साधारणतः आठ वर्षे झाली असतील,त्यावेळी मुंबई पोलिस दलामध्ये अधिकारी असणारे विश्वास नांगरे पाटील,ज्यांनी 2007 मध्ये मराठी तारका पहिला शो आणि त्यानंतरही दोन शो पाहिले होते. त्यांनी मला मुंबई पोलिसांच्यासाठी ’मराठी तारका’ शो करण्यास सांगितले. त्यावेळी पोलीस कमिशनर असणारे शिवानंद यांच्याशी माझी भेट घालून देण्यात आली आणि केवळ पंधरा दिवसांनी कार्यक्रम करायचा ठरल्यामुळे मला लगेच तयारी सुरू करा असं सांगण्यात आले.ज्या ग्राउंडवर कार्यक्रम होणार होता ती जागा मला दाखवण्यात आली.
खूप कमी दिवस हातात असल्याने कलाकार, डान्सर, रिहल्सल हॉल, कोरोग्राफर, गायक, सगळं मी पटापट फिक्स केलं.. तशी माहिती पोलीस खात्यात कार्यक्रमा संदर्भात व्यवस्था पाहणारे अधिकारी आणि नांगरे पाटील यांना मी दिली. अडवान्स पैश्याची मागणी केल्यावर दोन दिवसात चेक नक्की मिळेल. तुम्ही पैश्याची काळजी करू नका असं विश्वासाने सांगण्यात आले. त्यामुळे मी माझे स्वतः कडील पैसे सगळ्यांना अडवान्स म्हणून दिले. दोन दिवसांनी मिळणारा चेक न मिळाल्यामुळे पुन्हा चौकशी केली असता अजून दोन तीन दिवस थांबावे लागेल असे सांगण्यात आले. मीही विचार केला एक दोन दिवस चेक मिळायला उशीर झाला तरी आपणही ऍडजस्ट करू आणि कार्यक्रम कसा चांगला होईल याकडे लक्ष देऊ आणि तसे मी केले.
ज्या कलाकारांना, अभिनेत्रींना मी माझ्या कार्यक्रमासाठी फिक्स केले होते त्यातले बरेचजण एक एक करून मला फोन करू लागले की आपल्या कार्यक्रमाची तारीख नक्की फिक्स आहेना त्यात काही बदल नाहीना? काही कलाकारांना अडवान्स पैसे देऊन रीहल्सलच्या वेळा फिक्स देऊनही कार्यक्रम नक्की आहेना असं विचारून कार्यक्रमाबाबत त्यांना शाश्वती नसल्याचे त्यांनी दाखवल्यामुळे काहीतरी गडबड असल्याचा मला संशय येऊ लागला.
मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे पुन्हा चेकसाठी चौकशी केली असता ’तुमचा कार्यक्रम आम्ही करत नाही त्यामुळे तुम्हाला चेक मिळणार नाही ' असे उडवून लावणारे उत्तर मिळाले. जे ऐकून डोळ्यासमोर सगळा अंधार जाणवू लागला. ज्यांनी मला कार्यक्रम करण्यासाठी विचारले होते त्या विश्वास नांगरे पाटिल यांनीही त्यांना यातलं काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यावेळेचे पोलीस कमिशनर शिवानंद यांना भेटून मी माझी फसवणूक करण्यात आल्याचे सांगताच त्यांनीही पर्वा नसल्याचे दाखवत "तुम्हाला जर पोलीस खात्याकडून लेखी पत्र दिले गेले नव्हते तर तुम्ही कश्याच्या आधारावर कन्फर्म समजून तयारी सुरू केली?" उच्च पद असलेल्या व्यक्तीकडून असे उत्तर ऐकून अनुभवी जुने लोक सांगायचे ते मला आठवले ’विश्वास’ पानिपत मध्येच गेला. कुंपणानेच शेत खाल्ल्यावर तक्रार कुणाकडे करणार. पोलीस अधिकाऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला हीच मोठी आपण चूक केल्याचा पश्चाताप झाला. नंतर माहिती काढल्यावर सगळा उलगडा झाला.
