१२ मार्च २०२०. वेळ सकाळी दहाची... आकाश निरभ्र होतं. कोवळं ऊन पडलं होतं. मात्र एरवी कोणत्याही शहरात दिसणारी गजबज, घाई गर्दी कुठेच दिसत नव्हती. अझरबाईजानच्या अत्यंत सुंदर, स्वच्छ, देखण्या बाकु विमानतळावर मी पोहोचलो. पहातो तर बाहेरच नाही तर आतही सर्वत्र शुकशुकाट. सुरक्षा पाहणीची औपचारिकता क्षणात आटोपली. माझ्या लगेच लक्षात आलं, हा कोरोनाचा परिणाम आहे! पुढे कुठं जावं, कसं जावं या विचारात मी पडलो. तेव्हढ्यात एक परीसारखी मुलगी माझ्या शेजारून जाऊ लागली. मी तिला थांबण्याची विनंती केली. ती पण थांबली, मी तिला विचारलं, मला दुबईला जाणारं विमान पकडायचं आहे, तर आपण मदत करू शकाल का? हसूनच ती म्हणाली, माझ्या सोबत चला, मी ही त्याच विमानाने जाणार आहे. सामसूम विमानतळावर कुणी विचारायला नसताना आता आपल्याला थेट विमानात जाऊन बसता येईल, यामुळे माझा जीव सुखावला.
विमानात काहीच गर्दी नव्हती. ३०० आसन क्षमता असलेल्या विमानात आम्ही मोजून दहा प्रवासी होतो. योगायोग म्हणजे त्या मुलीची आणि माझी बसण्याची जागा जवळ-जवळच होती. विमान सुटायला वेळ होता. त्यात विमानातील गहन शांतता अस्वस्थ करत होती. शांततेचा भंग करण्यासाठी मला त्या मुलीशी बोलावसं वाटू लागलं. मी तिला विचारले, तुझ्याशी बोललेलं चालेल का? तर ती ही सहजपणे म्हणाली हो, चालेल की. आणि आमचं बोलणं सुरू झालं. तिचं सौंदर्य, गोरेपणा पाहून मी तिला विचारले, आपण युरोपियन आहात का? आपलं नाव काय आहे? तर तिने मला आश्चर्याचा धक्काच दिला. ती म्हणाली, मी युरोपियन नसून भारतीय आहे. माझं नाव ख्रिसली.
एका दूर देशात, सामसूम विमानतळावर, गंभीर, भयग्रस्त वातावरणात अतिशय आत्मविश्वासाने वागत असलेली आपल्या सोबतची मुलगी भारतीय आहे, हे पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी तिला तसं बोलावूनही दाखवलं. आणि विचारलं, अशा वातावरणात तू इकडे काय करायला आलीस? तर ती म्हणाली, मी व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आहे. बाकू इथे एका कंपनीच्या अकाऊंटींगसाठी आले होते. मी विचारलं, तुझं ऑफिस कुठे आहे? तर ती म्हणाली, अबुधाबीला मुख्य ऑफिस आहे.
मूळ कुठली आहेस? इथे कधीपासून आलीस? घरच्यांनी परवानगी कशी दिली? ख्रिसली सांगू लागली, मी मूळची मंगलोरची. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण तिथेच झाले. घरून डॉक्टर- इंजिनिअर होण्याचा आग्रह झाला. पण मी माझी आवड ओळखून चार्टर्ड अकाऊंट व्हायचं ठरवलं आणि पटापट सर्व परीक्षा पास होत गेले. माझ्या घरातील मी पहिलीच चार्टर्ड अकाऊंटंट आहे. तिच्या सौंदर्याचा उल्लेख करून मी तिला विचारले, तुला चित्रपट किंवा मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करावसं वाटलं नाही का ? तर ती म्हणाली, तसं कधीच वाटलं नाही. कारण माझी ती आवड नव्हतीच. त्यामुळे मी कधी विचारही केला नाही तर प्रयत्न करणे दूरच.
मंगलोर सोडून तू थेट अबुधाबी कसं गाठलंस? असं विचारल्यावर ख्रिसली म्हणाली, माझे गुण उत्तम होते, सर्व मुलाखती छान झाल्या. सर्व बाबींचा तुलनात्मक अभ्यास करून मी हा देश आणि ही कंपनी निवडली. आता दोन वर्षे होतील. आमचं बोलणं सुरू असतानाच विमान सुरू होण्याची लक्षणं दिसू लागली. तिच्या परवानगीने मी तिची काही छायाचित्रे घेतली. विमानाची घरघर सुरू झाली. ती वाढतच गेली. मी कधी निद्रादेवीच्या स्वाधीन झालो ते कळलेच नाही.
जाग आली तेव्हा दुबई विमानतळ आल्याची उद्घोषणा सुरू होती. विमान थांबलं. आम्ही बाहेर पडलो. तिचे आभार मानता मानता मी म्हणालो, आमच्या महाराष्ट्रात आजही मुलींना पुणे मुंबईत शिकायला, नोकरीला पाठवायला पालक तयार नसतात. तू मात्र इतक्या दूर देशात आलीस, आत्मविश्वासाने वावरतेस याबद्दल तुझे, तुझ्या आईबाबांचे मनःपूर्वक अभिनंदन. तिनेही हसून अभिवादन केलं. आम्ही मार्गस्थ झालो. पुढे किती तरी वेळ माझ्या मनात आकाशातील ख्रिसली होती.
-देवेंद्र भुजबळ
986948484800.
devendrabhujbal4760@gmail.com