एजंट ,लग्न आणि लोचा

मुलींची घटती संख्या या सगळ्याचा परिणाम म्हणजे लग्नाला होणार उशीर . लग्न व्यवस्था कशी बदलत चालली आहे ,लग्नासाठी मुली मिळत नाहीत जरी मिळाल्या तरी त्यांच्या अपेक्षा प्रचंड असतात त्यामुळे लग्न जमवणारी दलाली मंडळी यांचा वाढत चाललेला व्यवसाय आणि त्यातून अनेक छोटे मोठे गुन्हे घडतात . लग्न व्यवस्थेचे बदलते स्वरूप ,त्यातून निर्माण झालेली भयावह स्थिती याचे सविस्तर विश्लेषण जाणून घेऊया आनंद शितोळे यांच्या लेखामधून ...

Update: 2022-07-31 07:09 GMT

अहमदनगर जिल्ह्यात सापळा लावून लुटण्याची नवीन पद्धत समोर आली. ग्रामीण भागातील अडलेल्या मुलांच्या बापाला गाठून लग्न करून देतो म्हणून पैसे ठरवून मुलगी दाखवायची आणि आडरानात नेऊन पैसे, गाडी, मोबाईल लुटून न्यायचं. दुसरा फसवणुकीचा प्रकार समोर आलेला आहे. अशीच लग्नाची सोयरिक जुळवायला एजंट पैसे घेतो, लग्न मंदिरात उरकलं जात आणि दोन चार दिवसात अंगावरचे डाग, घरातले पैसे घेऊन नवरी फरार होते. या सगळ्या खेळात रक्कम किती आहे ? दोन-पाच लाख.पुण्या मुंबईत आयटीमध्ये काम करणाऱ्या जोडीचा दोन किंवा तीन महिन्याचा पगार कदाचित जास्त असेल.

लोक हसतात बातम्या वाचून, टिंगलटवाळी सुद्धा करतात.

हे प्रश्नाच्या हिमनगाचे एक दशांशपेक्षा कमी दिसणार टोक आहे.

ग्रामीण-निमशहरी भागातल्या शिकलेल्या, मोठ्या शहरात नोकरी करणाऱ्या मुलींचे पालक आधी स्पष्ट विचारतात.मुलाच्या नावाने शहरात घर आहे का ? गावाकडे शेतीवाडी आहे का ? नसेल तर मुलाला नोकरी असूनही नाखूष.म्हणजे नोकरी करणारा, शिकलेला मुलगा स्थावर मालमत्ता नाही म्हणून लग्नाच्या बाजारात बाद. म्हणजे पोरीचा बापाला बापाच्या जीवावर घर बांधून राहणारा ऐतखाऊ बैल पाहिजे का आपल्या दुभत्या गायीसाठी ? त्याने आणि बायकोने नोकरी करावी, एकाचे दोन फ्लॅट करावेत आणि शहरात सुखाने जगावे.

पुणेमुंबईनाशिक भागातल्या मुलींची वेगळीच कथा.

चर्चा वगैरे होण्यापूर्वी सरळ आणि स्पष्ट विचारल जात.आमची मुलगी पुण्यामुंबईत वाढलेली आहे. तिला खेड्यात राहायला जमणार नाही.अगदी दिवाळी लग्नकार्य सणवार सुद्धा आईबापाला करायचे असतील तर त्यांनी चार दिवस शहरात येऊन पुन्हा गावाकडे जाव.आम्ही तिकड येणार नाही आणि तुम्ही इकड येऊ नका. हे मान्य असेल तर पुढल्या वाटाघाटी.

या शिकलेल्या, अफाट पैसे आणि तेवढेच अफाट कर्जाचे हप्ते बोकांडी घेतलेल्या गाई बैलांची हि तऱ्हा तर आमच्या ग्रामीण भागातल्या पोरांना कोण वाली ?

पूर्वीच्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अस होत, आता नेमक उलट झालेलं आहे.शेतीला ना प्रतिष्ठा न श्रमाला प्रतिष्ठा.

अगदी कृषी पदवीधर असणाऱ्या, बर क्षेत्र , विहीर बागायत असणाऱ्या पोराला शेतीत काही नव करू वाटल तर हौसेने करतोही, चांगल उत्पन्न कमवतो, अगदी आयटीवाल्यांच्या तोडीने नाही पण आईबापाला सोबत ठेवून चार पैसे बचतही करतो, त्याला केवळ शेतकरी नवरा नको म्हणून तिशी ओलांडली तरी पोरी सांगून येत नाहीत.अगदीच चुकून माकून आली तर तिच्याही अपेक्षा भयंकर. म्हणजे बारावी धडकून थांबलेली पोरगी तालुक्याला बंगला बांधला तर लग्न करू पण गावात वस्तीवर राहणार नाही म्हणते.

