Successful BusinessWoman : बहुरंगी उज्ज्वला हावरे
अवघ्या २८ व्या वर्षी बांधकाम व्यवसायात पर्दापण करत ‘हावरे बिल्डर्स’ची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेणाऱ्या उज्ज्वला हावरे... SUCESSFUL BUSINESSWOMEN तर आहेतच... पण त्यांचं आयुष्य म्हणजे कठीण प्रसंगांची एक मालिकाच... कठीण परिस्थितीवर मात करत माणूसपण जपणाऱ्या उज्ज्वला हावरे नेमक्या कशा आहेत ? त्यांच्या आवडीनिवडी सोबतच त्यांनी लोकहितासाठी केलेल्या कार्याचा लेखाजोखा श्रद्धा बेलसरे खारकर यांनी आपल्या लेखणीतून मांडला आहे.;
उंच, उजळ वर्णाची, भावपूर्ण डोळ्यांची, देखणी, उज्ज्वला पहिल्या भेटीतच मला खूप आवडली. माझी मानसकन्या यशोमती ठाकूरची ही जवळची वर्गमैत्रीण! तिची माझी पहिली भेट बहुदा माझ्या ऑफिसमध्येच झाली असावी. ती मुंबईतली प्रख्यात 'हावरे बिल्डर्स'ची मालकीण आहे हे समजल्यावर मी एक पाऊल जरा मागेच सरकले! कारण अशा श्रीमंतांपासून मी जरा दूर राहणे पसंत करते. पण उज्वलाने तिच्या साध्या राहण्याने आणि निर्मळ वागण्याने माझ्या मनातली शंका नकळत दूर केली. तिचे आयुष्य म्हणजे कठीण प्रसंगांची एक मालिकाच आहे. पण तिच्या चेह-याकडे बघितल्यावर मात्र याची जराशीही कल्पना येत नाही.
महिला बहुधा या क्षेत्रात येत नाहीत आणि ज्या काही महिला आहेत त्या अनेकदा त्यांच्या नव-याच्या किंवा वडिलांच्या भागीदार म्हणूनच तिथे असतात.पण उज्वलाचे तसे नाही. पतीच्या अकाली निधनानंतर वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी या मुलीने 'हावरे बिल्डर्स'ची धुरा सरळ आपल्या खांद्यावर घेतली. त्यावेळी तिची मोठी मुलगी २ वर्षाची आणि धाकटा मुलगा अवघा १०दिवसांचा होता!
ती मुळात वास्तूतज्ञ आहे. त्यामुळे सुंदर सुबक इमारतींचे नकाशे तयार करणे हे तिला माहित होते पण अंगावर पडल्यावर तिने हे काम मोठ्या हिकमतीने पुढे नेले आणि आज ती महाराष्ट्रातील एक मोठी आणि यशस्वी बांधकाम व्यावसायिक आहे. नोटाबंदी, रेरा कायदा आणि आता कोरोनाच्या काळात बांधकाम व्यवसाय पुरता मोडीत निघाला असताना उज्वला मात्र सचोटीने आणि जिद्दीने काम करत उभी आहे. आजवर तिने अक्षरशः लाखो लोकांना घरे दिली आहेत. यावर्षी तर या मुलीने २२ मजली इमारत बांधण्याचा विक्रमही केला. विशेष म्हणजे ही सर्व व्यावसायिक कामे चालू असताना ती तिचे छंदही जोपासते. उज्वला उत्तम चित्र काढते. अधूनमधून तिची चित्रे बघायला मिळतात.
एकदा आम्ही मैत्रिणी हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. जेवताना काही पदार्थ उरले होते बील देताना तिने वेटरला सांगितले, 'मला राहिलेल्याचे पार्सल करून द्या.' एवढी श्रीमंत बाई असं का करत असावी असे मला वाटले. बहुधा ते माझ्या चेह-यावर तिला दिसले असावे. ती म्हणाली, 'ताई, हे अन्न आहे. इथे वाया जाईल.' कुणा गरीबाला देता येईल .
पती सतीश हावरे यांच्या स्मरणार्थ उज्वला दरवर्षी एका समाजसेवी संस्थेला मोठा पुरस्कार देते, एक तरी रुग्णवाहिका गरजू संस्थेला देते. याशिवाय लोकोपयोगी काम करणा-या अनेक संस्थाना ती मदत करत असते. ही मदत करण्यापूर्वी ती त्या त्या संस्थाना स्वत: भेट देवून त्यांचे कामकाज समजावून घेते. तिने केलेल्या अशा अनेक कामांचा कधीही गाजावाजा केला नाही. मलाही हे काहीच माहित नव्हते. तिचे काम फारसे कुणाला माहितही नाही. अमरावती जवळच्या समाजसेवक श्री. बाबा पापळकर यांच्या अनाथ मुलींसाठी तिने एक वस्तीगृह बांधून दिले. मुंबईतल्या एका अनाथ बालीकाश्रमात ती आठवड्यातून एक दिवस फक्त त्या छोट्या मुलांना खेळवण्यासाठी जाते. तिची स्वत:ची एक मोठी शाळाही आहे. त्या शाळेचे काम जोरात सुरु आहे. तिथे वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग केले जातात.
मी मुंबईला असताना माझे ऑफिस नरीमन पॉइंटला होते. तिचे जवळपास कुठेही काम असले की उज्वलाची माझ्या ऑफिसला भेट नक्की असायची. तिचा फोन आला की मी तिच्या येण्याच्या वेळेस तिची आवडती शेवपुरी मागवून ठेवत असे. मग आमचा गप्पाचा फड रंगायचा. पुष्कळ वेळेस आम्ही खरेदीसाठी बरोबर भटकत असू. खरेदी करताना तिच्यातला कलाकार पाहायला मिळतो. काहीही खरेदी करताना ती फार चोखंदळ असते. हलक्या सुखद रंगाचे कपडे तिला आवडतात.
