आता वेळ आहे त्यांच्या पाठीवर प्रेमानं हात ठेवण्याची..
डॉक्टरांना आपण खुप भंडावून सोडतो. कधी रुग्ण म्हणून कधी नातेवाईक म्हणून. आपलं रडणंभेकणं ऐकत ते स्व:तला शांत ठेवतात. पण किती काळ? नेहमी त्यांनीच का मदत करायची, आधार द्यायचा? आज सर्वात जास्त पॉझिटिव्हीटीची गरज आहे या मेडिकल स्टाफला. कशी करणार डॉक्टरांना मदत? जाणून घेण्यासाठी वाचा पत्रकार सुवर्णा धानोरकर यांचा लेख..;
कल्पना करा! प्रचंड ताण आहे डोक्यावर... श्वास घ्यायलासुद्धा वेळ नाही... पुर्ण शरिर कपड्यांनी झाकलेलंल आहे. हवेचा एक औंसही आत जायला कपड्यांना छिद्र नाही... घश्याला कोरड पडलीय... आणि आपण रखरखत्या उन्हात वाळवंटात उभे आहोत. तहानेनं जीव जातो की राहतो अशी अवस्था झालीय. अशा वेळी आपण काय करू? आधी अंगावर हवा घ्यायचा प्रयत्न करू. घामानं भिजेलल्या कपड्यांवर लागलेल्या उष्ण वाऱ्यानंही थोडं हायसं वाटलं ना? पण त्यांना असं काही करताच येत नाही. ते तसेच घामानं ओले होत राहतात. अंगातलं असलं नसलं सगळं पाणी घाम होतं. एक मास्क घालायचा म्हटलं की आपल्या कपाळावर आठ्या. मास्क घाल म्हणणाऱ्याला आपण चार शिव्या हसडतो. वेळ पडली तर त्याची आई बहीण काढतो. पण त्यांना तर हे काहीच करता येत नाही. उलट समोरच्यानं कितीही काहीही बोललं तरी त्यांना त्यांचा धर्म विसरून चालत नाही, त्यांचा धर्म तुमच्या आमच्या सेवेचा.
वर्षभर आपल्याही मनात सतत भीती आहे. 24 तासात एक मिनिट तरी मनात येतंच, मला कोरोना तर झाला नसेल ना? प्रश्न वर्षभर सावलीसारखा मागे फिरतोय. ज्यांना होऊन गेला ते निदान अनुभवाचे बोल सांगतात. पण माझ्यासारख्यांची हीच अवस्था. कितीही बी पॉझिटिव्ह! म्हटलं, स्वत:ला आनंदी ठेवायचा प्रयत्न केला तरीही हा विचार मनात येतोच. त्या मिनिटभरात सगळे जवळचे दुरचे आठवून जातात. मन रडून घेतं. जे-जे म्हणून आठवता येईल ते सगळं आठवतं. रोज ऑफिसमध्ये कोरोनाच्या बातम्या. सकारात्मक बातम्याही असतात. पण नकारात्मक बातमी जास्त लक्षात राहते. (हा माणसाचा स्वभाव जे नकारात्मक ते हमखास लक्षात राहतं, नको त्या वेळी आठवतं) घरी येईपर्यंत शरीरापेक्षा मनानं, मेंदुनं जास्त थकवा येतो. बरं दिवसभरात जवळच्या दुरच्या नातेवाईकांचे मित्रमैत्रिणींचे फोन, मेसेज सुरुच असतात. त्यांना कोरोनाचे अपडेट हवे असतात. असं वाटतं त्यांना सांगावं बाबा रे! नऊ-दहा तास त्या कोरोनाच्या बातम्या केल्या, वाचल्या आता परत तेच नको ना... काहीतरी वेगळं बोलुया. पण...
काल अचानक मनात आलं अरे! मी कोरोनाच्या फक्त बातम्या करतेय. पण जे ऑन फिल्ड आहेत त्यांचं काय.... त्या रिपोर्टर्सचं काय? त्या फ्रंटलाईन वर्कर्सचं काय? आणि हो त्या डॉक्टर नर्सेसचं काय...? सर्वात निगेटिव्ह वातावरणात तर मेडिकल स्टाफ असतो. कसं सहन करत असतील? विपरित परिस्थितीत स्व:तला कसं पॉझिटिव्ह ठेवत असतील? दिवसातले किती तास आणि किती रुग्ण त्यांच्या समोर येतील याची माहिती नाही. कशा अवस्थेत येतील माहित नाही. अत्यवस्थ रुग्णांना वाचवता येईल का? माहित नाही. असं सगळं असतानाही काम करायचंच असतं. पीपीई या सोप्या आणि शुभ्र नावाचा पण तितकाच भयंकर साज चढवून कामाला लागायचं.
