महिलांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा राजा झाला २५० वर्षांचा!

महिलांना त्यांच्या अस्तित्वाची आणि हक्कांची जाणीव अगदी अठराव्या शतकात करून देणाऱ्या राजा राम मोहन रॉय यांचं हे २५० जन्मशताब्दी वर्ष आहे. नुकतीच त्यांची जयंती साजरी केली गेली. पुर्वेकडील राजा राम मोहनन रॉय यांच्या विचारांचा वारसा पुढे पश्चिमेतील महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवला. त्यांच्या या जयंतीनिमित्त राहूल माने यांनी लिहिलेला RAJA @ 250 ! हा लेख वाचायलाच हवा.;

Update: 2022-05-25 11:55 GMT

 RAJA @ 250 !

राजा राममोहन रॉय (२२ मे १७७२ ते २७ सप्टेंबर १८३३) यांचा जन्म पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील राधानगर येथे झाला. त्यांनी पाटणा येथे शिक्षण घेऊन उच्च शिक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांनी पर्शियन आणि अरबी भाषेचा अभ्यास केला. त्यांनी कुराणचे वाचन केले आणि वाराणसीला जाऊन त्यांनी वेद, उपनिषदे आणि हिंदू तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यांनी ख्रिश्चन आणि इस्लामचाही अभ्यास केला.

१८१४ मध्ये त्यांनी आत्मीय सभा, १८२१ मध्ये कलकत्ता युनिटेरियन असोसिएशन आणि १८२८ मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. बहादुरशहा जफर या शेवटच्या मुघल बादशहाचे वडील अकबर शाह (द्वितीय) यांनी रॉय यांना राजा ही पदवी दिली. त्यांनीच रॉय यांना ब्रिटनला आपला राजदूत म्हणून सुद्धा पाठवले.

परवा भारतभर राजा यांची २५० वी जयंती भव्य दिव्य स्वरूपात साजरी झाली. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे कोलकात्यातील राजा राममोहन रॉय ग्रंथालयाच्या आवारात त्यांच्या पुतळ्याचे लोकार्पण झाले. भारत देशातील सर्व भाषांतील प्रकाशित प्रत्येक पुस्तकाची प्रत या ठिकाणी संग्रहित ठेवली जाते हे विशेष! मे २०२२ ते मे २०२३ हे वर्षभर त्यांच्या २५० व्या जयंतीचे कार्यक्रम चालतील.

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया या पुस्तकात राम मोहन रॉय यांचा असा गौरव केला आहे : "भारतीय उपखंडात प्रस्थापित सामाजिक संरचना आणि पारंपारिक व्यवस्थेसमोर आव्हान उभे टाकणारे ते पहिले भारतीय होते. जात, धर्म किंवा इतर कोणत्याही संकुचित पातळीवर काम न करता सामाजिक सुधारणा करणारे सर्वात पहिले व्यक्ती होते."

त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा दिला ज्यामध्ये विधवांचा पुनर्विवाह करण्याचा अधिकार आणि स्त्रियांना मालमत्ता ठेवण्याचा अधिकार समाविष्ट होता. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे १८२९ मध्ये भारतातील सती प्रथा तत्कालीन गव्हर्नर जनरल विलियम बेंटिंक याने कायद्याने समाप्त केली. (पुढे अनेक वर्षे आपल्या समाजात ती चालू होती हे आपण नाकारता कामा नये). त्यांनी जातिव्यवस्था, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि मादक पदार्थांच्या वापराविरुद्धही लढा दिला. त्यांच्या विद्रोहांनी बालविवाह, स्त्रियांची निरक्षरता आणि बहुपत्नीत्वावर हल्ला केला. त्यांनी 'संवाद कौमुदी' नावाचे बंगाली वृत्तपत्रही सुरू केले, ज्याने सतीप्रथेचा निषेध केला.

महाराष्ट्र आणि बंगालचे खूप सखोल नाते आहे. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांचा इतिहास बंगालने प्रेरित आहे. महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज हा ब्राह्मो समाजाशी नाते सांगणारा आहे. याबद्दल बरेच विद्वान इतिहासकार सतत लिहीत असतात. मागील काही दिवसांत महाराष्ट्रात काही ग्रामपंचातींनीं विधवा महिलांच्या सन्मानासाठी प्रचलित रूढी परंपरा बदलण्यासाठी जागृती करण्याची सुरुवात केली आहे. त्याची महाराष्ट्र शासनाने सुद्धा दखल घेतली आहे. त्याबद्दल शासन आदेश जारी केला आहे.

पु. ल. देशपांडे यांच्या मुक्काम शांतिनिकेतन या पुस्तकाने मला पहिल्यांदा बंगालकडे आकर्षित केले. पुढे रवींद्रनाथ टागोर आणि सत्यजित रे यांचे कलासौंदर्य समजून घ्यायला या प्रेरणेने अधिक प्रोत्साहित केले. बंगाल हा आयुष्यभर समजून घ्यायचा विषय आहे. बंगाली भाषा शिकण्याचा दरवर्षी संकल्प सोडतो, पण गाडी अजून दहा शब्दांपलीकडे गेली नाही. पण ती जाईल.

अशा आधुनिक भारताच्या प्रबोधनयुगाच्या जनक असलेल्या मांदियाळीतील एक अशा राजाला मानाचा मुजरा !


 राहुल विद्या माने

9654093359

Tags:    

Similar News