पर्यटक बावळट असतात त्यांची सुरक्षा स्थानिक व्यवसायिकांच्या हाती?

तारकर्ली दुर्घटनेनंतर कोकणीतल पर्यटन व्यवसायावर आणि तिथल्या व्यावसिकांवर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेजत. तर काही जण पर्यटकांना जबाबदार होता येत नाही का? असा प्रश्न विचारत आहेत. पण नेमकं खरं काय? पर्यटकांची सुरक्षा कुणाच्या हाती असते? अशा दुर्घटना टाळण्याकरीता काय उपाययोजना करता येऊ शकतात याबद्दल लेखिका रेणुका खोत यांचा लेख वाचायलाच हवा...

Update: 2022-05-30 11:36 GMT

तारकर्ली येथील दुर्घटनेनंतर फेसबुकवर ह्या संदर्भात अनेक पोस्ट पाहिल्या. त्याखाली विविध कमेंट्समध्ये ह्याबाबत मंथन सुरू आहे. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. प्रश्न इतकाच उरतो की माणसाच्या जिवाची किंमत सगळ्यात जास्त महत्वाची आहे त्यासाठी ह्यापुढे काही केले जाईल का?

कोकणी माणूस उर्मट असेल पण नीच नाही, असेही एक वाक्य वाचले. कोकणी माणूस किंवा कोकणच काय जिथेही कुठे माणसं पर्यंटनासाठी जातात तिथले स्थानिक उर्मट नीच आहेत की नाही ह्यापेक्षाही आधीच्या दुर्घटनांमुळे त्यांनी त्यांच्या व्यवसायात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते बदल करण्यास सुरवात केलेली आहे की नाही हे महत्वाचं आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आम्ही काय बदल केलेले आहेत ह्याचे त्यांनी मार्केटिंग केले पाहिजे. पर्यटकांना त्यांनी एज्युकेट करावे आणि अपग्रेड व्हावे असे वाटते.

अशी अनेक मते वाचली की पर्यटक काय करतात? ते का नाही खबरदारी घेत. भले समजुया की पर्यटक माती खातात. उदा. बाहेरगावहून येणारे पर्यटक गावांमध्ये जोरात वाहने चालवतात त्यामुळे गावकर्यांना भीती वाटते असुरक्षित वाटते इ. ठीक आहे. मग त्यासाठी तिथले स्थानिक काय खबरदारी घेऊ शकतील? त्यांनी अशा पर्यटकांबद्दल सतत तक्रारी कराव्यात, तक्रारींचा पाठपुरावा करावा. का? कारण त्यामुळे पर्यटक सुधारतील. जोरात वाहने चालवणे, मोठमोठ्याने आवाज शोर शराबा करणे, दारूच्या बाटल्या कचरा इथे तिथे फेकणे ह्याबद्दल संबंधित पर्यटन स्थळांमधील लोकांनी योग्य त्या माध्यमातून सरकारकडे सतत तक्रारी केल्यास कोणत्या तरी पातळीवर ह्याची दखल घेतली जाईल की नाही? हेतू हा की ह्यामुळे पर्यटकांना अद्दल घडणे हा नसून अत्यंत सकारात्मक बदल होऊ शकेल.


फालतुगिरी करणार्या हुल्लडबाज पर्यटकांसाठी दंड असतील जे खरोखर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी शांततेसाठी म्हणून बाहेर पडतात त्यांनाही दिलासा मिळेल. फालतू हाच शब्द योग्य आहे. फालतू पर्यटकांवर चाप बसल्यास पर्यायाने संबंधित पर्यटन स्थळाला चांगले नाव मिळेल, मुलांना स्त्रियांना सुरक्षित वाटेल आणि तिथे पर्यटकांची आवक वाढेल. ह्यासाठी पर्यटन स्थळांमधील पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांनी मिळून काही नियम बनवले पाहिजेत. त्याबद्दल येणार्या पर्यटकांना सांगितले पाहिजे. नियमांबद्दल अत्यंत स्ट्रीक्ट राहिले पाहेज. नाही म्हणजे नाही. संपला विषय. नियम तोडणार्या पर्यटकांना हाकलून द्या. पर्यटन व्यवसायिक असे अत्यंत रोखठोक राहतील तेव्हाच पर्यटकांमध्ये भान येईल. त्यांच्या वेबसाईट्स असतील तर त्यावर ह्या नियमांची माहिती दिली पाहिजे.

