'रानडे इन्स्टिट्यूट'च्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशी आज बोलत होतो. तेव्हाच, ॲड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन झाल्याची बातमी आली. मग विद्यार्थ्यांना मी सांगत होतोः
ही गोष्ट १९९९ ची. तेव्हा मी सोलापुरात 'संचार'चा संपादक होतो. ॲड. अपर्णा या आमचे ज्येष्ठ संपादक मित्र अरूण रामतीर्थकर यांच्या पत्नी. पतीला अचानक विकलांगपण आले, तेव्हा अपर्णा जिद्दीने उभे ठाकल्या. पदर खोचून घराबाहेर पडल्या. मुलगा मोठा झाल्यानंतर त्यांनी 'लॉ' पूर्ण केले. पतीच्या निधनानंतर सगळ्या घराची जबाबदारी त्यांच्यावर आली. मुलाला त्यांनी वाढवले. त्याचा संसारही उभा केला.
तेव्हा, मी आणि ॲड. अपर्णा शेजारीच राहायचो. त्यांना एक-दोनवेळा बाइकवर लिफ्ट दिल्याचेही मला आठवते. सुरूवातीपासून त्यांचा कल उजव्या विचारांकडे होताच, पण तेव्हा त्या तुलनेने 'सेन्सिबल' होत्या. माझे वाईचे आंबेडकरभक्त मित्र सतीश कुलकर्णी यांच्या त्या जवळच्या नातेवाईक. त्यामुळेही गप्पा होत असत. तेव्हापासूनच त्यांना मीडियाची हौस होती, पण 'नॉनसेन्स' विधानांना 'मीडिया ॲटेन्शन' मिळण्याचा तो काळ नव्हता. मीडियाचे स्वरूप आणि प्रभावही मर्यादित होता. अटलबिहारी वाजपेयी तेव्हा पंतप्रधान होते. 'वाजपेयींच्या कविता' या विषयावर आम्ही एकदा बोलल्याचे आठवते. वाजपेयींची भाषा, मांडणी संयत आणि संविधानिक होती. पाकिस्तानशी मैत्री करण्याच्या वाजपेयी यांच्या आश्वासक प्रयत्नांवर तेव्हा मी रविवारच्या पुरवणीत- 'इंद्रधनु'ला कव्हर स्टोरीही केली होती.
अपर्णा भाजपशी सलगी असणा-याच, पण तेव्हा तुलनेने संयत भाषेत बोलत असत. त्या मूळच्या रंगभूमीवरच्या अभिनेत्री. त्यामुळे तशा कलासक्तही.
नंतर त्यांच्याशी माझा संपर्क राहिला नाही. पण, मीडियातून त्या दिसत राहिल्या. विखारी विधानांना वलय आणि संरक्षण मिळते, असा काळ येत गेला, तसतशी त्यांना प्रसिद्धी मिळत गेली.
'सामाजिक' काम करतानाच, भयंकर, विखारी, अशास्त्रीय, असंविधानिक असं काहीबाही त्या बोलत राहिल्या. जातपितृसत्ताक व्यवस्थेच्या वाहक होत, जनमानस बिघडवत राहिल्या.
या कालावधीत त्यांच्याशी एकदा बोलायला हवे होते. पण राहून गेले. आता तर ते अशक्यच आहे.
दिवंगत ॲड. अपर्णा यांना आज श्रद्धांजली वाहताना, त्याहून मूलभूत अशा काही मुद्द्यांचा विचार करायला हवाः
विखाराला वलय आणि अधिमान्यता मिळते कशामुळे?
तुम्हाला एक गंमत सांगतो.
तेव्हा मी 'साम टीव्ही'चा संपादक होतो. 'आवाज महाराष्ट्राचा' नावाचा शो होस्ट करत होतो. एके दिवशी माझ्या नेहमीच्या सलूनमध्ये हेड मसाज करत होतो. (गेले ते दिवस!) तेव्हा माझ्या शेजारी एक गृहस्थ दाढी करवून घेत होते. ते त्या सलून मालकासोबत मुस्लिमांबद्दल काहीतरी अर्वाच्च बोलत होते. गाईवरून तेव्हा बरीच चर्चा सुरू होती. हे त्याबद्दलही बोलत होते. मला त्या रात्री त्याच विषयावर शो करायचा होता. मी त्यांना म्हटले, 'तुम्ही हेच टीव्हीवर येऊन बोलाल का?' सलूनचा मालक माझा मित्र. तो हसू लागला. 'काय साहेब, यांना काय झेपणार आहे टीव्ही?' पण, मी त्यांना तयार केले. त्या दिवशी ते टीव्हीवरच्या डिबेटमध्ये येऊन वचावचा बोलले. मी त्यांना ठोकठोक ठोकले.
माझा शो हिट्ट झाला, म्हणून मी खुश. आणि, आपण टीव्हीवर चमकलो, म्हणून त्यांनाही आनंद!
आज हाच पुरूष हिंदुत्वाचा - ब्राह्नण्याचा प्रवक्ता म्हणून जगभरातल्या सर्व वाहिन्यांवर झळकतो. माझ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला तो विसरत नाही.
