बलात्काराची शिक्षा बाई भोगताना...
लिंगपिसाट पुरुषाची शिक्षा महिलेलाच का? पेताड नवरा, माहेरी आली. गावातील व्यक्तीने बलात्कार केला..., बलात्काराची तक्रार केली म्हणून भावाने घराबाहेर काढली.. लहान बाळ घेऊन ती आता रस्त्यावर बलात्काराच्या यातना सहन करतेय... वाचा सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी मांडलेली तिची व्यथा....;
आज सकाळी माँर्निग वाँकला जाताना आम्ही दोघी बोलण्याच्या नादात पुढे गेलो, पण नारायण ने बघितले. की, एक महिला लहान लेकराला घेऊन बसलेली आहे. ती तिथं का बसली असा विचार मनात आला... कदाचित तिच्यासोबत काही तरी घडलेलं असावं. यामुळे मला रस्त्यावरच असताना नारायणने फोन केला.
आम्ही दोघी जणी तात्काळ तिच्याकडे गेलो आणि विचारले, तेव्हा समजले की, ठाण्यात तिने 376चा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि ती परवा पासुन बस स्टँड मध्ये एक रात्र आणि ठाण्यापुढील हाँटेलसमोर एक रात्र तिने जागवत घातली. सहा महिन्याची गरोदर 3 वर्षाची एक लहान मुलगी तिच्यासोबत दिवसा भाकर मागुन तिने दोन दिवस असे रस्त्यावर काढले.
हे ऐकुन फुफाट्यात शालीवर झोपलेलं लेकरू आणि तिला आम्ही घरी घेऊन आलो. घरी आल्यानंतर समजले की, नवरा दारूडा असल्याने दोन वर्षापासून ती माहेरी होती. वडील नाहीत भाऊ दुसरीकडे कामाला अशा परिस्थितीत गावातील एका तरूणाने तिला रात्री साडेआठ वाजता एका महिलेच्या मदतीने संडासला गेलेली असताना नांगरटीत ओढत नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. (एप्रील मध्ये)
ही गोष्ट भावाला कळल्यानंतर एकदा तिला मूल खाली होण्यासाठी खासगी औषध दिले. पण त्याने मूल खाली झाले नाही. मग भावाने तिला जेवणातून विष देण्याचा प्रयत्न केला, पण ती घराचे दार लावून बसली आणि निम्या रात्रीला लहान मुलीला घेऊन पायी चालत तालुक्याला आली.
यासाठी तिला तालुक्यातील महिलांनी मदत केली गुन्हा दाखल वगैरे झाला. पण बदनामी झाल्याने आणि आरोपी फिर्यादी एकाच ठिकाणचे असल्याने भावाने तिला घरात घेण्यास नकार दिला. ज्या महिला कार्यकर्त्यांनी तिला यामध्ये मदत केली त्यांनी ही तिला नंतर सोडुन दिले. यामुळे ती अशी अडचणीत सापडली.
पोलीस अधिकाऱ्यांनी आधारगृहात पाठवण्यासाठी विचारणा केली. परंतु तिने नकार दिला. पण सी सी टिव्ही कँमेरात रात्रभर बाई बसलेली दिसेल म्हणून दुसरीकडे बसण्यास तिला सांगण्यात आले. यामुळे ती कुणी मारण्याच्या भितीने ठाण्यापुढील हाँटेल च्या शटरसमोर रात्रभर बसली.
आज ती अशा अवस्थेत आहे. जिथे तिचा नवरा दारूडा असल्याने माहेर गाठले. तिच्या या एकलपणाचा गैरफायदा एका विवाहित पुरूषाने घेतला आणि तिच्यावर झालेला हा बलात्कार ती सहन करत असुन गरोदरपणाचं ओझे वागवत आहे. नातेवाईकांनी तिला नाकारले महिला कार्यकर्त्यांनी ही वाऱ्यावर सोडले. अशी चौफेर शिक्षा मिळत असतानाच ती आम्हाला भेटली.
बलात्काराची शिक्षा महिलेलाच कुठपर्यंत देणार आहोत? का पुरूषलिंगपिसाट होत आहेत? का का का?
(सध्या तिला दोन साड्या देऊन जेवणाची सोय केलेली आहे. पण तिच्या सोबत लहान मुलगी असुन तिला कपड्याची पौष्टिक आहाराची गरज आहे या महिलेला सध्या आम्ही आधार देत आहोत पुढील आठ दिवस तरी ती आमच्याकडे तात्पुरती राहील. पुढील आठवड्यात तिच्या भावाची आईची भेट घेऊन तिच्याच कुटुंबात तिचे पुनर्वसन होतयं का हे बघणार आहोत. पण सध्या आपण या मायलेकरांसाठी किराणा आणि कपड्यांची मदत करू शकता.)