नवं वर्ष नवं मार्केट घेऊन येत आहे - रवींद्र आंबेकर

सर्वत्र नैराश्याचं वातावरण आहे, दुसरीकडे देशातील 1 टक्के लोकांकडेच संपत्तीचा संचय होत आहे. त्या एक टक्के लोकांकडे सत्तेचाही संचय झालाय. या सगळ्या परिस्थितीत आपण कुठे आहोत. आपला वाटा कुठे आहें, आपला वाटा आपल्याला मिळणार आहे की नाही असे जगण्याचे प्रश्न आपल्याला पडत नाहीत, कारण असे प्रश्न पडू नयेत म्हणून आपला मेंदू-मन सातत्याने काही ना काही कारणांमध्ये बिझी ठेवण्यात या 1 टक्के लोकांना यश आलंय. आपल्या सर्व दुःखांना, समस्यांना हे एक टक्केच लोक जबाबदार आहेत हे आपण विसरून गेलो आहोत. या एक टक्के लोकांना टक्कर द्यायची वेळ आली आहे. वाचा रवींद्र आंबेकर यांचा नवं वर्ष नवं मार्केट घेऊन येतंय हा लेख;

Update: 2020-12-31 16:59 GMT

मॅक्समहाराष्ट्र आणि मॅक्सवुमन च्या सर्व वाचक-प्रेक्षकांना, तसंच हा लेख वाचत असलेल्या सर्वांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा.

2020 बद्दल अनेक ठिकाणी लिहून आलंय, छापून झालंय-वाचून झालंय. त्या सर्व गोष्टींची उजळणी करण्यासाठी हा लेख नाहीय. हा लेख तुमच्या समोर असलेल्या आव्हानांची यादी वाचण्यासाठीही नाही. समाजाची उभारणी-देशाची उभारणी याबद्दल आपण सतत बोलतच असतो, पण नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मला तुमच्या उभारणीबद्दल बोलायचंय. देशाचीच काय जगाची अर्थव्यवस्था कोलमडलीय. त्यात अनेक लोकांना आपल्या जगण्याची भ्रांत पडली आहे. सर्वत्र नैराश्याचं वातावरण आहे, दुसरीकडे देशातील 1 टक्के लोकांकडेच संपत्तीचा संचय होत आहे. त्या एक टक्के लोकांकडे सत्तेचाही संचय झालाय. या सगळ्या परिस्थितीत आपण कुठे आहोत. आपला वाटा कुठे आहें, आपला वाटा आपल्याला मिळणार आहे की नाही असे जगण्याचे प्रश्न आपल्याला पडत नाहीत, कारण असे प्रश्न पडू नयेत म्हणून आपला मेंदू-मन सातत्याने काही ना काही कारणांमध्ये बिझी ठेवण्यात या 1 टक्के लोकांना यश आलंय. आपल्या सर्व दुःखांना, समस्यांना हे एक टक्केच लोक जबाबदार आहेत हे आपण विसरून गेलो आहोत. एक टक्के धनाढ्य आणि कॉर्पोरेटच्या मेहरबानीवर आपण जगतों असा आपला समय झाला आहे. ही परिस्थिती बदलू शकत नाही अशा धारणेने अनेकांना ग्रासलेलं आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर या सगळ्या वंचना या मोठ्या वाटणारच आहेत. मला या अडचणीतही सुटकेचा मार्ग दिसतो. माझे हक्क मला सहजी मिळणार नसतील तर ते मी लढून मिळवायला पाहिजेत, पण लढण्याआधी एक छोटीशी सुरूवात मात्र केली पाहिजे. जगातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येच्या देशाला जग मार्केट म्हणून बघतंय. काहींनी तर आपल्यालाच प्रॉडक्ट करून टाकलंय, अशा या विषमतापूर्ण जगात आपली लढाई आपल्याला लढावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक धोरणांविषयी माझी वेगळी मतं आहेत, मात्र कोरोना काळात त्यांनी दिलेली घोषणा मला महत्वपूर्ण वाटते. सध्याची परिस्थिती आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याची आहे. देश आत्मनिर्भर होईल की नाही माहित नाही, पण देशातील प्रत्येक नागरिकाला आता आत्मनिर्भर म्हणजेच स्वयंपूर्ण व्हावं लागेल. नवीन मार्केट मध्ये आपलं स्थान तयार करावं लागेल, शोधावं लागेल.

खास करून युवकांसाठी माझं सांगणं आहे की, परिस्थितीला हावी होऊ देऊ नका. परिस्थितीवर मात करता येऊ शकेल, कामाची लाज बाळगू नका. आंत्रप्रनर व्हा. नवनवीन कल्पनांवर काम करा. सगळ्याच गोष्टींना भांडवल लागतं अशातला भाग नाही, भांडवल नसेल तर बिनभांडवली किंवा कमी भांडवली काम सुरू करा. छोटी सुरूवात करायला सामान्यतः लोकं लाजतात, पण असं करू नका. जे सक्षम असतील तेच जगतील असं जर निसर्गनियम सांगत असेल तर स्वतःला सक्षम करायला प्रयत्न करा. पैसे कमवणं वाईन नाही, मेहनत करून पैसे मिळतात यावर विश्वास ठेवा. राजकीय चर्चा, वाद-विवाद, वैचारिक मतभेद या ही पेक्षा स्वतःचा आत्मसन्मान महत्वाचा आहे. आपला आत्मसन्मान वाढवायचा असेल तर उद्योगी व्हा, सक्षम व्हा, शिका, लढा, संघर्ष करा. अर्थकारणाला दुय्यम मानू नका.

2021 एक नवीन मार्केट घेऊन तुमच्याकडे येतंय. त्याला समस्या म्हणून पाहू नका. सर्व समस्या एक व्यवसायाची संधी ही असते. ती संधी तुम्ही गमावू नका. एकमेकांना साह्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. अंतिमतः आपली लढाई विषमता वाढवणाऱ्या घटकांशी आहे, त्यासाठी आपल्या अंगातही बळ असलं पाहिजे. आत्मनिर्भर बनत असताना वंचितांचं उत्थानही केलं पाहिजे हे भान जोपासलं पाहिजे. येणारं वर्ष मॅक्समहाराष्ट्र परिवारानेही आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचं वर्ष म्हणून मनावर घेतलेलं आहे. नव्या लढाईला नवं बळ या मुळे मिळेल. आत्मनिर्भरतेचा हा संसर्ग वाढत जावो. जाता जाता लक्षात ठेवा, आपली लढाई त्या 1 टक्के लोकांशी ही आहे. नवीन वर्षात या एक टक्के लोकांचा बिमोड करायचा असेल तर नव्या मार्केटच्या चाव्या आपल्याकडे खेचून घेतल्या पाहिजेत

Tags:    

Similar News