विखाराच्या या प्रवक्त्यांना स्पेस दिली कोणी?
'सनातन संस्थे'सारख्या असंविधानिक संघटनेला टीव्हीवर झळकवले कोणी? आपल्या शोमध्ये 'ड्रामा' यावा म्हणून आम्ही लोकांनी काठावरच्या लोकांनाही विखाराकडे ढकलले. आणि, विखाराला वलय दिले. मुख्य म्हणजे अधिमान्यता दिली.
गांधी जयंतीला गांधीवाद्यांसोबत चर्चा करण्यापेक्षा काही ड्रामा हवा. म्हणून नथुराम 'पुण्यतिथी' साजरी करणा-या पनवेलच्या एका वाह्यात माणसाला आम्ही पॅनलमध्ये बसवले. आणि, आम्ही पॅनलमध्ये बसवतो, म्हणून तो दरवर्षी 'नथुराम पुण्यतिथी' भक्तिभावाने साजरी करतो!
'जगाला प्रेम अर्पावे' असे साधे विधान डिबेटला ठेवले तरी आम्हाला हिंसेचा प्रवक्ता हवा असतो. कारण, त्याशिवाय चर्चेत रंग भरत नाहीत.
एवढेच नाही, ज्यांना आम्ही 'लिबरल, सेक्युलर' म्हणून बोलावणे सुरू केले, तेही अनेकदा असेच आक्रस्ताळे, टोकाची भूमिका मांडणारे. स्टंट्स करणारे! खरेखुरे विचारी, संवादी लोक या चर्चाविश्वातून गायब झाले. संवादच संपला. तुकोबा- ज्ञानोबा सांगायलाही आम्हाला इंदुरीकरांचा 'तडका' आवडू लागला. मग, इंदुरीकरांना आम्ही अधिमान्यता दिली. गाडगेबाबा- तुकडोजी महाराजांच्या महाराष्ट्रात इंदुरीकर हेच एकमेव महाराज उरले!
सोशल मीडियातही अपवाद वगळता तेच झाले. सेक्युलर विचार मांडण्याच्या नावाखाली बेताल, जातपितृसत्ताक अंगाने अतार्किक भाषेत बडबडणा-यांना (ते अपवादही असतील) इकडे मोठे फॉलोइंग आहे. या व्यक्ती विचारी, अभ्यासू, कलासक्त असतीलही, किंवा कदाचित फेकही असतील; पण, संभाषित बदलले की सगळेच बदलते. टीआरपी असो वा व्ह्यूज किंवा लाइक्स यासाठी शैलीही बदलावी लागते. अमुक तुमच्याकडे, तर आमच्याकडे हे आहेत, किंवा व्हाइस ए व्हर्सा, अशा बटबटीत नॅरेटिव्हमध्ये आपण हे विभाजन करून टाकले. व्यक्तिशः चूक कोणाची आहे, असे नाही. संभाषित या स्तरावर येणे, विचारी माणसांनीही फक्त प्रतिक्रियावादी होत जाणे हा विजय विखाराचाच. संभाषणाचे बाकी सारे पैलू आपण विसरलो आहोत का? विचार हा मुख्य प्रवाह आहे आणि विखार हे विपर्यस्त विचलन आहे, हे भान आपण हरवून बसलो का?
'तलाक'च्या नावाखाली मुस्लिम महिलांचे रक्त पिण्याचे समर्थन करणारा मौलाना आम्हाला हवा असतो आणि जातीअंताच्या नावाखाली ब्राह्मणांवर असभ्य टीका करणारा 'पुरोगामी'ही टीव्हीला लागतो. अर्थात, एका मोठ्या खेळाचा हा फक्त भाग आहे!
खळ्ळखट्याळ करणारा पक्ष असो वा तशा व्यक्ती, अशा कितीजणांना आम्ही ग्लॅमर दिलं, याला गणतीच नाही. प्रिंट मीडियाही त्यात मागे कधीच नव्हता. दोन टोकांमध्ये आम्ही देशाचं - जगाचं विभाजन केलं. राजकारण, समाजकारण त्या दिशेनं नेलं. विखारी लोकांना देशाच्या सर्वोच्चपदी बसवलं. जग भंजाळलेलं आहे आणि शहाणी माणसं मूर्खात निघावीत, असा हा काळ आहे. विखाराला उत्तर विखारानेच दिले जात असताना आणखी दुसरे काय होणार?
आता तर विखाराचा चेहरा शोधण्याचीही गरज उरलेली नाही. ती जागा, अपवाद वगळता स्वतः संपादकांनी आणि ॲंकर्सनीच घेतली आहे.
आणि, हे आताच घडते आहे, असे नाही.
'कुत्रा माणसाला चावला, तर ती बातमी नाही. पण, माणूस कुत्र्याला चावला, तर ती मात्र बातमी आहे!', हे जर्नालिझममध्ये कैक वर्षांपासून शिकवले जाते, त्याची ही मल्टिमीडिया अभिव्यक्ती फक्त आहे.
- संजय आवटे
(नोंदः हा कोणत्याही अर्थाने श्रद्धांजली लेख नाही. या संदर्भाने मूलभूत असे प्रकट आत्मचिंतन आहे.)