एकीकडे मला चेक आज मिळेल उद्या मिळेल अशी कारणं देत झुलवत ठेवून मी जी कलाकारांची लिस्ट दिली होती ते कलाकार त्या ठराविक तारखेला उपलब्ध आहेत हे माहीत असल्याने त्याच कलाकारांना, तोच कोरोग्राफर घेऊन आणि एका प्रसिद्ध संगीतकार जोडी ह्या सगळ्यांना घेऊन, आधी ठरलेल्या त्याच तारखेला कार्यक्रम झाला. माझ्याशी आधीपासून संपर्कात असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला कसलाच सुगावा न लागू देता अशी खेळी खेळली. पोलीस अधिकाऱ्यांनी अश्या पद्धतीने माझा भावनिक आणि मानसिकरित्या केलेला एन्काउंटर मला एक शिकवून गेला की खाकी वर्दी घालून राजकारण करणारे निर्दयी अधिकारी पोलीस दलातही आहेत.
हे इतकं सगळं घडत असताना ज्यांनी मला कार्यक्रम करण्यासाठी विचारले, इतरांशी भेट घालून दिली त्या विश्वास नांगरे पाटील यांना माझ्या नकळत काय कट शिजत होता त्याची कल्पना नसावी याचे मला मात्र आश्चर्य वाटले. माझा पत्ता कट करून माझा गेम झाल्याची आंतरिक जखम होतीच पण ज्यांना मी वेळोवेळी कामं, दोन पैसे मिळवून दिले त्या कलाकारांनी पण जाणीव न ठेवता काहीही झालं तरी आपला दिवस भरून मीटर डाऊन होऊन पैसे मिळाले पाहिजेत असा आर्थिक स्वार्थ बघत ते वेठबिगार मजूर असल्याचे मला दाखवून दिल्याने विश्वासघाताची जखम जास्त वेदना देत होती.
कोरोग्राफर दिपाली विचारे हिने मात्र तो पोलिसांचा शो झाल्यानंतर काही दिवसांनी भेटून तिला मिळालेल्या पैशातून काही पैसे मला मदत म्हणून देण्याची माणुसकी दाखवली. तिनं दिलेलं पैशाचं पाकीट उघडूनही न बघता तिला तसेच परत देत सांगितल. "पदरचे पैसे खर्च करून मी अनुभव विकत घेतला आहे. पोलीस खात्यावर विश्वास ठेवला ही माझीच चूक होती. पैसा कमवायला अजून भरपूर आयुष्य आहे पण माणसांची पारख मला योग्य वेळेत झाली”.
’मराठी तारका’ कार्यक्रमाची यशस्वी वाटचाल सुरू होती. 2017 मध्ये विश्वास नांगरे पाटील जे त्यावेळी कोल्हापूर मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक (IG)पदावर होते. त्यांनी पोलीस वेलफेअर फंड मध्ये पोलिसांच्या मदतीसाठी निधी जमा व्हावा म्हणून मराठी तारका शो करण्यासाठी विचारणा केली. पोलीस दलाच्या आधी मला आलेल्या वाईट अनुभवाची मी आठवण करून दिल्यावर ’यावेळी तसं काही होणार नाही याची खात्री बाळगा’ असे सांगत इतरवेळी ज्या बजेटमध्ये मराठी तारका शो मी करतो त्या पेक्ष्या कमी बजेट मध्ये शो करून सहकार्य केले तर पोलिसांसाठी मोठा निधी उभा राहील असे त्यांनी सांगितले. नंतर पुढे भविष्यात पोलिसांसाठी हिंदी कार्यक्रम करायचे आहेत त्यावेळी बजेट चांगले मिळेल असे सांगितले. मी ही विचार केला की जवानांच्यासाठी आपण मोफत शो करतो पण जी आपली कर्मभूमी आहे त्या महाराष्ट्रातील पोलिसांसाठी आपण काहीच केलं नाही याची खंत मनात कधी राहू नये.कमी बजेटमध्ये शो करायला मी होकार दिला.
