एक भावनिक जन्मठेप... आता तिचं काय होणार?
आई वडिलांचे पाप मुलांना भोगावं लागतं? आपण असं नेहमीच बोलत असतो. मात्र, एखाद्या मुलीला तिचा बाप महिलांच्या लैंगिक शोषणातून पैसे कमवतोय हे जेव्हा समजले असेल.. तेव्हा त्या मुलीच्या मनावर काय परिणाम झाला असेल? त्या मुलीला कोणत्या समस्यांमधून जावं लागत असेल? या संदर्भात संजीव लाटकर यांचा विशेष लेख...
ती तीन वर्षांची असताना तिच्या आई बाबांचा घटस्फोट झाला. तोही खूप भांडणं होऊन. म्हणजे तिला तो एक मानसिक धक्काच होता. खूप असुरक्षित आणि असहाय्य वाटत असणार तिला त्याही वयात. आईला घट्ट बिलगून झोपत असणार ती. मध्यरात्री दचकून जागीही होत असेल...
मग तिच्या बाबांनी पुनर्विवाह केला आणि तोही एका अभिनेत्रीशी. लग्न खूप वाजलं गाजलं. त्यावेळी तिला आपली आई सेलिब्रिटी आहे, म्हणजे नक्की काय आहे, याचा अर्थ समजला नसेल कदाचित. ती मोठी झाली, शाळेत जाऊ लागली, तेव्हा कदाचित समजू लागलं असेल. तिला या काळात तिच्या मूळ आईची नक्कीच खूप आठवण येत असेल...
मग तिला तिच्या नव्या आईने भाऊ दिला. तेव्हा ती सहा वर्षांची होती. नव्या आईबरोबर सेटल होता होता तिच्या आयुष्यात असं कोणीतरी येणं हा तिला आणखी धक्का होता. ती शाळेत जाऊ लागली. सेलिब्रिटींची मुलगी म्हणून तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तिला संकोचून टाकणारा होता.
मग तिच्या वडिलांचं नाव क्रिकेट बेटिंग मध्ये आलं. पोलिस चौकशी झाली. कोर्टात मॅटर गेलं. तेव्हा तिला समजू लागलं होतं... तिचे वडील हे चांगल्या कारणांसाठी कधीच प्रकाशझोतात आले नाहीत. ती लहान होती, तेव्हा वडिलांनी सर्वात श्रीमंत व्हायचा ध्यास घेतला होता आणि सावत्र आईनं सर्वात सुप्रसिद्ध. घरी बदाबदा पैसे येतायेत, त्यामुळे आपण सुखी आहोत असा समज आई-बाबांनी करून घेतला असेल कदाचित.
आज ती 15 वर्षांची आहे. म्हणजे टीन एजर आहे. मुली लवकर वयात येतात हल्ली. त्यामुळे तीही वयात आली असणार. तिच्या वडिलांचे नाव हे पोर्नो फिल्ममध्ये जोडलं गेलं आहे. तिचे वडील हे अश्लील आणि बीभत्स चित्रपटांचे निर्माते आहेत. आपल्याकडे येणारा पैसा हा महिलांच्या लैंगिक शोषणातून येतोय, हे तिला नक्कीच समजलं आहे. तिच्या कोवळ्या आयुष्यात हा पुन्हा खूप मोठा आणि असह्य असा धक्का आहे.
वडील सध्या पोलीस कोठडीत आहेत. आई खचली आहे. या मुलीने बहुदा मित्र-मैत्रिणींशी संपर्क तोडला असणार. ती कुठे जाऊ शकणार नाही. काय बोलणार मित्रमैत्रिणींशी? यापूर्वीही असे अनेक प्रसंग आले असतील? जेव्हा तिने स्वतःचाच दुस्वास केला असेल.
कदाचित तिला तिच्या मूळ आईची पुन्हा पुन्हा आठवणही येत असेल.. ती आता पूर्वीसारखी मित्र-मैत्रिणींमध्ये मिक्स होऊ शकणार नाही. ती तिच्या वडिलांशी पुन्हा पहिल्यासारखी कनेक्ट होऊ शकणार नाही. तिला स्वतःचं आयुष्य हे खूप बोचणार आणि टोचणार आहे यापुढे. आपलं कसं होणार आहे तिला काहीच कळत नाहीये. ती कदाचित यापुढे शाळेत - कॉलेजात जाऊच शकणार नाही... तिचं शिक्षण अर्धवट राहू शकतं. ती आज कोणाशी काहीच बोलू शकत नाहीये. तिचा धाकटा भाऊ नऊ वर्षांचा आहे. तो असंख्य प्रश्न विचारत असेल कदाचित. ती तिच्या परीने समजावूनही सांगत असेल कदाचित.
पण तिचं आयुष्य हे यापुढे चांगल्या आणि शांत - स्थिर मार्गावर राहील का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तिचा बाप गुन्हेगार असू शकेल. पण शिक्षा मात्र, तिला आणि तिच्या निष्पाप भावाला भोगावी लागणार आहे आयुष्यभरासाठी. ही एक भावनिक जन्मठेपच की!
सगळ्यांचं लक्ष आज तिच्या बापाने केलेल्या गुन्ह्याकडे आणि अश्लील फिल्मच्या विषयाकडे आहे. हे सर्व लक्ष निष्कारण होरपळणाऱ्या निष्पाप मुलांकडे आपण कधी खेचून आणू शकू? कुठलाही बरा-वाईट निर्णय घेताना त्याचे आपल्या मुलांवर काय परिणाम होतील, याचा विचार करायला आपण पालकांना कधी शिकवू?
आपण आपल्या मुलांचे सर्वात मोठे गुन्हेगार आहोत असं त्या बापाला आज तुरुंगातले गज मोजताना वाटत असेल का?
पालकांचं नियमित प्रशिक्षण करत असल्यामुळे आणि सतत मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचा विचार करत असल्यामुळे असेल, पण मला ही बाजूही खुणावतेय अनेक दिवस..
- संजीव लाटकर
साभार फेसबुक पोस्ट