सिद्धार्थ चांदेकर च्या आईचे लग्न सामाजिक बदलासाठी प्रेरक
विधवा महिला, घटस्फोटित, परित्यक्ता अशा एकल महिलांचे विवाह करण्याचा विषय आला की, नेहमी त्या महिलेचे वय आणि तिला असणारे मुल हा मुद्दा घेवून त्या लग्नाला विरोध केला जातो. वय वाढले, मुले मोठी झाली, आता कशाला हवे लग्न? मुलांचा विचार करायचा, असे सांगून लग्नाचा विषय संपवला जातो. वास्तविक वय वाढणे, मुले असणे याचा विवाहाच्या गरजेशी काहीच संबंध नसतो. ती एक शारीरिक, मानसिक, भावनिक व सहवासाची गरज असते. पण वरील मानसिकतेमुळे आज तरुण असूनही अनेक महिलांचे पुनर्विवाह होत नाहीत, यावरच ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी भाष्य केलंय. एवढंच नाही तर सिद्धार्थ चांदेकरचे कौतूकही केलंय. नेमकं काय म्हणाले आहेत हेरंब कुलकर्णी जाणून घेण्यासाठी वाचा आणि सामाजिक बदलाची ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शेअर करा.;
आम्ही महाराष्ट्रभर महिलांच्या लग्नाविषयी विविध प्रयत्न करूनसुद्धा फक्त ३० विवाह करू शकलो.
या पार्श्वभूमीवर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या आईचे लग्न लावण्यात पुढाकार घेतला. ही अतिशय प्रेरक व अनुकरणीय बाब आहे. त्याची आई अनेक वर्षे एकटी होती. सिद्धार्थचा विवाह झाला, तेव्हा त्याला आईचे एकटेपण अधिक लक्षात आले आणि त्याने आईला आग्रह करून विवाह करायला लावला. त्याने आईचे वय ५० पेक्षा जास्त आहे किंवा सून आली आहे, आता कशाला लग्न? असा विचार केला नाही. आईच्या लग्नानंतर आईच्या अगोदरच्या जगण्याविषयी सिद्धार्थ लिहितो .."
मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! आय लव्ह यु आई! हॅप्पी मॅरीड लाईफ!’ "
किती प्रेरक आहे हे... ग्रामीण महाराष्ट्रात महिलांचे बालविवाह होतात. १५ व्या वर्षी लग्न आणि वयाच्या २५ व्या वर्षी तिला ८ ते १० वर्षाची २ मुले असतात. वास्तविक शहरातील मुली या वयात लग्नही करत नाहीत. पण आता तुला मुले झाली, आता तू लग्न करू नको, असे तिला सांगतात. वास्तविक तिच्या शारीरिक, मानसिक गरजा अतिशय तीव्र असतात. पण तरीही ती लग्न करू शकत नाही. ती जर ७५ वर्षे जगली तर पती सोबत घालवलेली वर्षे १० आणि त्याच्याशिवाय घालवलेली वर्षे ५० असतात. हे भकास आयुष्य मुलांचे लग्न झाले की, अधिकच वेदनादायक व करुण होते. त्यामुळे पुनर्विवाह हाच महिला व पुरुष यांच्यासाठी महत्वाचा दिलासा असतो. आयुष्य आनंदी होण्याचा मार्ग असतो.
त्यामुळेच सिध्दार्थ चांदेकर याने आईचे केलेले लग्न हे ऐतिहासिक आहे. अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे
पण यात एक मुद्दा महत्वाचा हा की, कोणतीच महिला स्वतः होऊन लग्न करायचे म्हणत नाही. तिला वास्तव समजून सांगावे लागते. मन वळवावे लागते. समुपदेशन करावे लागते. त्यामुळे
आपल्या परिचयाच्या, नात्यातील महिलांना विवाहासाठी आपणही त्यांचे मन वळवायला हवे..हे काम आपण सर्वांनी करायला हवे.