आय एम न्यू जनरेशन फादर: अभिनेता तुषार कपूर

तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य आणि करिना कपूरच्या तैमूरची दोस्ती कशी झाली? लग्न न करताचा ‘आय एम न्यू जनरेशन फादर’ असं तुषार कपूर का म्हणतो? Best Father होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? 5 वर्षांपासून आपल्या खऱ्या आयुष्यात वडीलांची भूमिका निभावणाऱ्या तुषार कपूरची मनोरंजन विश्वातल्या ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी घेतलेली मुलाखत नक्की वाचा...;

Update: 2021-06-21 03:28 GMT

बॉलिवूडचा देखणा सदाबहार नायक जितेंद्रने सत्तर -ऐंशी आणि नव्वदीचं दशक रुपेरी पडद्यावर गाजवलं. जितेंद्रची पत्नी शोभा कपूर आणि लेक एकता कपूर यांनी बालाजी टेलिफिल्मची स्थापना करून टीव्ही मनोरंजन क्षेत्रांत क्रांती घडवून आणली खरी! जितेंद्रचा धाकटा लेक तुषार कपूर ह्याने आयव्हीएफ-सरोगसी ह्या तंत्राचा उपयोग करत पितृत्व स्वीकारलं. जितेंद्रने एका अग्रगणी प्रसार माध्यमाशी बोलतांना तुषारबद्दल अत्यंत अभिमानाने म्हटलं, माझ्यापेक्षाही तुषार उत्तम पिता आहे. याचा मला अभिमान आहे !

तुषारशी गप्पा केल्या आणि जाणून घेतलं, त्याच्यातलं पितृत्व! पितृत्वाच्या भावना!

उच्य शिक्षणासाठी मी अमेरिकेत गेलो, पण पदवी घेण्यापूर्वी वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून अभिनयातच करियर करावं अशी उपरती झाली. आणि मी मुंबईत परतलो. एका पाठोपाठ एक फिल्म्स करता -करता मी वयाची पस्तिशी गाठली. माझ्या घरून आधी दीदी (एकता कपूर ) आणि पाठोपाठ माझ्या लग्नाचा लकडा लागला, जे स्वाभाविक होतं. माझ्या पसंतीस पडेल अशी जोडीदार लाभली नाही, अरंजेंड मॅरेजवर माझा विश्वास नाही. त्यात दीदी आणि माझ्या करियरचा घोडा चौखूर उधळला होता. ह्यातही आणखी दोन वर्षे निघून गेलीत. माझे समकालीन-समवयीन मित्र-मैत्रिणी माझ्या संपर्कात होतेच, खऱ्या अर्थाने आदर्श असं माझं कुटुंब सोबतीला होतंच, पण मित्र-मैत्रिणी हळूहळू आपल्या वैयक्तिक विश्वात रमू लागलेत आणि मलाही वाटू लागलं, माझं लग्न जेंव्हा होईल तेंव्हा होईल पण लग्न नाही म्हणून मी पिता नाही होऊ शकत का? मलाही तीव्रतेने पिता व्हावं असं वाटू लागलं होतं. माझं वय वाढत चाललं होतं.

२०१५ च्या काळात तिरुपती -चेन्नई ह्या विमान प्रवासात ज्येष्ठ सिने दिग्दर्शक प्रकाश झा यांची माझ्याशी भेट झाली. गप्पांच्या ओघात मी त्यांना माझी पिता होण्याची इच्छा व्यक्त केली. माझं वय वाढत चाललंय, आणि उतार वयात पिता होण्यापेक्षा ह्या वयात पिता होण्याची, आपल्या अपत्याशी खेळण्या-बागडण्याची, त्याने मला पापा हाक मारावी अशी असोशी आहे.

त्यावेळेस प्रकाश झा यांनी मला आपलेपणाने समजून घेत मार्गदर्शन केलं. २५-३० वर्षांपूर्वी प्रकाश झा यांनी त्यांची त्यावेळीस असलेली पत्नी दीप्ती नवलसोबत एका मुलीला दत्तक घेऊन तिचं पालकत्व स्वीकारलं होतं. त्यांनी आपल्या व्यक्तिगत आठवणीबद्दल सांगत, सरोगसीद्वारे कुणालाही आई -वडील होण्यातला आनंद लाभू शकतो. तंत्र तेव्हा उपलब्ध नव्हतं म्हणूनच मुलीला आम्ही दत्तक घेतलं.

सरोगसीद्वारे तू सहज पिता होऊ शकतो. ही माहिती आणि आत्मविश्वास दिग्दर्शक प्रकाश झा यांनी मला दिला आणि सरोगसीसाठी निष्णात डॉक्टर सांगितले. पुढे सगळं सहज होत गेलं. डॉक्टरांनी पूर्ण मार्गदर्शन सरोगेट मदर याविषयी संपूर्ण माहिती खात्री दिली. मी डॉक्टरांना भेटल्यावर माझा मानस घरी बोलून दाखवला.. माझ्या ह्या निर्णयाचं, खरं म्हणजे बोल्ड निर्णयाचं घरी स्वागतच झालं! आणि २०१६ मध्ये मी सरोगसीच्या माध्यमातून पिता झालोही!