वर्षभरात पीपीईतले डॉक्टर नर्स पाहायची सवय झालीय. पण त्या पीपीईत त्यांची काय अवस्था होते याचा विचार केला? कदाचित नसेल किंवा केलाही असेल. पण त्या पीपीईमध्ये तासनतास राहणं म्हणजे एखाद्या भट्टीत राहण्यासारखं. मी सुरुवातीला सांगितलं ना तशी किंवा त्याहून भयंकर अवस्था होते. पण आपल्यातल्याच काहींना डॉक्टर नर्सनं सगळं चांगलंच केलं पाहिजे असं वाटतं. त्यांनाही मन आहे, हेच आपण विसरतो.
समोर आलेल्या रुग्णाला ऑक्सिजन लावताना त्यांना नसतील का त्यांचे बाबा आठवत? नसेल दिसत त्या काकूंचा चेहरा आईसारखा? नसेल दिसत ती कोवळी पोरं पोटच्या लेकरासारखी? नसेल आठवत गोष्ट सांगणारी स्व:तचीच आजी त्या व्हेंटीलेटरवरच्या आजीला पाहून? हे सगळं सगळं होतं असेलच ना त्यांना...? पण त्या क्षणाला त्यांच्या मनात फक्त औषधांची नावं फेर धरून नाचत असतात. रुग्णांचा पल्स रेट, ऑक्सिजन लेव्हल दिसत असते. याला रेमडेसिवीर देऊ टोसिलीझुमाब देऊ की हायड्रोक्सक्लोरोक्विन देऊ की मग अजून काही... रुग्ण बऱ्या अवस्थेत असेल तर त्याला मेडिकल स्टाफच्या हालचाली यंत्रासारख्या वाटतात. किती हुशार किती खंबीर आहे हा डॉक्टर नर्स असंही वाटतं. कधी त्यांचं कौतुकही वाटतं. कधी एखादा डॉक्टर/नर्स असाही असतो की त्याच्या फक्त अस्तित्वानंच आपला अर्धा आजार बरा झाल्यासारखा वाटतो. जादुची कांडी फिरवावी तसं.
आपल्या मनात रुग्ण म्हणून कायकाय विचार सुरू असतात, रुग्णाचे नातेवाईक म्हणून आपली भूमिका असते तेव्हाही मनात विचारांचा बाजार भरतो. पण डॉक्टर/नर्स? त्यांच्या मनात त्या क्षणाला फक्त रुग्ण बरा होऊ दे एवढा आणि एवढाच प्रामाणिक विचार असतो. बाहेर सगेसोयरे डोकं धरून बसलेले असतात. डोक्यात विचार असतो जर माझ्या माणसाचं काही बरं वाईट झालं तर मी या डॉक्टरला सोडणार नाही. आणि इकडे या मेडिकल स्टाफला माहितही नसतं आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय. रुग्णासाठी डॉक्टर नर्सेसनी जीवाचा आटापिटा करायचा आणि बदल्यात काय, तर बाहेर थांबलेल्या नातेवाईकांकडून मारहाण.
का आपण संतापतो? तुम्हाला वाटेल मी असं कसं बोलू शकते? डॉक्टर आहेत ते. म्हणजे माणूसच ना? मग त्यांचे प्रयत्न असफल होऊ शकत नाहीत? त्यांच्या हातांना अपयश येऊ शकत नाही? रुग्ण गेला की 'कुटुंबियांकडून डॉक्टरला मारहाण' या बातम्या नेहमीच्याच झाल्यात.
