प्रबोधनकारांची सेना.. 'शिवसेना'

Update: 2020-04-28 09:06 GMT

फार जास्त नाही. फक्त तीन महिन्यापूर्वी ची गोष्ट आहे. १४ जानेवारी २०२० वाडिया रुग्णालयाच्या संदर्भात मंत्रालयात नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे बैठक होती. गेली 15 वर्ष मंत्रालय कव्हर करत असल्यानं कधीही महानगरपालिकेत जाण्याचा योग आला नाही. बैठक पार पडली आम्ही सगळे पत्रकार मंत्रालयाच्या मुख्य लॉबीमध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत. तिथं उभे होतो.

Courtesy : Social Media

मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर (Kishori Pedanekar) मीडियासमोर आल्या मराठी त्यांनी व्यवस्थित बाईट दिला. हिंदी मीडियाने त्यांना हिंदीमध्ये बाईटसाठी विचारणा केली. सुरुवातीला नाही नाही म्हणत त्यांनी अगदी अस्सल 'मराठी-हिंदी' मध्ये हे खणखणीत बाईट दिला. माझ्या शेजारचा एक हिंदी पत्रकार मला म्हणतो, विजयभाई , ये देखो शिवसेनावाले लोक जिसको महापौर बनाते है उसको हिंदी भी नही बोलनी आती?

मी माझ्या आयुष्याचा एक शिरस्ता बनवून घेतलाय. कोणताही माणूस वैयक्तिक अनुभूती घेऊन जोखल्या शिवाय त्याच्याबद्दल आपलं मत तयार करायचा नाही. ऐकीव माहितीवर तर नाहीच नाही.

Courtesy : Social Media

शिवसेनेची स्थापना करणाऱ्या प्रबोधनकार ठाकरेंबद्दल आपल्या मनामध्ये नितांत आदर आहे आणि तो शेवटपर्यंत राहील. महाआघाडी स्थापनेपूर्वीच्या विद्यमान शिवसेनेच्या राजकीय भूमिके बद्दल वैचारीक मतभेद होते, आणि तेही कायम राहतील.

कोरानाच्या संकटाने जगभरात हाहाकार माजलाय. देश लढतोय. राज्य झगडतयं. 16 एप्रिल 2020 रोजी मुंबईतील सगळ्या पत्रकारांपुढे प्रश्नचिन्ह उभं होतं. जवळपास 167 पत्रकारांनी कोरोना टेस्ट करुन घेतल्या होत्या. माझ्यासगट माझे कार्यालयातले सगळे सहकारी लाईनमध्ये कोरोना टेस्टसाठी उभे होतो.

मुंबई शहराच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर देखील आमच्यासोबत होत्या. त्यांनी स्वतःची टेस्ट करून घेतली. मग लाईन मध्ये उभ्या प्रत्येक पत्रकाराशी वैयक्तिक संवाद साधला. किशोरीताईंचे ते शब्द मला आजही आठवतात.

"मिंत्रांनो अजिबात काळजी करु नका. मी तुम्हा सर्वांच्या पाठीशी आहे. मुंबई महानगरपालिका तुमच्या सोबत आहे. टेस्टचे रिजल्ट काहीही येऊद्या. तुम्हाला तुमच्या कुटुंबांना बरं करुन चांगल्यात चांगली वैद्यकीय सुविधा देईल."

Courtesy : Social Media

शब्द आणि आश्वासने देणारे राजकारणी पत्रकारांना नवे नाहीत. दोन दिवसांनी कोरोना टेस्टचे निकाल आले. 167 पत्रकारांपैकी 53 पत्रकार पॉझिटिव्ह निघाले. माझे आणि महापौर किशोर पेडणेकर यांचे निकाल निगेटिव आले.

महापौरांनी दिलेल्या शब्दाबरुब मुंबई महानगरपालिका पत्रकारांच्या पाठीशी उभी राहिली. सर्व पॉझिटिव पत्रकारांना घरातून उचलण्यापासून त्यांच आयसोलेशन हॉटेलमध्ये करणे. त्यांना हवं नको ते पुरवणं. सातत्याने महानगरपालिकेची वैद्यकीय टिम त्यांच्या संपर्कात राहणे. आवश्यक मनोबल, उपचार आणि पुन्हा कोरोना टेस्ट करून घरवापसी करणं या कामांसाठी महानगरपालिकेला सँल्युटच करायला हवं.

जवळपास आज 53 पैकी 33 पत्रकार पॉझिटिव्हचे 'निगेटिव्ह' होऊन घरी गेले. हे काम केवळ महानगरपालिकेचे नाही तर मनपाचं सक्षम नेतृत्व करणाऱ्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा आहे. हे मानायलाच हवं.

अभिमान तेव्हा वाटलं जेव्हा कळलं की किशोरी पेडणेकर स्वतः मेट्रन नर्स आहेत. कालच्या नर्सच्या वेशामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये उभ्या राहिल्या त्यावेळेस हा अभिमान उचंबळून आला.

केवळ टाळ्या आणि भांडी वाजवून मनोबल वाढत नाही. नेतृत्व सिद्ध करण्यासाठी कृती आणि आदर्श उभा करावा लागतो. भूतो न भविष्यती अशा कोरोना संकटामध्ये आपल्या घरातला #वडीलधारा माणूस वाटणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे. तेवढ्याच सक्षम पणे घरातल्या #मावशी सारखी पाठीशी उभी राहणारी मुंबईची पहिली नागरिक महापौर किशोर पेडणेकर मी ज्या विभागात राहतो त्या विभागाचा वार्ड 173 नगरसेवक रामदास कांबळे अगदी #भावासारखा संकटात उभा आहे.

संकटे येतात आणि जातात कोणताही अभिनिवेश न ठेवता फक्त माणूस म्हणून संकटांमध्ये उभा राहतो तोच आपला माणूस असतो. संकटे येतील आणि जातील .राजकीय सत्ता येईल आणि जाईल. इतिहास ही 'माणुसकी' निश्चित लक्षात ठेवेल.

म्हणूनच म्हणतो हीच प्रबोधनकारांची सेना 'शिवसेना'

जय किसान, जय संविधान

 

-विजय गायकवाड

Similar News