज्यावर त्या एखादी कथा घेऊन त्यातील मनुष्य, प्राणी, पक्षी, पानेफुले, वेली इ. आकर्षक आकार कापडाच्या तुकड्यांनी तयार करतात. बिहारमध्येही ‘सुजनी’ नावाचं गोधडीसारखं पांघरूण तिथल्या स्त्रिया तयार करतात. गोधडी किंवा कापडाच्या अनेक तुकड्यांनी, अनेक स्तरांनी बनलेलं क्विल्ट हे आज केवळ भारतच नव्हे तर युरोप, आफ्रिका आदी खंडांतील देशांतही आवडतं पांघरूण आहे. गोधडी बनवणं ही एक हस्तकला आहे. ही कला प्राचीन काळातही प्रगत होती आणि गोधडीतून कथा सांगण्याचं कौशल्यही अनेक देशांमधल्या लोकांना अवगत होतं. रोमन आणि अनेक राजवटींमध्ये राजांसाठी खास पद्धतीने रेशीम आणि महागडे धागे, सोनं वगैरे वापरून गोधड्या तयार केल्या जायच्या.

अठराव्या शतकाच्या मध्यात शिलाई मशीनचा शोध लागला आणि गोधडी विणणा-यांना नवं बळ मिळालं. नवनवीन रचना करणं सोपं जाऊ लागलं तसंच गोधडी शिवण्यासाठी हातांना यंत्राची मदत मिळू लागली. वस्त्रोद्योगामध्ये क्रांती झाली पण भारतात हातशिवणीच्या गोधडीचं स्थान अढळ राहिलं किंबहुना ते अधिकच घट्ट झालं. याचं कारण या गोधडीत असणारी आपल्या जीवलगांच्या स्पर्शाची उब. घरातलं कोणी अगदी कायमचं निघून गेलं तरीही त्यांच्या जुन्या कपड्यांतून त्यांची सय नेहमीच आपल्यासोबत राहायची. आजी किंवा आईच्या जुन्या साड्यांची वाकळ अंगावर घेतल्यावर जणू त्यांचाच मायेचा हात अंगावरून फिरतोय असं वाटतं. वाकळ किंवा गोधडीचं हे भावनिक नातं भारतीय कुटुंबपध्दतीत अधिकच रूजलेलं दिसतं. त्यावरूनच कल्पना उचलून तयार झालेल्या आकर्षक रंगसंगती आणि डिझाईन्सच्या रजया कित्येक दुकानांत, मॉलमध्ये विकत मिळतात. गृहउद्योग म्हणून देखील बायकांकडून गोधड्या शिवून घेऊन त्या विकल्या जातात. क्वचित काळी शहरी वस्त्यांमधून आजही थंडीचा सीझन सुरू होण्याआधी काही दिवस ‘गोधडी शिवणार...गोधडी शिवणार’ अशा गोधडी बनवणा-या जिनगरांच्या हाका ऐकू येतात. गोधडी पर्यावरणपूरक देखील आहे. या कलेतून माणसाने पर्यावरणाला जपण्याचा देखील विचार केलेला दिसतो. आपल्याच घरातील किंवा आसपासच्या टाकाऊ अशा कपड्यांच्या तुकड्यांना जोडून टिकाऊ असं पांघरूण तयार करणं म्हणजे एकप्रकारे नवं पांघरूण तयार करण्यामागची ऊर्जाबचतच होय. बदलत्या काळात व्यवसाय पूरक वैशिष्ट्य म्हणून गोधडीसाठी नवीन कपडे वापरण्याची पद्धत अनेकांनी स्वीकारलेली दिसते.




Photo credit : पिटेझरी गावातील आदिवासी महिला निसर्गवेध संस्थेसाठी गोधडी बनवताना


 


परदेशात अनेक देशांमधून गोधडी बनवण्याची कला आपल्याप्रमाणेच परंपरागत जपलेली दिसते. मात्र पाश्चिमात्य देशांतील या कलेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या कलेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे. अमेरिकेत नॅशनल क्विल्ट म्युझियम आहे, जिथे अमेरिकेतील आणि जगातील गोधड्यांचा इतिहास पाहायला मिळतो शिवाय त्यांचे आधुनिक रूपही पाहायला मिळते. भारतात चेन्नईमध्ये क्विल्ट इंडिया फाउंडेशनतर्फे दरवर्षी देशी-विदेशी कलाकारांनी चित्रे विणलेल्या गोधड्यांचा महोत्सव भरवला जातो. ज्यात भारतासह हंगेरी, युएई, जर्मनी, अमेरिका, द. आफ्रिका आदी देशांमधील कलाकारांची आकर्षक गोधडी चित्रे पाहायला मिळतात. विदेशांमध्ये गोधडी बनवणा-या शेकडो हौशी लोकांनी आणि संस्थांनी स्वत:च्या वेबसाईट्स बनवलेल्या आहेत, ज्यावर त्यांच्याकडील क्विल्ट्सची संपूर्ण माहिती दिसते. आपल्याकडे मात्र भारतात हि कला उत्तमरित्या विकसित असूनही गोधड्यांची माहिती देणा-या वेबसाईट्स आढळत नाहीत. परंतु आपल्याकडे अशी कोणतीच वेबसाईट दिसत नाही. अर्थातच हा निरूत्साहीपणा आपल्या अनेक सांस्कृतिक ठेव्यांबाबत आढळतो. गोधडीसारख्या पांघरूणाने आज आपल्याला सामाजिक एकजूट कशी राखायची ते शिकवलंय, प्रेम कसं वाटायचं ते शिकवलं, पर्यावरणाची आणि पुढील पिढ्यांची काळजी कशी घ्यायची ते शिकवलं, आर्थिक बचत कशी करायची हे शिकवलं, सांस्कृतिक वारसा कसा जपायचा ते शिकवलं. घराघरातून उबदार गोधडी विणणा-या प्रत्येक हाताकडे, त्या व्यक्तीकडे आपण आपल्या कलेचे राखणदार म्हणून पाहिलं पाहिजे.

Similar News