आपण आपल्या मुलींना सौंदर्यचौकटीत ठाकूनठोकून बसवतोय का? रंग, सौंदर्य, शरीराचे आकार याच दृष्टीकोनातून मुलींच्या जीवनाला महत्त्व येतं का? तिचा कष्टाळूपणा, विचार, बुद्धीने बहरलेल्या व्यक्तिमत्वाला सौंदर्यापुढे किंमत नसते का? जुनाट निकषांच्या पुढे जात सौंदर्याच्या बंदिस्त चौकटीत न बसणा-या मुली #StopTheBeautyTest या मोहिमेत आपल्या 'दिसण्याचा'मोकळा श्वास कसा घेतायत जाणून घ्या मेधा कुळकर्णी यांच्याकडून...
बाळाला मालिश, आंघोळ घालणाऱ्या बाई ते करताना बाळांशी बोलतात. बाळ मुलगी असेल तर साय-हळद लावताना म्हणतात, गोरीपान दिसूदे बाय ती. नाकाला दोन बाजूला दोन्ही अंगठ्यांनी दाबताना म्हणतात, नकटं नाक वर येऊदे, सरळ होऊदे. लहानपणी लावलेल्या साय-हळदीने सगळ्यांनाच गोरा रंग मिळता, तर काळ्या-सावळ्या मुलीच अस्तित्वात नसत्या. नाक दाबल्यामुळे वर आलं असतं, तर सर्वच मुली सरळ नाकाच्या झाल्या असत्या. #StopTheBeautyTest नावाने Dove या कॉस्मेटिक कंपनीने मोहीम सुरू केलीये, त्या संदर्भात हे नव्याने जाणवलं.
मैत्रिणीला जुळ्या मुली झाल्या, तेव्हा त्यातली एक लख्ख गोरी आणि एक सावळ्या रंगाची होती. सावळ्या मुलीला जावळ दाट होतं. सगळ्यांनी सावळ्या मुलीसाठी सांत्वन सुरू केलं. सावळी असली तरी जावळ छान आहे. चेहरा स्मार्ट आहे. तुकतुकीत कांती आहे. मोठेपणी रंग उजळेल वगैरे. गोऱ्या मुलीला मात्र विरळ जावळ असूनही तिचं गोरं असणंच पुरेसं होतं. अगदी नव्याने जन्माला आलेल्या बाळालाही त्याचं म्हणून एक व्यक्तिमत्व असतं. त्या व्यक्तिमत्वाला बाजूला सारून आपण त्याला आपल्या सौंदर्यचौकटीत ठाकूनठोकून बसवायला जातो. कुरूपच वाटतं असं करणं.
लग्नाच्या बाजारात तर सगळं फारच ओंगळ असतं. २०२० साली Dove ने पाहाणी केली. त्यात आढळलं की १० पैकी ९ लग्नइच्छुक मुलींना वाटतं की स्वत:च्या 'दिसण्याला' लग्न ठरवाठरवीत नको इतकं महत्व दिलं जातंय. नकाराचं कारणही ते 'दिसणं'च ठरतं. ६८% मुली या सगळ्यात आत्मविश्वासच गमावून बसतात. ४६% मुलींना आपण पुरेशा सुंदर नाही असं वाटतं. यामुळे त्या नाराज राहातात. सावळ्या मुली स्वत:चे फोटो फिल्टर लावून ब्राइट करून इतरांना पाठवतात. बांधेसूदपणा नसला की पूर्ण अंगाचे फोटो काढणं टाळावसं वाटतं. कुणाला जन्मजात लाभलेले कुरळे केसदेखील लग्न ठरण्याच्या आड येतात. ८०% मुलींना घरीदारी सतत सांगितलं जातं की अमूकतमूक सौंदर्यप्रसाधन वापरा म्हणजे रंग उजळेल...वगैरे.
डवने सुरू केलेल्या मोहिमेचा आधार ही पाहाणी आहे. सौंदर्याच्या बंदिस्त चौकटीत न बसणा-या मुली या मोहिमेत मोकळेपणे बोलतायत. सांगतायत, की काळे-गोरेपणा वा तथाकथित सौंदर्य नि शरीराची मापं यापलीकडे आपली हुशारी, बुद्धी, कष्टाळूपणा वगैरे सगळं असतं. यानेच खरं व्यक्तिमत्व आकाराला येतं. असं असताना त्या जुनाट निकषांना धरून का बसायचं? आत्मविश्वासाच्या जोरावर यशाची मोठी शिखरं सर करता येतात.
डवच्या या मोहिमेत युनिसेफही सहभागी आहे. युनिसेफच्या कंट्री डायरेक्टर यास्मिन हक यांच्यासह अनेकजण सांगतात की जुनाट मानसिकता बदलणं हेच मोठं आव्हान पूर्वीप्रमाणे आजही आहे. त्वचा, शरीर, मन यांचं आरोग्य प्रत्येक स्त्रीपुरूषाने अवश्य सांभाळायला हवं. मात्र रंग, शरीराचे आकार यावरून कुणाला कमी लेखणं हे फारच क्रूर आहे. हे थांबवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग #StopTheBeautyTest मोहीम डवने सुरू केलीये. त्याबद्दलची जाहिरातही बघण्याजोगी.
(जाहिरातीची लिंक)
सौजन्य : Dove India
सध्या घरी नवजात बाळीच्या सहवासात आहे. तिचं आणि तिच्यासारख्या सगळ्याच बालिकांचं व्यक्तिमत्व बहरण्यात हे असले कोणतेच अडथळे यायला नकोत.
-मेधा कुळकर्णी
#निमित्त_निहारिका