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर असे लागोपाठ चार शो करायचे असल्याने मागे आलेल्या अनुभवातून शहाणा होत मी ज्या गोष्टी फिक्स होतील त्या लेखी स्वरूपात आणि चार शो करतोय ते कॉन्ट्रॅक्ट स्टॅम्प पेपरवर लिहून मागितले आणि अडवांस चेक आधी लागेल अशी अट घातली. मी सांगितलेल्या गोष्टी तोंडी मान्य करण्यात आल्या. कलाकारांना मी तश्या तारखा दिल्या. नांगरे पाटिल यांनी त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी जे कार्यक्रमाबाबत तयारी करणार होते त्यांच्याशी संपर्क करून दिला. त्यातील एक पंजाबी असणारे पोलीस अधिकारी सुहेल शर्मा यांनी मला एक मे रोजी कोल्हापुरात कार्यक्रम जिथे होणार ती जागा दाखवली जेणेकरून मला स्टेज,.इतर व्यवस्था काय असावी त्याचा अंदाज यावा. हे सगळं होत असताना सुहेल शर्मा अतिशय प्रेमाने वागत बोलत होते.”मराठी तारका शो बद्दल खूप ऐकून होतो तुम्ही पोलिसांसाठी हा शो करताय तर आमच्याकडूनही तुम्हाला पूर्ण सहकार्य असेल कोणत्या गोष्टींची कमतरता जाणवणार नाही”असे सांगत कोल्हापूरला मी गेल्यावर त्यांचा पाहुणा असेल आणि पंजाबी जेवण देऊन ते माझं आदरातिथ्य करणार असल्याचे त्यांनी सांगताच मी भारावून गेलो.
लागोपाठ चार शो वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने स्टेज आधीपासूनच तयार करावे लागणार होते इतर तयारीसाठी पैसा आधीच खर्च करावा लागणार होता. मला लेखी कॉन्ट्रॅक्ट मिळाले नसल्याने मी चौकशी केली तेंव्हा कॉन्ट्रॅक्ट कसे बनवायचे त्यात काय माहिती असते ते सगळं माहीत नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर मी रफ कॉन्ट्रॅक्ट बनवून दिले आणि फायनल कॉन्ट्रॅक्ट बरोबर मला अडव्हान्स चेक लागेल हेही सांगितलं. काही दिवस गेले तरी चेक आला नाही की कॉन्ट्रॅक्ट पेपरही. सुहेल शर्मा यांना फोन केल्यावर त्यांनी इतर गोष्टींची माहिती विचारायला सुरुवात केली, स्टेज किती मोठं असेल, शो साठी कोणत्या लाईट असतील,साऊंड सिस्टीम कोणती असेल वगैरे वगैरे.. चौकशीतून ते माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होते की जर मी कमी बजेटमध्ये शो करतोय तर तो करायचा म्हणून भागवा भागवी करून तर करणार नाहीना. जो माणूस मला आधी कार्यक्रमासाठी जागा दाखवताना त्यांना शो मधलं काही कळत नाही म्हणत होता तो अचानक टेक्निकल गोष्टींबाबत विचारणा करू लागल्यावर मला संशय आला की यांचा बोलवता धनी दुसरा कुणी आहे. कुणीतरी त्यांना खाद्य पुरवत आहे माहिती विचारून घेण्यासाठी.