दुसरी गोष्ट अशीही आहे की पर्यटकांवर दोष देण्याचा प्रकार पाहिला. शंभर लोकं एखाद्या पर्यटन स्थळी जात आहेत एंजॉय करत आहेत. तर प्रवासाला पुरेसे सामान घेऊन पर्यटक बाहेर पडतात. असे कितीजण आहेत जे फेसबुकवर वा गुगलवर प्रवासाला जाताना विविध प्रकारची माहिती घेत असतील? स्वत:च्या सुरक्षेसाठी अमुक तमुक करायचे असते हे सगळ्याच पर्यटकांना कसे माहीत असेल? पावसाळा आला चला जाऊया अमुक तमुक ठिकाणी ह्यामध्ये बहुतांश पर्यटक हे त्यांच्या सुट्ट्या आणि त्याचे बजेट इतकेच बघत असतात सगळेजण गुगल करून आपण ह्या ह्या ठिकाणी जातोय तर कसे सुरक्षित ठेवायचे त्यासाठी आपण काय खबरदारी घ्यायची असते ह्याची चेकलिस्ट बनवत नाहीत. कारण जिथे जाऊ तिथल्या लोकांना माहीत असतं यार सगळं ते सांगतील की हे धरूनच चालले जाते. अगदी ट्रेकिंगला वगरे जाणार्या लोकांचा सगळी माहिती घेऊन बाहेर पडायचे, कोणत्या प्रांतात कधी जायचे असते नसते, अडले नडले तर काय करायचे ह्याचा थोडा घरचा अभ्यास असतो. आता महाराष्ट्रातला माणूस महाराष्ट्रातच फिरताना फार फार तर काय पाहील.. कोणत्या ऋतुत गेल्यावर मला त्या ठिकाणचा सर्वाधिक आनंद लुटता येईल, मला अमुक ठिकाणी गेल्यास काय खाता येईल, माझ्या बजेटची हॉटेलं होम स्टे कोणती इतके पाहील.

मी देवबाग तारकर्लीला गेले होते अनेक वर्षं झाली त्याला. तेव्हा आम्ही देवगडाहून उठून सरळ गेलो. तिथले वॉटर स्पोर्ट्स अरेंज करणार्यांचे काही परवाने बघायचे असतात, ते पॅराशूटने समुद्रात उंचावर जाणं आणि धप्पकन खाली बोटवाले आपल्याला समुद्राचा इंगा दाखवायला सरप्राईज म्हणून थोडं बुडवतात हे करताना गंडलो तर वगरे असं डोक्यातही आलं नाही. कारण आपण सरळ विश्वास टाकून मोकळे झालेले असतो. व्यावसायिक आपल्याला बोटने समुद्रात नेतात. आता ती तिथली माणसं, समुद्र त्यांना जास्त माहितीचा तर आपण त्यांना कसं सांगणार की बुवा बोट जास्त भरलीये तुम्ही वगैरे. त्यांना माहीतच असतं हेच गृहीत असतं ना. पर्यटक बावळट आहेत त्यांना काहीही माहीत नसतं, त्यांची सुरक्षितता आपल्या हाती आहे हे अशा एक्टिव्हिटी घेणारे विचार करणार नाही तर कोण करणार, असा साधा हिशोब असतोच की डोक्यात. त्यामुळे आपण बिनधास्त जातो.