त्याच्यापलीकडे एकदमच कंडम आणि खकान झालेली जमात म्हणजे कोरडवाहू , अल्पभूधारक शेतकरी. यांचे हाल कुत्रे खात नाहीत. ना शेतीत धडक उत्पन्न.ना नवीन काही करण्याची सोय.मग बारावी, आयटीआय झालेले पोर केवळ आणि केवळ लग्न जमवायला म्हणून गाडीला डब्याची पिशवी अडकवून जवळच्या एमआयडीसी मध्ये कुठतरी आठ दहा हजारावर राबायला लागतात. मिळतो तो पैसा पेट्रोल टाकायला पुरत नाही, निदान गावाकड शेतावर राहतात त्यामुळे राहण्याचा खाण्याचा खर्च नाही एवढच समाधान.

शेतीला, कामाला, श्रमाला प्रतिष्ठा नाही कारण शेतीत पुरेस उत्पन्न पैसा नाही मात्र लग्नाच्या बाजारात शहरात घर घेण्यासाठी वेळेला विकायला म्हणून शेती मात्र पाहिजे अशी शेतीची अवस्था.

या तिशी पस्तीशी उलटलेल्या पोरांचे प्रश्न किती बहुपेडी आहेत याची जाणीव आहे आपल्याला ? सगळेच सारखे नसतात, कुणाला शिक्षणाच्या बळावर पुढे जायला जमत, कुणाला हुशारी असूनही आर्थिक बाबी आडव्या आल्याने शिकता येत नाही.पर्यायाने गावात रखडणे, त्यातून येणार नैराश्य, वैफल्य, त्यातून येणारी व्यसन आणि या धुमसणाऱ्या तरुणाईला खुबीने वापरून घेणारी राजकीय व्यवस्था.मग कुठतरी रग जिरवायला, वर्चस्व गाजवायला नेत्यांचे पंटर दादागिरी, गुंडगिरी करायला लागतात. तिशी उलटून गेलेली आणि जत्रेला, कार्याला बाहेरगावाहून आलेले मित्र, त्यांच्या गाड्या, कपडे, मोबाईल, सुखवस्तू राहणीमान यांनी हे नैराश्य अजून वाढत. राजकीय नेतृत्वाला या प्रश्नाबद्दल पराकोटीची अनास्था असण्याच कारण त्यांच्यासाठी रिकामी फौज वापरायला सुपीक जमीन आहे.

परिस्थिती काहीही असली तर निसर्ग थांबत नाही.वय वाढत तश्या लैंगिक गरजा निर्माण होतात आणि त्यांचा कुठेही निचरा होत नाही.त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या वेगळ्याच.

या आर्थिक बाजूला असणारा दुसरा एक कोन अजून भयावह.

पोरीला चांगल स्थळ, शहरात घर, नोकरी असणारा मुलगा शोधायला पैसे लागतात, सोन हुंडा याला पैसे लागतात, एक पोरगी उजवायला जवळपास आयुष्याची कमाई पणाला लावावी लागते.मग यातूनच मुलगी नकोच हा मतप्रवाह बळकट झाला.

मागली पंधरा वीस वर्षे सोनोग्राफी-लिंगनिदान-गर्भपात या सापळ्यात अनेकांनी हजारो रुपये घातले.परिणाम असा झालाय कि स्त्री पुरुष गुणोत्तर पूर्णपणे बोंबलत गेलेलं आहे. अनेक समाजात मुलांना पुरेश्या मुलीच नाहीयेत लग्नाला.त्यातून हे लग्न जुळवून देणारे दलाल उभे राहिलेत.आदिवासी, मागास भागातून मुली शब्दशः विकत आणल्या जातात, आपल्या समाजाची भाषा, चालीरीती समजून घ्यायला ओळखीच्या घरात सहा महिने ठेवून पोरीच्या बापाला, त्या घराला, दलालाला पैसे देऊन पोरी लग्न करून आणल्या जातात. ज्यांची ऐपत आहे त्यांना हे शक्य होत, ज्यांची ऐपत नाही त्यांनी काय करायचं ?

शेतीला , श्रमाला नसलेली प्रतिष्ठा कारण शेतीमधून मिळणार उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ नाही, महागाई वाढलेली, त्यात मुलींची संख्या कमी झालेली आणि लग्न नावाच्या बागुलबुवाची प्रचंड वाढलेली किंमत आणि अवाजवी अपेक्षा या सगळ्या प्रश्नांची एकत्रित गुंतागुंत एवढी भयंकर झालेली आहे कि त्याची उकल आणि सोडवणूक सरधोपट मार्गाने अशक्य आहे.

सामाजिक पातळीवर हा टाईमबॉम्ब कधी फुटेल आणि त्यातून कसली कसली वीण उसवली जाईल आणि काय काय उध्वस्त होईल हेही आकलन अवघड आहे.

मात्र या प्रश्नाकडे ना राज्यकर्ते गांभीर्याने पाहतात ना समाजाला दिशा देणारे लोक आणि स्वतः समाज.

आनंद शितोळे

Tags:    

Similar News