यातच त्यांची समाजाशी जुळलेली नाळ दिसून येते

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे पॉक सिंगर रेहाना, पुर्व पॉर्न स्टार मिया खलीफा, कमला हॅरिस यांची भाची मिया हॅरिस, सामाजीक कार्यकर्ती जेसींडा आणि अन्य आंतरराष्ट्रीय कलाकारांवर टीका होतेय या टीकेला सामाजीक कार्यकर्ते आनंद शितोळे यांनी आपल्या लेखातून उत्तर दिलं आहे.;

Update: 2021-02-04 09:45 GMT

रिहाना, ग्रेटा यांचे ट्विटर हँडल चालवणारी वेगळी टीम असते ज्यामध्ये माहितगार आणि जाणकार लोक असतात ज्यांना अनेक बाबींचे आणि भाषेचे ज्ञान असते, एक चुकीचा शब्द आणि आपल्या क्लायंटचा बाजार उठेल, भयंकर ट्रोल होऊन प्रतिमाभंजन होईल हा धोका असतो आणि याची नीट जाणीव त्यांना असते. त्यांनी कुठल्याही प्रकारे भारताच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ केलेली नाही ना कायदे मागे घ्यायला सांगितलेत ना सरकारला काही सूचना केल्यात.भारताच्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार आंदोलन करणाऱ्या भारतीय नागरिकांना पाठिंबा दर्शवलेला आहे आणि मागण्यांवर विचार व्हावा अस मत व्यक्त केलेले आहे.

या व्यक्ती नेहमीच व्यक्त होतात आणि मानवाधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, आरोग्य, जातीय धार्मिक सलोखा या बाबींवर जगभरात कुठेही काही अनुचित घडलं तर सगळ्याच देशातले लोक या पद्धतीने व्यक्त होतात. अमेरिकेतील समाज स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे आणि तिथली माध्यम आपला बोलण्याचा हक्क प्राणपणाने जपतात. एका अश्वेत व्यक्तीला पोलिसी अत्याचाराला बळी पडायला लागल्यावर तिथल्या सगळ्याच समाजाने भेदभाव न ठेवता वर्णभेदाचा निषेध केलेला होता.

अमेरिकन अध्यक्षपदी आपण पुन्हा येत नाहीत हे समजल्यावर ट्रम्पने जो थयथयाट केला आणि हिंसक वक्तव्य केली त्याबद्दल माध्यमांनी जाहीरपणे वाभाडे काढलेच मात्र सोबत त्यांची सोशल मीडिया खाती काही काळासाठी बंद करण्याची कारवाई या कंपन्यांनी केली.

रिहाना सारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्ती सातत्याने ट्रम्प अध्यक्षपदी विराजमान असताना सातत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करत असत आणि त्यासाठी त्यांना काही काळासाठी ट्रम्प आणि समर्थकांच्या रोषाला सामोर जाव लागलेलं आहे मात्र त्या भीतीने त्यांनी बोलण बंद केलेलं नव्हत.

रिहाना अश्वेत गायिका आहे, ग्रेटा थनबर्ग पर्यावरण विषयक चळवळीत काम करणारी छोटी मुलगी आहे. ज्यांनी मिळवलेली प्रसिद्धी कुठल्याही सरकारी कृपेने वा सरकारी समर्थनाने मिळालेली नाही तर उलट रिहानाने आपल्या कलेच्या जोरावर आणि ग्रेटा ने अनेक देशाच्या सरकारच्या विरोधात चळवळ उभी करून मिळवलेली आहे.

या लोकांपर्यंत शेतकरी आंदोलन पोहोचले कसे ?