आमच्या घरात प्रचंड आनंद झाला. माझी दीदी एकता, त्याची आत्या आहे, पण त्यापेक्षा तिने जणू त्याला आईची ममता दिलीये! माझ्या मुलाची पत्रिका देखील एकताने करवून घेतली आणि त्यात जन्माक्षर ल आल्याने त्याचं नामकरण देखील लक्ष्य असं एकताने केलं.

लक्ष्यच्या संगोपनात जेंव्हा संपूर्ण कुटूंब रमलंय हे लक्षात आल्यावर एकतानेही सरोगसीद्वारे आई होण्याचा निर्णय घेतला आणि आई होण्याचा शब्दातीत आनंद मिळवला! तिनेही योग्य वेळी निर्णय घेतला ही प्रेरणा तिला माझ्यामुळे लाभली!

एकताने देखील सरोगसी आणि आयव्हीएफ टेक्निकचा वापर करत लग्नाशिवाय मातृत्व मिळवलं. एकताने तिच्या लेकाचं नामकरण रवी असं केलं, आमच्या वडिलांचं जितेंद्र हे पडद्यासाठी धारण केलेलं नाव, पण त्यांचं खरं नाव रवि (कपूर )! डॅडचं नाव एकताने तिच्या लेकाला दिलं.

लक्ष्य, माझा मुलगा आणि एकताचा रवी ह्या दोन लहानग्यांमुळे घराचं गोकुळ झालंय. पंच्याहत्तरी उलटलेले माझे वडील आणि आणि एकाहत्तरीची माझी आई यांच्या आयुष्यात एक अत्यंत सुखद असं वळण आलंय. आपल्या नातवंडाना वाढताना बघून कुठल्या आजी-आजोबांना त्यांचं शैशव नाही आठवणार? बऱ्याचदा मातृत्व -पितृत्व यातला नैसर्गिक सहज आनंद मिळवण्यासाठी लग्न होतात. पण लग्न झालं नाही म्हणून हा आनंद का दुरावला जावा असं माझं आणि दीदीचं वैयक्तिक मत !

लक्ष्य के जिंदगी में आने से मैंने जो खुशियां और सुकून पाया है उसे मैं लफ्ज़ो में नहीं बयां कर सकता! जीवन में जैसे ठहराव आया है! आयुष्यातले अनावश्यक प्रश्न -बेचैनी, अस्वस्थता, उदासी निघून गेलीये! माझ्या लाडक्यासाठी काय करू अन काय नको असं वाटतं! जीवन बडा सॉर्टेड हुआ है.

लक्ष्यला घेऊन मी हॉलिडेजला जावं काय, त्याला कुठे फिरवावं. काय शिकवावं अनेक प्रश्न अन्य कुठल्याही पित्याप्रमाणे माझ्या मनात सतत असतात. माझं शूटिंग संपलं, माझं मन त्वरित घरी धाव घेतं. माझा लेक माझी वाट पाहत असतो. पिता म्हणून ही भावना मोठी सुखावणारी आहे. लक्ष्यसाठी आणि रविसाठी आम्ही घरातले सगळेच कटिबद्ध आहोत. माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू हाच लक्ष्य आहे! मी त्याचा सिंगल पेरेंट आहे.

आई आणि वडील ह्या दोन्ही भूमिका मला पार पाडायच्या आहेत. त्याची शाळेत ऍडमिशन, त्याचे ओपन हाऊस, त्याचा होमवर्क इतकंच काय तो लहान असताना त्याचे डायपर्स बदलणे, त्याचे फीड तयार ठेवणे अशी सगळी कामं मीच केलीयेत. सुदैवाने लक्ष्य अतिशय निरोगी आहे. त्यामुळे त्याला मांडीवर घेऊन मी रात्री जागल्यात असं आजतागायत घडलं नाही. सध्या लॉकडाऊनच्या काळातही मी योग्य ती काळजी घेऊन लक्ष्यला घेऊन संध्याकाळी किमान १५-२० मिनिटे त्याला खेळायला घेऊन जातो. त्याचे ऑनलाईन क्लासेस देखील होत असत ते देखील मी त्याला सोबत घेऊन अटेंड केलेयत.