आयुष्यात पतीचे निधन, अकाली अंगावर पडलेली मोठी जबाबदारी, बांधकाम व्यवसायातील रोजच्या अडीअडचणी, व्यवसायातील बिरादरांचा त्रास अशा अनेक घटना घडल्या पण तिने कधी स्वत:चे संतुलन बिघडू दिले नाही. किंवा कधी आवाजही वाढू दिला नाही. शांत डोक्याने, स्थिर चित्ताने ती कोणताही निर्णय घेत असते. तिचा कामावरचा फोकस ठरलेला असतो. त्यात ती सहसा बदल करत नाही. त्यामुळे तिचे काम चोख आणि वेळेत पार पडते.
उज्वलाला खूप मैत्रिणी आहेत. विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांना भेटायला तिला आवडते. दर महिन्याला मैत्रिणीची मैफल जमवून गप्पा मारायलाही या 'करियर वूमन'ला आवडते. ती अत्यंत संवेदनशील आहे. अगदी छोटी गोष्ट झाली तरी ती धावून येते. मी ठाण्यात राहत असताना मला अचानक स्पाँडीलायटीस त्रास सुरु झाला होता. वेदनेने मी त्रस्त होते. एकदा फोनवर बोलताना ती म्हणाली, 'ताई तुमचा आवाज असा का येतोय? बरे नाही का?' मी म्हटले, 'हो ग. थोडा त्रास होतोय.' जुजबी बोलून तिने फोन संपवला. नंतर तासाभरात आपली सगळी कामे बाजूला ठेऊन ही पठ्ठी ठाण्यात हजर! मी म्हटले, 'तू अचानक कशी आलीस?' त्यावर ती म्हणाली, 'ताई, तुमचा आवाज ऐकूनच माझ्या लक्षात आले तब्ब्येत चांगली नाहीये. मग मला कसे राहवेल?' मग माझी औषधपाण्याची सगळी चौकशी करून, 'ताई पुन्हा असे करू नका. बरे नसेल तर सांगत जा. काही लागले-सवरले तर हक्काने कळवा.' असे बजावून ती परत गेली.
ठाण्यात असताना मला तिचा खूप आधार वाटायचा. अजूनही वाटतो. कारण माझ्याकडून फोन करायचे राहिले तर तिचा फोन येतोच. घरी येण्याचे निमंत्रण मिळते. ठाणे सोडताना मन थोडे विचलित झाले होते. सामानाची बांधाबांध सुरु होती. घरभर पसारा पडला होता. आणि उज्वला आली आणि म्हणाली, 'ताई, काही मदत हवीये का?' मी म्हटले 'मुव्हर्स आणि पॅकर्स'ला काम दिले आहे. पण घर सोडताना थोडे वाईट वाटतेच ना ग!' त्यावर ती म्हणाली, 'साहजिकच आहे. पण तुम्ही काळजी करू नका, नवी मुंबईत तुमचे एक घर आहेच हे लक्षात असू द्या. तिथे तुमच्यासाठी भरपूर जागा आहे. कधीही या.' उजव्लाचे घर खूप सुंदर आहे. एखाद्या कलावंताचे असावे इतके नीटनेटचे आणि तिची उच्च अभिरुची सूचित करणारे! काही श्रीमंतांची घरे ही फर्निचरच्या दुकानासारखी किंवा म्युझियमसारखी भासतात. तिथे जीव गुदमरतो. उज्वलाचे घर मात्र तिची कलासक्त प्रकृती दाखवते. तिचे घर अतिशय अथित्यशील आहे. उज्वलाबरोबरच तिच्या घरी गेल्यावर तिच्या आईच्या हातचे चवदार पदार्थ चाखायला मिळतात. अगदी ५०/६० मैत्रिणी येणार असतील तरी तिच्या आई स्वत:च्या हाताने गुलाबजामून करणार हे ठरलेलेच असते! अथित्याचा, साध्या राहणीचा संस्कार तिला तिच्या आईकडूनच मिळाला आहे.
उज्वला मुळची अमरावतीची. जरी ती मुंबईत स्थायिक झाली असली तरी आपल्या गावाची नाळ ती विसरली नाही. अमरावतीतल्या अनेक संस्थाना तिची मदत सुरु असते. ती त्याची वाच्यता स्वत:हून कुठेही होऊ देत नाही.
दोन वर्षापूर्वीच तिने अमरावतीला जगप्रसिद्ध 'एरीना अॅनिमेशनची' शाखा सुरु केली. अशा दर्जाची हे विदर्भातील पहिली संस्था आहे. आतापर्यंत १०० मुलांना यातून शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. दोन वर्षापूर्वी तिने अमरावतीला अॅनिमेशन इंस्टीट्युट सुरु केली. अशा दर्जाची हे विदर्भातील पहिली संस्था आहे. अनेक मुलांना यातून शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. तिने तरुणांना आवडणारे म्हणून एक फास्ट फूड सेंटरही सुरु केले. त्यातूनही लोकांना रोजगार मिळाला. अशी हि माझी मैत्रीण नियतीने जरी तिच्यावर अनेक प्रहार केले असले तरी न डगमगता अनेकाना आधार देत जगवणाऱ्या उज्ज्वलाने आपले नाव खरोखरच उज्ज्वल केले आहे.
*
©️श्रद्धा बेलसरे-खारकर.
मो ८८८८९५९०००