अनेकांना विशेषतः सरकार समर्थकांना हा कट वगैरे वाटत असेल मात्र वास्तव वेगळच आहे. दोन महिने भारतासारख्या कृषीप्रधान देशातले शेतकरी देशाच्या राजधानीच्या सीमेवर आंदोलन करताहेत, थंडीत कुडकुडत रस्त्यावर बसलेले आहेत आणि हे आंदोलन पक्षीय नाही तर सामान्य शेतकऱ्यांच्या संघटनानी उभारलेल आहे. हि घटना अभूतपूर्व आहे. साहजिकच आंतरराष्ट्रीय माध्यमांचा रोख तिकडे वळला नाही तर नवलच.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनात सुरुवातीपासून मोठ्या संख्येने शीख आणि पंजाबी समुदाय सामील झालेला आहे. हा समुदाय मूलतः धाडसी आणि उद्योजक प्रवृत्तीचा आहे. या समुदायात अजूनही फाळणीच्या जखमा मनावर असलेले मुठभर लोक जिवंत आहेत. शेतीमधून भागत नसल्याने, शेतीचे कालानुरूप कुटुंबात विभागणी होऊन तुकडे झाल्याने अनेक कुटुंब स्वातंत्र्यपूर्व काळापासून परदेशात जाऊन स्थायिक झालेले आहेत. त्यामध्ये अमेरिकेला लागून असलेला कॅनडात मोठ्या संख्येने शीख लोकसंख्या असलेला देश आहे आणि तिथे सरकारी धोरणावर प्रभाव टाकावा एवढी त्यांची ताकद लक्षणीय आहे.

शिखांची धार्मिक प्रतिक असलेली पगडी, दाढी, कृपाण या बाबी बाळगायला एकजुटीने कायदे करून घेऊन त्यांनी अनेक देशात परवानगी मिळवलेली आहे आणि अनेक देशात सरकारी नोकरीत किंवा पोलिसात सुद्धा हे लोक आहेत. अल्पसंख्य असल्याने हा समुदाय कुठेही एकजुटीने राहतो. अभारतीय शीख-पंजाबी समुदायाची आर्थिक ताकद मोठी आहे. अशावेळी आपले भाऊबंद आंदोलनात उतरलेले असताना परदेशातील समुदायाने आर्थिक रसद भारतात पोहोचवली आहेच त्याच प्रमाणे या आंदोलनाची माहिती विदेशी वृत्तसंस्था, स्थानिक सरकार यांना देऊन पाठींबा मिळवायला त्यांनी प्रयत्न केले असतील तर ते गैर नाहीये.

खरतर भारतासाठी आणि भारत सरकारसाठी या परदेशी सेलिब्रेटी, वृत्तसंस्था, राजकीय प्रतिनिधी यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल व्यक्त केलेली काळजी हा धोक्याचा संदेश आहे, हे आंदोलन देशापुरत मर्यादित राहिलेलं नसून त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली असताना लोकशाही पद्धतीने सत्तेवर आलेल्या भारत सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर नाचक्की होऊ शकेल. समाज माध्यमात दिल्लीच्या सीमेवर उभी राहिलेली तटबंदी सगळ्या जगाने पाहिलेली असताना सरकार संवादाचे पूल बांधायचे सोडून तटबंदी उभारून चर्चेचे दरवाजेच बंद करणार असेल तर त्याचे पडसाद देशविदेशातील वेगवेगळ्या लोकांत उमटणे साहजिकच आहे.

या सेलिब्रेटींनी केलेल्या आवाहनाला उत्तर म्हणून आंदोलकांशी चर्चा करणे, खुली पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडणे या बाबी शक्य असताना सरकार भारतातल्या तथाकथित सेलिब्रेटी आणि आपल्या आयटीसेलला जर प्रत्युत्तर द्यायला उतरवणार असेल तर हि अजून मोठी नाचक्की आणि नामुष्कीची बाब ठरेल.

गंमतीचा भाग म्हणजे नोटाबंदी असो, नागरिकत्व कायद्याच्या विरोधातली आंदोलन असोत, शेतकरी आंदोलन असोत किंवा लॉकडाऊन काळात स्थलांतरित मजुरांची झालेली परवड असो, या तथाकथित भारतीय सेलिब्रेटी लोकांना आपल्या घरातल्या रेसीपीचे फोटो समाज माध्यमात टाकावेसे वाटले मात्र ज्या सामान्य जनतेने आपल्याला सेलिब्रेटी बनवले त्यांच्या विषयी संवेदना दर्शवणारे एखादे ट्वीट अथवा पोस्ट टाकावीशी वाटली नाही यातच यांची समाजाशी जुळलेली नाळ कशी आहे ते दिसून येते.

- आनंद शितोळे

Tags:    

Similar News