माझ्या नावाची आणि कार्यक्रमाची मला काळजी असते त्यामुळे तो कसा चांगला होईल असाच माझा प्रयत्न असतो त्यामुळे स्टेजवर किती लाईट लावायच्या की दिवाळी करायची ते मी ठरवणार असं ठणकावून सांगितल्यावर ’कुणीही काम देताना मार्केट मधून टेंडर मागवतो तेंव्हा कामाचे डिटेल्स पण मागवतो’ असं धंदेवाईक व्यापारी असल्यासारखं सूहेल शर्मांनी बोलायला सुरुवात केल्यावर मग मात्र मी समजून गेलो की त्यांना इतरही कुणी कार्यक्रम करून देतो म्हणून आमच्याच क्षेत्रातील घुसखोर भेटलेले आहेत.
कोल्हापूर मधील स्थानिक जोशी नावाचे आयोजक ,त्यांना काम मिळाले नाही की प्रत्येक ठिकाणी घुसून मी या पेक्ष्या स्वस्तात कार्यक्रम करून देतो म्हणत दुसऱ्याच्या ताटातील ओढून घेऊन खायची त्यांना भारी खोड आहे. मला त्यांचा संशय होताच. त्यांच्या नावाचा उल्लेख करत ते जर पोलिसांसाठी स्वस्तात कार्यक्रम करून देणार असतील तर खुशाल त्यांनाच द्या असं मी टोकाचं बोलल्यावर आपली बाजू सावरत ”आम्ही शो करणार म्हणजे चार ठिकाणी चौकशी करणारच ना.असे उत्तर शर्मानी दिल्यावर त्यांना ठणकावून उत्तर द्यावे लागले की हे सगळं करायचं होतं तर कार्यक्रम फिक्स करायच्या आधीच का नाही केलं.
एकतर सहकार्य म्हणून बजेट कमी करून शो करतोय आणि बजेट कमी असेल तरी कार्यक्रमाचा दर्जा आणि भव्यता यात कसली तडजोड न करता मी जर प्रामाणिकपणा दाखवत असेल आणि सगळ्या गोष्टी फायनल होऊन चेक द्यायची वेळ आल्यावर काहीतरी कुरापती काढून मुद्दाम मानसिक त्रास देणार असाल तर तो खपवून घेणार नाही”. माझे बोलणे झोंबल्यामुळे "सरांच्या (विश्वास नांगरे पाटिल) पण खूप कलाकारांशी ओळखी आहेत,प्रसिद्ध संगीतकार जोडी तर त्यांचे जवळचे मित्र आहेत, अभिनेत्री इशा कोपिकर, माधुरी दीक्षित यांच्याशी पण ओळख आहे त्याही येऊन एक एक डान्स करू शकतात". शर्माने सिनेमा क्षेत्रातील सरांच्या ओळखीचा पाढा वाचायला सुरुवात केल्यावर मला त्याच्याशी घेणं देणं नसल्याचे स्पष्ट केले "उद्या इशा कोपीकर, माधुरीच नाहीतर तुमच्या सरांच्या ओळखीने स्वर्गातून अप्सरा,रंभा आणून त्यांनी नृत्ये केली तरी माझं काही बिघडणार नाही.
माझ्याशी बोलताना शर्माची बदललेली भाषा तिचा टोन ऐकून मी विचारात पडलो हाच तो अधिकारी का जो कोल्हापुरात आल्यावर पंजाबी आदरातिथ्य करणार होता. माझा मराठी बाणा जपत मी पुन्हा उत्तर दिले "सरांच्या ओळखीच्या कलाकारांना किंवा ते प्रसिद्ध संगीतकार. त्यांना का नाही कमी पैशात चार शो करायला सांगितले? माझ्यापेक्षा ते जास्त फेमस आहेत तर त्यांच्या नावावर जास्त निधी जमा होईल. सरांच्या मैत्री खातर स्वतःचे बजेट कमी करून पोलिसांसाठी का नाही ते शो करायला पुढे आले”? समाजसेवा,सहकार्य असेल तर महेश टिळेकर आठवणार आणि मेवा मलई खायची असेल तर दुसऱ्याला देणार ही अशी यांची वृत्ती.पोलीस अधिकारी तांबडे यांच्या कानावर मी घडला प्रकार सांगितला तेंव्हा इथून पुढे सूहेल शर्मा सोडून इतर अधिकारी माझ्या संपर्कात असतील आणि कुणी त्रास देणार नाही याची त्यांनी खात्री दिली आणि त्याच अटीवर मी शो करायला तयार झालो.
