'द वुमन ऑन ट्रायल' : आजच्या भ्रष्ट समाजाचे दर्शन

Update: 2022-07-14 08:08 GMT

भारतीय समाजजीवनात 'व्यक्ती' या घटकाला महत्वाचे स्थान कधीच नव्हते. जेव्हा पौर्वात्य संस्कॄती व पाश्चात्य संस्कॄती एकमेकांसमोर उभी ठाकली व या संघर्षात पाश्चात्य संस्कॄतीचा विजय झाला तेव्हा भारतीय/ मराठी विचारवंतांना आपल्या जीवनविषयक मूल्यांचा पुनर्विचार करणे क्रमप्राप्त ठरले. त्याच काळी भारतात लॉर्ड मेकॉलेच्या कॄपेने इंग्रजी भाषेतून शिक्षण सुरू झाले. परिणामी भारतीयांना स्वातंत्र्य‚ समता‚ व्यक्तीवाद वगैरे पाश्चात्य मूल्यांचा परिचय झाला. पाश्चात्य समाजाने केलेल्या प्रचंड प्रगतीची जी अनेक कारणं दिली जात होती त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे त्या समाजव्यवस्थेत व्यक्तीला असलेले स्वातंत्र्य. यामुळे आपल्याकडेसुद्धा 'व्यक्तीवाद' महत्वाचा ठरत गेला.

पाश्चात्य समाजात उदयाला आलेला व्यक्तीवाद एकरंगी नव्हता. त्यात अनेक शेड होत्या. त्यात 'अतिरेकी/ टोकाचा व्यक्तीवाद' ही एक शेड होती. या शेडची विसाव्या शतकात मांडणी करणारी अभ्यासक म्हणजे श्रीमती ॲ‍न रँड (1905–1982) ही रशियात जन्मलेली व अमेरिकेत 1926 साली स्थलांतरीत झालेली विदुषी.ती तत्वज्ञ होती. तिने कादंबऱ्या लिहल्या‚ नाटकं लिहली‚ चित्रपटांच्या पटकथा लिहल्या. तिची 'फाऊंटन हेड' 'ॲ‍टलास श्रग्ड' वगैरे कादंबऱ्या न माहिती असलेली‚ न वाचलेली व्यक्ती विरळा. जरी तिला तिच्या कादंबऱ्यांनी जागतिक किर्ती मिळवून दिली तरी तिने लेखनाची सुरूवात नाटक लिहून केली होती. 1935 साली तिचे ब्रॉडवेवर 'द नार्इट ऑफ जानेवरी 16' हे नाटक मंचित झाले. या नाटकापासून तिचे तत्वज्ञान कलाकॄतींच्या माध्यमातून समाजासमोर यायला लागले.

याच नाटकावर आधारित 'द वुमन ऑन ट्रायल' हे हिंदी/इंग्रजीचे मिश्रण असलेले नाटक बघण्याची संधी अलिकडेच मिळाली. हे नाटक मुंबर्इस्थित 'मेकिंग नॉर्इस' (स्थापना : 2014) या नाटयसंस्थेने सादर केले. या नाटकाचे दिग्दर्शन लॉरा मिश्रा यांनी केले आहे. लॉरा मिश्रा हे भारतातील इंग्रजी रंगभूमीवरील एक आदरणीय नाव आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्या रंगभूमीवर कार्यरत आहेत. या नाटकात त्या प्रमुख भूमिका करतात. या आधी 'मेकींग नॉर्इस'ने 'किसी एक फुल का नाम लो'‚ 'विक्रम खोसला कौन है?' वगैरे दर्जेदार नाटकं सादर केली आहेत.