लहान मुलांना नाही ऐकायची सवय नाही असं आपण म्हणतो पण आज आपल्यालाच नाही ऐकायची सवय राहिली नाही त्यामुळे फ्रस्ट्रेशन, राग, अगतिकता लगेच व्यक्त करतो. कधी रडून, शिव्या घालून, तर कधी मेडिकल स्टाफला इजा पोहचवून. पण त्यांना इजा पोहोचवल्यानं आपलं जिवाभावाचं माणूस परत येणारय का? मग का डॉक्टरला मारहाण करायची? त्याला जखमी करून आपण दुसऱ्या रुग्णांचे हाल नाही का करत? मला माहितीय हे वाचून अनेकांना माझा राग येईल. वाटेल ही कोण शहाणी, आमचं माणूस गेलं हिला काय फरक पडतो? पण मीही यातून गेले आहे. वयाच्या बाराव्या वर्षी डॉक्टरच्या चुकीनं माझे बाबा माझ्यापासून कायमचे दूर गेले. पण आम्ही सगळ्यांनी नाही केली डॉक्टरला मारहाण. आम्ही नाही तोडलं हॉस्पिटल. कारण डॉक्टरला मारून बाबा परत येणार नव्हते. कारण तिथे बाकी रुग्णसुद्धा उपचार घेत होते. असो.
गेलं वर्षभर कुणीच इतका मानसिक त्रास सहन नसेल केला जितका मेडिकल स्टाफनं सहन केलाय. त्यांच्या इतकी विश्रांतीची गरज आजघडीला दुसऱ्या कुणालाच नाही. थकलेत ते रुग्ण बरे करून. जिवाभावाची असली नसली तर डोळ्यांपुढे अनेकांचा शेवटचा श्वास बघून, हातांना आलेलं अपयश बघून, रोज किती जणांचा शेवटचा श्वास बघावा त्यांनी? एखाद्यानं तर कदाचित घरातलंच कुणी गमावलं असेल, पण नव्या उमेदीनं पुन्हा रुग्णसेवा सुरु केली असेल.
जो बरा होऊन घरी निघतो तो धन्यवाद देतो. पण तेवढ्यानं कितीसं बळ मिळत असेल बरं त्या मेडिकल स्टाफला? आज सर्वात जास्त पॉझिटिव्हीटीची गरज आहे या मेडिकल स्टाफला. हो, दोनचार असतील उखळ पांढरं करणारे. पण म्हणून एकजात सगळेच वाईट म्हणून कसं चालेल? माझ्या जवळच्या काही व्यक्ती आहेत या क्षेत्रात रोज आपलं कर्तव्य न थकता न कंटाळता बजावतात. आईवडील, लहान लेकरांना सोडून रोज हॉस्पिटल गाठायचं. पीपीईचं चिलखत घालायचं आणि रुग्णांना बरं करायचं.
पीपीई शब्द बोलायला जितका सोपा तितकाच अंगावर घातला की कठीण. जितके तास पीपीई अंगावर तितके तास तोंडात पाण्याचा थेंब नाही की अन्नाचा कण नाही. अन्नावाचून राहतीलही ते. पण पाणी? त्या पीपीईनं आधीच अंगातलं असेल नसेल ते सगळं पाणी काढून घेतलेलं असतं तशा अवस्थेतही त्यांची धावपळ सुरूच. ना तहानेला थांबता येतं ना नैसर्गिक क्रिया करता येतात. वेळच नसतो विचार करायला, एवढे आपण त्यांना भंडावून सोडतो. कधी रुग्ण म्हणून कधी नातेवाईक म्हणून. आपलं रडणंभेकणं ऐकत ते स्व:तला शांत ठेवतात. पण किती काळ? ते देव नाहीत हे समजून घेऊया. काही क्षण त्यांनाही विसावू देवू या. निवांत क्षण कुटुंबियांसोबत घालवू देऊ या. मोकळा श्वास घेऊ देऊ या. पण कसं शक्य आहे ते? सोप्प आहे. आपण सगळे नियम पाळूया. कोरोनाला पळवू या. मेडिकल स्टाफला जिंकवू या. करु या कधीतरी मेडिकल स्टाफला मदत. नेहमी त्यांनीच का मदत करायची, आधार द्यायचा? आता वेळ आहे आपण त्यांच्या पाठीवर प्रेमानं हात ठेवण्याची. त्यांना जिंकवू या...
- सुवर्णा धानोरकर, पत्रकार
लेखिका झी 24 तास या वृत्त वाहिनीत वृत्त निवेदीका आहेत.