एरवी शूटिंगहून घरी आल्यानंतर मी माझा क्वालिटी टाइम लक्ष्यला देत असतो. मी आणि एकता लहान असताना आमचे डॅड अनेक सिनेमांमध्ये काम करत असल्याने त्यांचा वेळ आम्हाला तितकासा मिळाला नाही, म्हणून शक्य होईल तेंव्हा आई मला आणि एकताला घेऊन त्यांच्या शूटिंग लोकेशन्सवर घेऊन जात असे. अर्थात वडिलांच्या अपुऱ्या वेळेअभावी आम्हां मुलांचं खूप नुकसान झालं असं नाही, उलट त्यांची कमतरता जाणवत असल्याने माझ्या मुलाला माझा शक्य तितका वेळ द्यावा अशी प्रकर्षाने इच्छा निर्माण झाली..

लक्ष्यने टाकलेले पहिले पाऊल, त्याने उच्चारलेले शब्द, त्याने गायलेली कविता रेकॉर्ड करावी ह्यासाठी माझी धडपड असते, माझ्या अनुपस्थितीत त्याचे फोटोज, व्हिडिओज काढण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक डॅडने (जितेंद्र) केलीये! माझ्या लेकाचे बहुतेक फोटोज -व्हिडियोज मी कौतुकाने इन्स्टाग्रामवर शेयर करत असतो!

लक्ष्य कायम असा लहान राहणार नाहीये, तो प्रत्येक क्षणी मोठा होतोय वाढतोय, ह्या सगळ्या आठवणी मला संग्रही ठेवायच्या आहेत.. तो मोठा झाल्यावरही कायम जगायच्या आहेत.. लक्ष्यचं बालपण, त्याच्या जीवनातील लहानसहान आठवण मी मिस करणार नाही! आणि हो लेकाला वाचन, खेळ, जनरल नॉलेज, आजूबाजूच्या घडामोडी अशा सगळ्या चौफेर बाबतीत त्याची वाटचाल घडावी म्हणून मी प्रयत्नशील आहे.

आम्ही पंजाबी असलो तरी लक्ष्यला पंजाबी, हिंदी आणि इंग्रजी भाषेसह आपली लोकल भाषा मराठीचं ज्ञान देखील असावं अशी माझी धडपड आहे. त्या दृष्टीने प्रयत्न आहेत. आर्थिकदृष्ट्या आम्ही सधन असलोत तरी लक्ष्यने घरातील नोकर चाकर-प्रत्येकाचा आदर करावा, स्वतःची कामं स्वतः करावीत, तो स्वावलंबी व्हावा, परावलंबी होऊ नये ह्यासाठी मी त्याला जाणीवपूर्वक घडवतोय!

आमच्या घरात फिल्मी गप्पा-चर्चा होत नाहीत, पण जर त्याला पुढे अभिनयात जायचं असल्यास माझी आडकाठी नसेल! आमच्या घराला लक्ष्य आणि रवि ह्या दोन लहानग्यांमुळे खरं म्हणजे शिस्त लागलीये. प्रौढांना घराची ओढ लागलीये, ही किमया ह्या मुलांचीच! लक्ष्यला पिता म्हणून वाढवणे ह्यातही मी घडतोय. मी नव्याने जगतोय..! लक्ष्यला दुपारी झोपण्याची सवय लावलीये. लॉकडाऊनमध्ये मीही घरी असल्याने लेखासोबत माझी देखील वामकुक्षी घेत असतो मी !

लक्ष्यने नुकतीच वयाची 5 वर्षे पूर्ण केलीत.. त्यामुळे मी प्रयत्नात असतो. त्याला भरवण्याऐवजी हळूहळू हाताने अन्न खावे. ह्यासाठी काय करावे म्हणून मी अशा स्वरूपाच्या शंका मी आमच्या व्हॉटस ग्रुपमध्ये टाकतो.. लक्ष्यच्या वयाची मुलं असलेले पालक ह्यात आहेत. करीना कपूर (खान) देखील ह्या व्हॉटस ग्रुपमध्ये आहेच.. आमची मैत्री होतीच पण आता तिचा तैमूर आणि माझा लक्ष्य एकाच वयोगटातील असल्याने आमचा वारंवार संपर्क येत असतो!

लक्ष्यसोबत माझे मित्रत्वाचे नाते कायम असणार आहे माझे. आय एम न्यू जनरेशन फादर! सिंगल पेरेंट असल्याचा माझ्यावर आता कुठलाही ताण तणाव नाहीये ! I am very proud father now.

(मनोरंजन विश्वातल्या ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी अभिनेता तुषार कपूर यांची फादर्स डेच्या निमित्ताने मुलाखत घेतली.) तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य आणि करिना कपूरच्या तैमूरची दोस्ती कशी झाली? लग्न न करताचा 'आय एम न्यू जनरेशन फादर' असं तुषार कपूर का म्हणतो? Best Father होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? 5 वर्षांपासून आपल्या खऱ्या आयुष्यात वडीलांची भूमिका निभावणाऱ्या तुषार कपूरची मनोरंजन विश्वातल्या ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी घेतलेली मुलाखत नक्की वाचा...

Tags:    

Similar News