हे नाटक म्हणजे ज्याला कोर्ट रूम ड्रामा म्हणतात त्या प्रकारात मोडणारे आहे. कोर्ट रूम ड्रामा या सादरीकरणाच्या प्रकाराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रेक्षक सुरूवातीपासून यात गुंतलेला राहतो. कोण खुनी आहे व त्याने का खुन केला वगैरे प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना हवी असतात. एवढेच नव्हे तर या प्रकारात प्रेक्षक मानसिक पातळीवर गुंतलेले असतात व ते स्वत:शी सतत खुनी व्यक्तीबद्दल अंदाज बांधत असतात. जेव्हा कलाकार/ नाटककार एक तत्वज्ञसुद्धा असतो तेव्हा त्याच्या कलाकॄतीमध्ये तात्विक प्रश्नांची चर्चा आपसुकच येते. सार्त्र या फ्रेंच लेखक/ तत्वज्ञाचे लेखन आठवा. सार्त्रच्या लेखनात अनेकदा नैतिक समस्यांची जोरदार चर्चा असते. हाच प्रकार ॲ‍न रँडच्या या नाटकातही आहे. यात काय चुक आहे व काय बरोबर याची चर्चा आहे.

ॲ‍न रँडला हे नाटक 1932 साली 'मॅच किंग' इव्हर क्रेजेर याने पॅरिस शहरात केलेल्या आत्महत्येवरून सुचले. हा स्वीडीश–अमेरिकन गॄहस्थ फार वादग्रस्त होता. याने व्यापारात व आगपेटीच्या व्यवसायात करोडो रूपये कमावले होते. म्हणून त्याला 'मॅच किंग' म्हणत असत. नंतर त्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या विषयी अनेक प्रकारची उलटसुलट माहिती समोर आली. त्याने फार मोठा फ्रॉड केला होता‚ त्याने कर्जाचे अनेक प्रकार हुडकून काढले होते वगैरे वगैरे. त्याच्याबद्दल आजही जगाचे मत नक्की होत नाही. मात्र एका बाबतीत एकमत आहे व ते म्हणजे तो कुशाग्र बुद्धीचा‚ प्रचंड पैशांचे घोटाळे करणारा फार मोठा धोकेबाज होता. (हर्षद मेहताचा अमेरिकन अवतार). त्याने आत्महत्या केल्यानंतर चूक काय व बरोबर काय वगैरे चर्चा सुरू झाली. या घटनेवरून ॲ‍न रँडला हे 'द नार्इट जानेवारी 16' हे नाटक सुचले. आता या नाटकाचा भारतीय अवतार मंचीत झाला आहे.

'द वुमन ऑन ट्रायल' नाटकात एका स्त्रीवर एका श्रीमंत माणसाचा खुन केल्याचा आरोप आहे. या प्रसंगाने नाटक सुरू होते. ही तरूण स्त्री म्हणजे कॅरेन आंड्रीया. ती फिरोझ लकडावाला या श्रीमंत माणसाकडे त्याची सेक्रेटरी म्हणून नोकरी करत होती. नंतर तिला फिरोझ मोठे पेंटहाऊस घेऊन देतो व ती त्याची रखेल म्हणून राहत असते. दरम्यान फिरोझ लग्न करतो. नंतर फिरोझचा कॅरेनच्या पेंटहाऊसमध्ये खुन झाल्याचा आरोप होतो. म्हणून कॅरेनला अटक होते व तिच्यावर खटला सुरू होतो. फिरोझची पत्नी नॅन्सी व तिचा भाऊ कपुर यात कॅरेनच्या विरोधात महत्वाची साक्ष देतात. हा खटला म्हणजे हे नाटक.

या नाटकात दिग्दर्शक लॉरा मिश्रा प्रेक्षकांना ज्युरीच्या भूमिकेत टाकते व त्यांचा निर्णय घेते. आजपर्यंत या नाटकाचे चार प्रयोग झालेले आहेत व प्रत्येक प्रयोगाच्या शेवटी 'कॅरेनने खुन केला नाही' असाच निर्णय ज्युरी झालेल्या प्रेक्षकांना दिलेला आहे. या नाटकात ज्याचा खुन झाला तो फिरोझ लकडावाला कधीही प्रेक्षकांसमोर येत नाही. खुन नॅन्सीच्या भावाने म्हणजे कपुरने केलेला असतो. कारण कपुरवर प्रचंड कर्ज असते व त्याची अशी अपेक्षा असते की फिरोझने त्याला यातून बाहेर येण्यासाठी मदत करावी. पण फिरोझ नकार देतो. फिरोझ मेल्यास त्याची सर्व संपत्ती आपल्या बहिणीला मिळेल असा हिशेब असतो. नॅन्सीलासुद्धा फिरोझ मरावा असेच वाटते. तिला फिरोझचे कॅरेनबरोबर असलेले संबंध मान्य नसतात. तिकडे कॅरेन व फिरोझने वेगळाच कट केलेला असतो. कोणाची तरी डेड बॉडी आणायची व फिरोझ खुन झाला असे दाखवायचे. यथावकाश सर्व शांत झाल्यावर देश सोडून कायमचे गायब व्हायचे. म्हणजे जेव्हा फिरोझचा खुन झाला आहे असे सर्वत्र बोलले जात असते तेव्हा फक्त कॅरेनला माहिती असते की फिरोझ जिंवत आहे. जेव्हा तिला कळते की फिरोझचा खरोखर खुन झाला आहे तेव्हा ती कोसळते. असे हे रहस्यप्रधान नाटक. यात शेवटी एका गँगस्टरच्या‚ बुलेट दाभोलकरच्या साक्षीमुळे कपुरने फिरोझचा खुनी केल्याचे समोर येते व कपुर पकडला जातो.

