अपने गली में तो __ भी शेर होता है, वाचा समीर चौघुले यांचा महिला दिन विशेष लेख
हास्यजत्रेमधून नेहमी आपल्याला पोट धरून हसायला लावणारे प्रसिध्द अभिनेते समीर चौघुले सातत्याने फेसबुकवर व्यक्त होत असतात. आज सुध्दा त्यांनी महिला दिना निमित्त समस्त पुरुषवर्गाला शालजोडे हाणणारा लेख लिहिला आहे, अपने गली में तो __ भी शेर होता है.;
अरे ..हि तर गोष्ट माझीच आहे !" असं वाटणाऱ्या प्रत्येक पुरुषाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ...स्त्री हि श्रेष्ठ आहे आणि श्रेष्ठच राहणार. तमाम माता, भगिनी, गृहिणी, मावशी, सखी, पत्नी, मामी, आजी, मैत्रीण आणि अनेक अशी अनेक रूपे घेऊन लीलया कोणताही आव न आणता जग संभाळणाऱ्या तमाम महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा..
सकाळी ऑफिसला जायची तयारी करून घराबाहेर पडलो. नाक्यावर माझ्यासारखे अनेक चातक वेगवेगळ्या ठिकाणी रिक्षाची वाट बघत उभे होते. मग ठरवलं या रिक्षावाल्यांचा माज आपणचं उतरवायला हवा. आज बसनेचं जाऊया. बायकोने नुकत्याच दिलेल्या आणि आत शेपूची भाजी असलेल्या गरम डब्यावर हात ठेऊन शपथ घेतली 'यापुढे आयुष्यात कधीही रिक्षाने फिरणार नाही'. तिरमिरीतच bus stopकडे वळलो. एखाद्याची जर १००ची नोट खाली पडली तर शेवटच्या थांब्यापर्यंत त्याला वाकून उचलता येणार नाही इतकी गर्दी बसमध्ये होती. एका खचाखच भरलेल्या बसमध्ये खचलेल्या मनानेच चढण्याचा प्रयत्न सुरु केला ..इतक्यात आचारी ज्या सफाईने भोकाचे वडे कढईतून काढतात त्या सफाईने एका चपळ माणसाने मला बाजूला काढले आणि तो बसमध्ये चढला. मी घसा खाकरून त्याला आवाज दिला. (बोलायच्या आधी मला घसा खाकरायची सवय आहे. आत्मविश्वासाने माझं शरीररूपी घर कधीच सोडलंय) त्याला म्हटलं "क्या बे, दिखता नही क्या?". त्याने पलटून मला आवाज दिला "हा दिखता है पर मैने जानबुझकर किया, अब बोल". त्याचा आवेश बघून मी माझी जीव्हारुपी कट्यार म्यान केली. बस सुटली आणि आता तो चालत्या बसमधून उतरणार नाही हि खात्री वाटली तेंव्हा मी जोरात आवाज चढवला "परत भेट तुला दाखवतो". पण बहुतेक माझा आवाज कोणालाच ऐकू गेला नाही..
"च्यायला, सत्तेवर कोणीही येऊ दे, सामान्य माणसाची हालत हीच राहणार". पुन्हा रिक्षाकडे वळलो. एक रिक्षावाला आला. "बोरीवली स्टेशन?" तो म्हणाला "हा" ..मी चिडून म्हणालो " अरे भाडा नाकारने को शरम कैसी नही आती है?". तो जास्त चिडून म्हणाला "अरे सुनाई नही देता क्या? मैने 'हा' बोला है" . पहिलाच रिक्षावाला "हो" म्हणू शकतो याची मला अपेक्षाच नव्हती. रिक्षात बसलो आणि स्टेशन येईपर्यंत रिक्षावाला मला सुनवत होता. "तुम खालीपिली रिक्शावालेको बदनाम करते हो ..वगैरे". खूप बोलला मला आणि मी आपला घसा खाकरत खाकरत "नही नही..बराबर है" च्या पुढे काहीही बोलत नव्हतो. ऑफिसला अर्थातच उशीर झाला.
मग पूर्ण दिवस ऑफिसला वेळेवर येणाऱ्या अमराठी बॉससमोर घसा खाकरत आणि लाचारीतच गेला. संध्याकाळी ऑफिसमधून निघालो. ऑफिस ते अंधेरी स्टेशन रिक्षा मिळाली. सिग्नलला रिक्षावाला रस्त्यावर ओकल्यासारखा थुंकला. माझ्या मनात आलं होतं कि "जरा आवाज चढवावा" पण म्हटलं जाऊ दे हा उलटा मलाच सुनवायचा. आजूबाजूने जाणारी अनेक वाहने रहदारीचे नियम पाळत नव्हती. मी हि दुर्लक्ष केलं. काय आणि किती बोलणार..नुसताच घसा खाकरला. ट्रेनमध्ये चढलो. लक्षात आलं आजच वर्तमानपत्र चाळायलासुद्धा मिळालेलं नाहीय. चत्कोर घडी करून ठेवलेलं वर्तमानपत्र काढलं. पहिल्या पानावर बातमी होती. "अमुक एका ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते यांची डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या". संतापाची तिडीक डोक्यातून गेली. मी शेजाऱ्याला बातमी दाखवत म्हटलं "कसं होणार या देशाच!' पण तो मोबाईलवर कोणता तरी पायरेटेड पिक्चर बघण्यात गुंग होता. मी हि म्हटलं "जाऊ दे काय बोलणार आपण तरी"..फक्त खाकरलो...
बोरिवलीला उतरलो. स्टेशन ते घर चालत जाऊया असं ठरलं. रस्त्यात प्रचंड खड्डे होते पण आताशा मला त्यांचा हि त्रास होणं बंद झालंय. काय बोलणार आता? रस्ता ओलांडणार इतक्यात एक भली मोठी पांढऱ्या रंगाची उंच गाडी शेजारून मला चाटून गेली. शिव्या देणार होतो पण त्या गाडीच्या नंबर प्लेटवर एक विशिष्ट पक्षाचा झेंडा आणि काळ्या काचा होत्या. मी काहीच बोललो नाही. फक्त खाकरलो...गल्लीत शिरलो. गल्लीतल्या कुत्रा इतकी वर्षे मी याच गल्लीत राहूनसुद्धा माझ्यावर रोज का भुंकतो हे मला अजून उमगलेल नाहीय. घसा खाकरून मी 'हाड हाड' केलं आणि घरात आलो.
डोअरबेल तीन वेळा वाजवून पण बायकोने दरवाजा उघडला नाही . माझं डोकंच फिरलं. बायको म्हणाली "अहो मी बाथरूम मध्ये होते" पण मी ऐकून नाही घेतलं. मी आल्यावर मला चहा लागतो तो हि तयार नव्हता. जेवणात मीठ जास्त घातलं होतं. टाळक सटकल माझं. बायकोला झापझाप झापलं. अगदी आई बहिणीवरून शिव्या घातल्या. अहो बरोबर आहे रोज रोज मी किती ऐकून घेणार तीचं. घरात शिरलो कि मला बोलताना खाकराव लागत नाही... थंड बियर उघडून मी टीव्हीसमोर बसलो.... टीव्हीवर महिला दिनानिमित्त एका टंच नटीची मुलाखत सुरु होती... बियरच्या मिटक्या मारत मारत मी तिला न्याहाळू लागलो.....लांब कुठेतरी तो गल्लीतला कुत्रा भुंकत होता....शेवटी काय "अपने गली मे तो.....................
समीर चौघुले