असे वॉटर स्पोर्ट घेणारे काहीच काळजी घेत नसतील असे मी म्हणत नाही. पण अनेकांना वाईट अनुभवही आलेले आहेतच जे फेसबुकवर अनेक पोस्टखाली लोकांनी लिहलेले आहेत. ते वाचून काय वाटलं.. साला नशीब यार आपल्यासोबत असं काही झालं नाही आपण वाचलो. पण आता जाताना भीती निर्माण झालीच.

ह्यातून होतं काय की संबंधित पर्यटन स्थळाची प्रतिमा मलिन होते, असं नका करून आरडा होतोय. निसर्गाने थप्पड मारली तर त्यापुढे पर्यटक आणि अशी एक्टिव्हिटी घेणारे व्यावसायिक कितीही सजग असले तरी काही चालणार नाही, ही फॅक्ट आहे. कुठल्या काळात बोटी पर्यटकांना घेऊन समुद्रात न्याव्या न न्याव्या ह्यासाठी नियम असले पाहिजेत. पर्यटकांना समुद्रात जाताना गिअर्स कंपलसरी केले पाहिजे. ते गिअर्स अत्यंत चांगल्या दर्जाचे आणि नीट आहेत का ह्याची वारंवार तपासणी झाली पाहिजे. ज्या काळात सागरी पर्यटन होऊ शकत नाही त्याकाळात असे व्यवसाय करणार्यांना दुसरा काही रोजगार असायला हवा. सरकारने ह्यामध्ये नीट लक्ष घातले पाहिजे. बोट उलटली माणसे गेली हे वाचूनच खूप भयंकर वाटते. जी माणसं गेली त्यांच्या निकटवर्तीयांचे दु:ख किती भयंकर असेल. असे कुणासोबत होऊ नये म्हणून पर्यटक आणि पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक ह्या दोघांमध्येही खूप जागृती ( अवेअरनेस आणि प्रोफेशनालिझम ) करण्याची गरज आहे.


हे कोण करणार , करू शकेल ते माहीत नाही. पण निकड वाटते. कारण मी स्वत:ही, चला मला अमुक तमुक ठिकाणी जायचय फिरायला निघुया, ह्याच टप्प्यावर सर्वसामान्यांसारखी आहे. पर्यटक म्हणून मला काय हवय की मी जिथे जाणार तिथल्या लोकांनी मला सांगावं की अमुक रस्ता खराब आहे, तमुक ठिकाणी असे तसे वातावरण असताना जाणे धोक्याचे आहे. किंवा ह्या बोटीत आता जागा नाही तुम्ही थांबा. मला काही कळत नाही तुम्ही सांगा बुवा आम्ही ऐकतो, अशा कॅटेगरीत माझ्यासारखेच अनेक पर्यटक असतात. देवावर भरोसा ठेऊन प्रवासाला निघणे किंवा सतत अभ्यास करून कुठेही जाणे अशा मानसिकतेने सगळी माणसं प्रवासाला निघत असतील का.. जशा कमेंट येत आहेत ते पाहून हे लिहावं वाटलं.. अभ्यास करा अभ्यास करा, हे तपासा ते तपासा. सगळे जण काय काय खबरदारी घ्यायची ह्यासाठी हे सगळं करतील, असं मला तरी वाटत नाही. वेळ आहेत पैसे आहेत बॅगा भरा डबे भरा निघा इतकच असतं की.. माहीत नाही, हे सगळं थोडं अवघड आहे.

अजून एक कोकणी माणूस नीच आहे बेफिकीर आहे, कोकणाला बदनाम करू नका असे अनेकजण म्हणत आहेत. होणारी टीका ही प्रवाशांना आलेल्या त्या विवक्षित अनुभवांबद्दल असावी त्यावरून लगेच कुणी सगळ्या कोकणाला बदनाम करत नाहीये. अशा कमेंट करून पर्यटकांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्याची संधीही वाया जाते आहे उत्तरं तर काहीच मिळत नाहीयेत ना ठोस.


रेणुका खोत

लेखिका 

Tags:    

Similar News