शिवाजी महाराजांचा महिला विषयक दृष्टिकोन:
शिवचरित्र अभ्यासक आणि विचारवंत श्रीमंत कोकाटे यांच्या महिलांचा आदर करणारे शिवराय या लेखातून..,;
शिवाजी महाराजांनी पनवेलजवळचा प्रबळगड किल्ला जिंकला, त्या लढाईत किल्लेदार केसरीसिंह धारातीर्थी पडला. केसरीसिंहाच्या आईला, पत्नीला आणि मुलांना मावळ्यांनी शिवरायांसमोर हजर केले. तेंव्हा शिवरायांनी त्यांना अभय दिले. केसरीसिंहाच्या आईचा आणि पत्नीचा सन्मान करून त्यांना पालखीत बसवून त्यांच्या देऊळगाव या मूळ गावी सुखरूप पाठविण्यात आले. आपला राजकीय विरोधक कोणीही असो त्याच्या आईचा, पत्नीचा, मुलांचा, बहिणीचा आदर, सन्मान आणि संरक्षण करण्याचे शिवरायांचे धोरण होते.
मोगल इतिहासकार खाफीखान लिहितो, ‘‘जसा भाऊ बहिणीशी आणि मुलगा आईशी वागतो, तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे.’’ शिवरायांनी नेहमीच धर्मग्रंथ, धार्मिक स्थळे यासोबतच स्त्रिया आणि लहान मुलांचा सन्मान केला. आपल्या शत्रू पक्षाच्याही महिलांचा सन्मान करावा, ही उच्च कोटीची नैतिकता असते. शिवाजीराजांच्या ठायी अशी नैतिकता होती. म्हणूनच त्यांनी स्वराज्यातील व परराज्यांतील महिलांचे संरक्षण केले. महिलांवर अन्याय करणाऱ्या बाबाजी गुजरला त्यांनी कठोर शिक्षा दिली, हे त्याचे एक उदाहरण. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या त्यांच्या मातुःश्री राजमाता जिजाऊंचा प्रत्येक शब्द त्यांनी महत्वाचा मानला. १६४२ ते १६७४ पर्यंतच्या महत्त्वाच्या घटनाप्रसंगी जिजाऊसाहेब शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. तोरणा किल्ला जिंकणे, अफजलखानाचा वध, आग्रा येथून सुटका, पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका, राज्याभिषेक इत्यादी प्रसंगी शिवाजीराजांनी जिजाऊसाहेबांचा सल्ला घेतला. यातून स्पष्ट होते, की स्वराज्यातील निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग होता.
स्त्रीसुद्धा बुद्धिमान आहे, हिंमतवान आहे, कर्तृत्वान आहे, यावर शिवरायांचा दृढ विश्वास होता. जिजाऊसाहेबांच्या सक्रिय सहभागातून हे स्पष्ट होते, की शिवकाळातील निर्णयप्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले जात असे. शिवाजीराजांच्या महिलाविषयक धोरणामुळेच नंतरच्या काळात संभाजी महाराजांच्या महाराणी येसूबाई, राजाराम महाराजांच्या महाराणी ताराराणी या स्वराज्याच्या रक्षणासाठी निर्भीडपणे पुढे आल्या. शिवरायांच्या सुनांनी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून रणांगण गाजविले, सिंहासनावर बसून राज्यकारभार केला. हे शक्य झाले ते शिवाजीराजांच्या महिलाविषयक धोरणामुळेच
महिलांवर अन्याय करणाऱ्यांची शिवरायांनी कधीच गय केली नाही. महिलांनाही जगण्याचा, सुरक्षित राहण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय करणारा स्वकीय असला तरी शिवरायांनी त्याला कठोर शिक्षा दिली. पोटी मुलगाच जन्माला यावा, अशी अपेक्षा बाळगणारे अनेक लोक आजही आहेत. वंशाला दिवा मुलगाच असतो, असे समजणारेही लोक अनेक आहेत. महिलांचा अनादर म्हणजे शूरपणा वाटणारे महाभाग आहेत. अशा अनिष्ट परंपरा नष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या महिलांबाबतच्या धोरणाची आजही गरज वाटतेय. आपल्या राजकीय, धार्मिक विरोधकांच्या महिलांचादेखील आदर, सन्मान, संरक्षण करणे हेच खरे शिवकार्य आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, त्यांना संधी देणे हे शिवकार्य आहे. राजकीय लढा चालूच राहील; पण त्या राजकीय लढ्यातदेखील विरोधी बाजूच्या महिलांचा सन्मान करणे, ही खरी शिवभक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक जीवघेणे प्रसंग आले. पण त्यांनी नैतिकता कधीही सोडली नाही. औरंगजेब, दिलेरखान, शाहिस्तेखान, अफजलखानाबरोबर संघर्ष केला. पण त्यांच्याही महिलांचा शिवाजीराजांनी आदर केला. महिलांचा आदर करण्याची प्रेरणा शिवचरित्र नेहमीच देत राहील
छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्री-सन्मानाचे एक आदर्श होते. त्यांच्या विचार आणि कार्यातून स्त्रियांवरील अन्याय आणि अत्याचार कमी करण्याचा प्रयत्न दिसून येतो. आजच्या स्त्री-पुरुष समानतेच्या युगात महाराजांच्या विचारांचा आदर करणे आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेणे गरजेचे आहे.