या नाटकाचा प्लॉट बराच गुंतागुंतीचा आहे. पण त्यामुळेच प्रेक्षक शेवटपर्यंत नाटकात गुंतलेला असतो. रहस्यप्रधान नाटकांचे हेच तर वैशिष्टय असते. कोर्ट रूम ड्रामा असल्यामुळे कोर्टाचे वातावरण उभे करणे गरजेचे ठरते. हे लॉरा मिश्राने योग्य प्रकारे जुळवून आणले आहे. या नाटकात लॉराने कॅरेनची प्रमुख भूमिका केली आहे. ही भूमिका फार गुंतागुंतीची आहे. तिच्यासमोर तिच्या कटाप्रमाणे तिच्या प्रियकराच्या मॄत्यूचा खटला सुरू आहे व नंतर जेव्हा तिला कळते की फिरोझचा खरोखरच खुन झाला आहे तेव्हा कॅरेनचा विलाप बघवत नाही. तिची सर्व स्वप्नं भंगतात. ती खुनाच्या आरोपातून सुटते पण प्रियकर मेलेल्या जगात आता तिला जगावे लागणार या भावनेने ती खचते. या सर्व छटा लॉराने व्यवस्थित व्यक्त केल्या आहेत. तिला प्रेरणा तलवार (ॲ‍डव्होकेट राव)‚ तन्मय रंजन (बुलेट दाभोलकर)‚ बरखा सक्सेना (नॅन्सी लकडावाला)‚ सी जे सिंग (कपुर) वगैरेंनी योग्य साथ दिली आहे. या नाटकाची प्रकाशयोजना भीमाजीयानी यांनी सांभाळली आहे.

या नाटकाचे नाव जरी 'द वुमन ऑन ट्रायल' असले तरी खरे तर यात नैतिकतेवर चर्चा होते. यात कोणाचे काय चुकले? फिरोझ लकडावाला या गॄहस्थाबद्दल सहानुभूती वाटली पाहिजे का? कॅरेनचे काय? तिने प्रेमाखातर एका मोठया भ्रष्ट व्यवहारात सामिल होण्याचे मान्य केले. नॅन्सी लकडावाला तर स्वत:च्या पतीच्या मॄत्यूची वाट पाहत असते. तिचा भाऊ कपुर स्वत:च्या बहिणीला विधवा करण्याच्या अगोदर दोन सेकंदसुद्धा विचार करत नाही. या सर्वांत नैतिकता कोठे आहे?

भारतीय समाज आज ज्या टप्प्यावर उभा आहे ते बघता हे नाटक फार कालोचित म्हणावे लागेल. आपल्या समाजातही भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. यात फक्त आर्थिक भ्रष्टाचार हा मुद्दा नाही. स्वत:च्या मुलामुलींना दहावी/ बारावीच्या परिक्षेत कॉपी पुरवणारे पालकांबद्दल काय म्हणायचे? प्रॉपर्टीसाठी आपल्या आर्इवडीलांचे खुन करणाऱ्या मूलांबद्दल नेहमी वाचायला मिळते. असे अनेक प्रश्नं 'द वुमन ऑन ट्रायल' बघतांना मनांत येत होते.

- प्रा. अविनाश कोल्हे

Tags:    

Similar News