कॉन्ट्रॅक्ट पेपर घेऊन कोल्हापूरहून माणूस आला त्याला लगेच पुन्हा निघायचे असल्याने मी सही करून पेपर दिले आणि एक कॉपी माझ्यासाठी ठेवली. तो माणूस गेल्यावर निवांतपणे वाचावं म्हणून पेपर पाहू लागलो तर मी आधी पाठवलेल्या रफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये उल्लेख नसलेल्या, नव्याने घालण्यात आलेल्या एका ओळीने माझा विश्वास पुन्हा उडाला.त्यात स्पष्ट उल्लेख होता की जर नैसर्गिक आपत्ती येऊन शो रद्द करावा लागला तर आहे त्याच बजेट मध्ये पुन्हा शो करायची जबाबदारी माझीच असणार. याचा अर्थ शो होण्याच्या आधीपासून जो खर्च होतो तो पाण्यात. नव्याने शो करावा लागला तर माझं नुकसान करून स्वतःचे पैसे खर्च करून सहकार्य करायचे. नांगरे पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातल्यावर त्यांनी लिहायची पद्धत असते म्हणून ते लिहिलं असेल असं सांगत माझीच समजूत काढली. पण माझा एव्हाना पोलीस अधिकाऱ्यावरचा विश्वास उडत चालला होता. कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे जी अडवान्स रक्कम मिळणार होती तेव्हढी मिळाली नाहीच. तिकीट विक्री होईल तसे पैसे मला मिळत गेले.
एक मे ला प्रथम कोल्हापूर मध्ये शो झाला.त्याला जवळपास 20 हजारहुन अधिक प्रेक्षक होते त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. पोलिसांच्यासाठी कार्यक्रम असल्यामुळे पालक मंत्री, पोलीस दलातील उच्च अधिकारी सतीश माथूर उपस्थित होते त्यांनीही कार्यक्रम आवडल्याचे सांगत कौतुक केले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी,मंत्री,जमलेले प्रेक्षक खुर्च्यां,सोफ्यावर बसून कार्यक्रमाचा आनंद घेत होते पण याच कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी,आमच्या कलाकारांच्या सुरक्षिततेसाठी काही पोलिसांना दिवसभर उभे असल्याचे पाहून मला वाईट वाटलं. कार्यक्रमात मी त्यांना स्टेजवर बोलवून माझ्या बरोबर थोडं नाचायला लावले काहींना प्रश्न विचारून बोलण्याची संधी दिली. काही पोलिसांनी गाणीही गाऊन दाखवली. त्यांच्यात असलेल्या कलागुणांना मोठ्या कार्यक्रमात काही क्षण संधी मिळाल्यामुळे नेहमीचा कामाचा असणारा ताण विसरून त्यांनीही मजा मस्ती केली. मी त्यांना मराठी तारका तर्फे पैठणी साडी गिफ्ट दिल्यावर ते आणखी खुश झाले "साहेब तुमच्यामुळे येवढ्या मोठ्या कार्यक्रमात आम्हाला संधी मिळाली" असे म्हणत पोलीस माझे आभार मानत होते.
ते पाहून वाटलं यांच्यात इतके कलागुण, टॅलेंट असून कधी ते पेपर, मीडिया मधून लोकांसमोर का नाही येत.? काही पोलिस अधिकारी या ना त्या कारणाने पेपरमध्ये, टीव्ही न्यूज मध्ये चमकत असतात.कधी योगा करताना,कुठे धावण्याच्या स्पर्धेत भाग घेताना,कुठल्या मोठ्या सेलिब्रिटी बरोबर कार्यक्रमात,तर कधी मित्रांच्या घोळक्यात गाणी म्हणून नाचताना.फॅमिली बरोबर कुठं बाहेर भटकतानाचेही फोटो त्यांचे सगळीकडे वायरल होतात की केले जातात असा काही वेळा प्रश्न पडतो. जसं काय प्रत्येक ठिकाणी कॅमेरा,मीडिया घेऊनच हे अधिकारी फिरत असावेत का? हे अधिकारी पोलिस दलात काम करतात की मनोरंजन क्षेत्रात सेलिब्रिटी आहे असं अनेकदा वाटू लागतं.
