लष्करात वीस वर्ष सेवा केलेल्या एका डॉक्टरची मुलगी… अनुष्का, सुश्मिता, प्रियांका अश्या अनेकांकडे पाहात मुंबईत येते. व्हीजे असते. चार पाच फिल्म्स करते. एका उदयाला येणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडते. तो आत्महत्या करतो…!!
आणि एक भयाण चक्रीवादळ उठतं. त्या तरुणाचे नातेवाईक भलत्याच राज्यात आरोप काय करतात आणि केंद्र सरकार, राज्य सरकार, डझनभर राजकीय पक्ष त्या वावटळीत काय येतात. चॅनलवरून आक्रस्ताळं आकांडतांडव करत त्या तरुणीला नशेडी, उधळी आणि कोणकोणत्या विशेषणांनी आंघोळ घातली जाते. तिचं चारित्र्य, भूतकाळ, संबंध, याची नाक्यावर चवीने चर्चा होते.
हे ही वाचा...
रिया चक्रवतीला जगू द्यायचं नाही, असं माध्यमांनी ठरवलंय का?
‘कंगना ते रिया’….केंद्रीय महिला आयोगाचा पक्षपात?
तिचे खाजगी संवाद स्क्रिनच्या वेशीवर टांगून बुभुक्षित गप्पा होतात. काहीही संबंध नसताना, विकृत प्रसिद्धीच्या लालसेतून, दुसरी एक अभिनेत्री हीला शिक्षा मिळावी, हे आयुष्याचं ध्येयच बनवते. ईडी, एनसीबी आणि सीबीआय या देशातल्या सर्वोच्च तपासणी संस्था तिला बसवून तासन्तास चौकश्या करतात.
सगळं डिस्टन्स धाब्यावर बसवू माध्यमांच्या बुमच्या गराड्यात तिच्या वडिलांना इमारतीतून आत बाहेर करावं लागतं. ज्याच्या चौपट गांजा या शहरात शेकडो शाळा महाविद्यालयीन मुलं सर्रास घेत असतात, तेव्हढा गांजा जवळ असल्याचा संशय म्हणून तिच्या भावाला अटक होते. आणि या सर्वांवर कडी म्हणजे नुसती चौकशीला जाताना तिच्यावर माध्यमांचे प्रतिनिधी अक्षरशः शारीरिक हल्ला करतात…!!
लक्षात घ्या, रियाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. स्वरा, तापसी यांच्यासारखी तिने कधीही राजकीय भूमिका घेतलेली नाही. कोणत्याही जातीधर्माच्या अगर महापुरुषाच्या बाजूने किंवा विरुद्ध विधानं किंवा चित्रपट केलेला नाही. ती फक्त एक धडपडणारी अभिनेत्री, ज्याला बॉलिवूड 'स्टारलेट' म्हणतं, तशी आहे. तिचे वडील तर माजी लष्करी अधिकारी आहेत आणि तरीही आज तिचा परिवार शब्दशः उध्वस्त झालाय, कोणत्याही आरोपपत्राविना, न्यायालयात पोहोचायच्या आधीच तिची लक्तरं काढली जातायत…
याने तुम्हाला भीती नाही वाटत? तुम्ही कोणत्याही राजकीय मताचे असा किंवा नसा. पण तुम्ही किंवा तुमच्या जवळचे कदाचित एखाद्या प्रसंगात सापडू शकता. तो कोणाला तरी राजकारण पुढे न्यायला महत्त्वाचा वाटेल, कोणाला करिअर, कोणाला टीआरपी आणि मग तुमच्या आयुष्याच्या निर्दय आणि क्रूर चिंधड्या उडवल्या जातील… हे घडतंय आणि तुमच्याशीही घडू शकतं…
समाजाची नीतिमत्ता वगैरे मोठे शब्द आहेत, पण हा ओंगळवाणा तमाशा तुमच्या घरातही घडू शकतो, या कल्पनेने तरी जागं व्हायला पाहीजे…!!!
अजित अनुषशी