शेतीतील नवदुर्गा ३: पतीच्या निधनानंतर शेतीचा डोलारा सांभाळणाऱ्या भारती कुशारे

तिला कधीही वाटलं नव्हतं की, आयुष्यातील एका वळणावर शेती व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यांवर येईल. मात्र, नियतीने घात केला आणि त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर शेतीची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. मात्र, ही जबाबदारी त्यांनी लिलया पार केली... वाचा शेतीतील नवदुर्गा भारती अरुण कुशारे यांची यशोगाथा

Update: 2020-10-23 03:51 GMT

Courtesy: Sahyadri Farms

सरत्या काळाने, केले जरी डंख
मिटूनको आता, फुटलेले पंख...
तिलाकधीही वाटलं नव्हतं की आयुष्यातील एका वळणावर शेती व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यांवर येईल...अशा आजच्या आपल्या नवदुर्गेचा प्रवास जाणून घेऊया : भारती अरुण कुशारे
लहानपणापासूनच शेतीच्या कामातील आवड असणाऱ्या भारती ताईंनी कला शाखेत आपले शिक्षण घेतले. पुढे सावरगाव, नाशिक येथील अरुण कुशारे यांच्याशी ताईंचा विवाह झाला. शेतीच्या कामात पती अरुण यांचे मार्गदर्शन मिळत गेले. काही प्रमाणात शेतीतली जबाबदारी भारती ताई बघत होत्या. 
Sahyadri Farms च्या उभारणीच्या काळापासूनच हे कुटूंब Sahyadri Farms च्या प्रवासात जोडले गेलेले होते. घरची एकूण १५ एकर जमीन असून यामध्ये द्राक्ष पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करून Sahyadri Farms च्या मार्फत ती निर्यात केली जात होती. 
असा हा प्रवास सुरु असतानाच भारती ताईंच्या लग्नाला ११ वर्षे झालेली असताना पती अरुण कुशारे यांचे अपघाती निधन झाले. ही घटना भारती ताईंच्या आयुष्याला खूप मोठे वळण देणारी होती. कारण घरच्या सर्व शेतीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही मुख्यतः अरुण कुशारे यांच्यावरच होती.
या घटनेनंतर कुटुंबाचा मुख्य आर्थिक स्रोत असणाऱ्या शेतीचे पुढे काय? हा मोठा प्रश्न होता. कारण ५०-६० लाखांचा कर्जाचा डोंगर हा समोर उभा होता. यासोबतच एक लहान मुलगा व मुलगी यांची जबाबदारी होती. द्राक्षाचा सिझन सुरु झालेला होता. मग घरातील इतर सदस्यांनी ज्यामध्ये भारती ताईंचे दीर व भाऊ हे जमेल तसे शेतीत लक्ष ठेवत होते. भारती ताई खचून गेलेल्या होत्या. साधारण ४ ते ५ महिन्याचा काळ लोटला आणि मग हळूहळू सावरत असताना पुढे ताईंनी घराचा मुख्य आधार असणाऱ्या या शेतीला एक नवी दिशा देऊन घरावरची ही आर्थिक परिस्थिती बदलविण्याचा निर्धार केला.
पूर्वीपासून शेतीतल्या कामांची सवय ही भारती ताईंना होतीच. पण एवढ्या मोठ्या शेतीचे संपूर्ण व्यवस्थापन स्वतः बघणे. हे मात्र मोठे आव्हान होते. या काळात अनेक चढ-उतार आले. पण ताईंचा निश्चय ठाम होता.
घरातील इतर सदस्य ज्यामध्ये सासू, दीर महेश कुशारे व त्यांची पत्नी यांना शेतीतला तितकासा अनुभव नसला तरी भारती ताईंच्या पाठीशी हे सर्व खंबीरपणे उभे होते. भाऊ संदीप भोसले यांचा शेतीत लागणाऱ्या खतं-औषधांचा व्यवसाय असल्याने आणि एकूणच शेतीतील चांगला अनुभव असल्याने त्यांचा आधार खूप महत्वाचा होता.
आपल्यावर असणाऱ्या कर्जाची रक्कम ही खूप मोठी आहे. ती मिटवण्यासाठी शेती हाच मुख्य आधार आहे, त्यामुळे या शेतीत आधुनिक बदलांसोबत जाणे आवश्यक आहे. हे ताईंनी ओळखले होते. पुढे या १५ एकर क्षेत्रात द्राक्षातील शरद, सोनाका या व्हरायटींची लागवड करत द्राक्षासोबत डाळिंब आणि टोमॅटो पिकाची लागवड केली. यात खतं औषधांच्या नियोजनात भाऊ संदीप यांची मदत झाली. 
शेतीतील प्रक्रिया आणि द्राक्ष निर्यातीत Sahyadri Farms चे मार्गदर्शन घेत शेतीत चांगले उत्पन्न काढण्यास सुरुवात झाली होती. 
यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर हा मुख्यतः कर्जफेडणी आणि शेतीत भांडवल म्हणून करण्यात आला. याच जिद्दीने काम करत काही वर्षांतच संपूर्ण कर्जाची परतफेडणी शेतीच्या माध्यमातून करून शेतीला नवनवीन दिशा देण्याचा प्रवास सुरु होता.
पुढे अतिपाऊस, हवामानातले बदल व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीत अनेक आव्हाने समोर येत होती. या दरम्यान शाश्वत निर्यातक्षम द्राक्ष वाण भारतात आणून 'सह्याद्री फार्म्स'ने एका वर्षात दुबार काढणीचा यशस्वी प्रयोग करत आरा-१५ ही द्राक्षाची व्हरायटी उपलब्ध केली. 
ताईंनी यापुढे संपूर्ण क्षेत्रात द्राक्ष पिकाची लागवड करण्याचे नियोजन करत आरा-१५ या वाणाचीदेखील लागवड आपल्या शेतीत केली आहे. काही वर्षांपूर्वी आपल्यावर असलेल्या अनेक आव्हानांना कुटुंबाच्या साहाय्याने तोंड देत आजही ताई हिंमतीने उभ्या आहेत. त्यामुळे परिस्थितीने खचून न जाता आपल्या आधुनिक दृष्टिकोन व उत्तम व्यवस्थापनाच्या जोरावर जिद्दीने वाटचाल करणाऱ्या सह्याद्रीच्या ह्या नवदुर्गेस सलाम!


Tags:    

Similar News