मासिक पाळीदरम्यान पॅडमुळे होणाऱ्या रॅशेशचा त्रास कसा कमी करावा?

पावसाळ्यात त्वचा विकार वाढलेलेच असतात. पावसाळ्यात मासिक पाळीच्या त्या चार दिवसात अनेक जणींना नाजूक जागी येणारी रॅशही छळते. काय आहेत याची कारणं…;

Update: 2021-08-06 03:18 GMT

पॅड आणि त्वचा यांचे वारंवार घर्षण होऊन ही समस्या निर्माण होते. काही जणींना पुरळं येतात तर काही जणींना चक्क त्याठिकाणी लहानलहान जखमाही होतात.

पाळीचं नुसतं नाव घेतलं तरी अनेकींच्या अंगावर काटा येतो. या काळातलं प्रत्येकीचं दुखणं वेगवेगळं. कोणाला तिव्र पोटदुखी तर कुणाला खूपच होणारं ब्लिडिंग. पण यापेक्षाही वेगळी समस्या काही जणींना जाणवते. पाळीच्या त्या ४ दिवसांमध्ये पोटदुखी आणि पाळीचा त्रास आणि त्यानंतर त्या नाजूक जागेवर येणारी रॅश. ही रॅश इतकी भयंकर असते की मग अनेक जणींना तर चालणे किंवा हालचाल करणेही अगदी कठीण होऊन बसते.

नाजूक जागी रॅश येण्याची अनेक कारणे आहेत. यापैकी सगळ्यात मुख्य कारण म्हणजे सॅनिटरी पॅडची ॲलर्जी असणं किंवा मग पाळीच्या काळात योग्य स्वच्छता न राखली जाणं. पॅड आणि त्वचा यांचे वारंवार घर्षण होऊन ही समस्या निर्माण होते. काही जणींना पुरळं येतात तर काही जणींना चक्क त्याठिकाणी लहानलहान जखमाही होतात. अनेक जणींना तर प्रत्येक पाळीनंतर हा त्रास सहन करावा लागतो. तर काहीजणींना पावसाळा आणि उन्हाळ्यात या गोष्टीचा खूप त्रास होतो. पण अशी समस्या असेल तर त्यावर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने लगेच उपाय करणे खूप गरजेचे आहे.

१. एक्स्ट्रा लार्ज पॅड घेणे टाळा

पाळीच्या दिवसांत कपड्यांवर कुठे डाग पडेल याची भीती असते. त्यामुळे अनेक जणी एक्स्ट्रा लार्ज साईजच्या पॅडची निवड करतात. जेव्हा रक्तप्रवाह खूप असतो, तेव्हा हे पॅड खरोखरच उपयोगी पडतात. पण तिसऱ्या, चौथ्या दिवशी ब्लिडींग कमी होते, तेव्हा या पॅडचा उपयोग कमी आणि त्रासच जास्त होतो, असं म्हणायची वेळ येते. त्यामुळे पाळीमध्ये दोन प्रकारचे पॅड वापरा. सुरूवातीच्या एक- दोन दिवसांमध्ये एक्स्ट्रा लार्ज पॅड आणि त्यानंतर ब्लिडींग कमी झाल्यावर मिडियम आकाराचे पॅड वापरून पहावे.

२. दिवसांतून दोनदा पॅड बदला

जेव्हा पहिल्या- दुसऱ्या दिवशी ब्लिडींग खूप जास्त होत असते, तेव्हा दिवसांतून दोन वेळेस सहज पॅड बदलले जातात. पण त्यानंतर मात्र ब्लिडींग कमी झाल्यावर पॅड बदलण्याचा कंटाळा येतो. थोडंच तर खराब झालं आहे, मग कशाला बदलायचं, असा विचार अनेकजणी करतात आणि पॅडची बचत करायला पाहतात. पण ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे पॅड कमी खराब झालेले असतील, तरी चालतील, पण ६ ते ७ तासांनंतर ते अवश्य बदला.

३. स्वच्छतेची काळजी घ्या

पाळीच्या दिवसात स्वच्छता राखणे खूप गरजेचे असते. याकाळात प्रायव्हेट पार्ट्सला दिवसातून दोन- तीन वेळेस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळेही रॅशेस येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

४. योग्य मापाच्या पॅण्टी निवडा

पाळीच्या काळात पॅड अजिबात हलू नयेत, म्हणून अनेक जणी खूपच घट्ट पॅण्टी घालणे पसंत करतात. पॅण्टी अतिशय घट्ट असल्या तर पॅडची हालचाल होणार नाही आणि डाग पडणार नाहीत, असा समज काहीजणींच्या डोक्यात असतो. पण अशा अतिटाईट पॅण्टी घालण्यामुळेही रॅशेस येण्याची समस्या वाढू शकते. पॅण्टी योग्य मापाच्या आणि चांगल्या कपड्याच्याच असल्या पाहिजेत. कॉटनच्या पॅण्टी घालण्यास प्राधान्य द्यावे.

५. ॲण्टीफंगल पावडर लावा

प्रायव्हेट पार्ट्सची त्वचा कोरडी रहावी, यासाठी त्या भागात ॲण्टीफंगल पावडर दिवसातून दोन ते तीन वेळेस लावावी. त्वचा कोरडी राहिली, तर बुरशी किंवा अन्य संसर्ग वाढणार नाही आणि रॅशेस येणार नाहीत. पण अशी पावडर मनानेच लावू नका. पावडर लावण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या.

संकलन.. साहेबराव माने. पुणे.

Tags:    

Similar News