ऑन ड्युटी चोवीस तास काम करणाऱ्या पोलिसांचा,जे जनतेच्या नजरेत खरे ’सिंघम’आहेत.अश्यांचा फॅमिली बरोबरचा फोटो,कामावर असताना कर्तव्य बजावतानाचा फोटो फार कधी वायरल होत नाही, त्याला प्रसिध्दी मिळत नाही.असे का होत असेल? हा मला सतत प्रश्न पडत असतो.पण मी मात्र स्टेजवर बोलवून पोलिसांना नाचायला लावले तो व्हिडिओ एका न्यूज चॅनेल ने बातमी म्हणून दाखवल्याने काही तासातच खूप वायरल झाला आणि मला अनेकांचे मेसेज,फोन येऊ लागले.आपण सगळीकडे दिसतोय त्या व्हिडिओ मधून याचा नक्कीच आनंद त्या पोलिसांनाही झालाच असणार.
कोल्हापूर नंतर सातारा शो केला तिथेही लोकांचा तुफान प्रतिसाद. सांगली मध्ये शो च्या दिवशी दुपारी तीन वाजता पाऊस पडायला सुरुवात झाली तसे टेंशन वाढू लागले. मला डोळ्यासमोर कॉन्ट्रॅक्ट पेपर मधील अट दिसू लागली. पावसामुळे शो नाही झाला तर त्या शोसाठी मेहनत घेणारे कलाकार,डान्सर, बॅक स्टेज वर्कर असा 80 जणांचा लवाजमा असल्याने मोठा आर्थिक फटका बसणार या विचारानेच डोकं सुन्न झालं. देवाला प्रार्थना केली कोणतीही अडचण न येता माझे सगळे शो व्यवस्थित पार पडू देत. कलाकारांना मेकअप करून तयार रहायला सांगितले. दुपारी तीनला सुरू झालेला पाऊस तासाभराने थांबला आणि कडक ऊन पडले. सांगलिकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.दुसऱ्या दिवशी सकाळी सोलापूरला जायला आम्ही निघालो प्रवासात असताना समजले की सांगलीत पावसाने थैमान घातले आहे.
सोलापूर मध्ये शोच्या वेळी पहिलं नृत्य सुरू होणार तोच पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली. स्टेजवर बॅक ड्रॉपला असलेल्या मोठा LED स्क्रीन मध्ये पाणी गेल्याने तो बंद झाला. टेक्निशियनने सांगितले आता पुन्हा सुरू होणार नाही LED. नाही झाला तरी कार्यक्रम सुरू करू म्हणत मी पहिले गणपती वंदना नृत्य करणाऱ्या अभिनेत्रीला स्टेजवर एन्ट्री घ्यायला सांगितली.गाणे सुरू झाले साधारणतः एखाद मिनिटानंतर बंद पडलेला LED आपोआप सुरू होऊन त्यावर ग्राफिक्स केलेली गणपतीची विविध रूपे दिसू लागली. देवाने पुन्हा एकदा माझ्या मदतीला घेतलेली धाव पाहून मनोमन हात जोडले.नंतर पावसाचे थेंब पडनेही थांबले.पोलीस निधीसाठी करोडो रुपयांचा निधी जमा होण्यासाठी मराठी तारका कार्यक्रमाच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलता आला याचा अभिमान वाटला.माझ्या संपूर्ण टीमची त्यामागे मेहनत आहे.
पोलिस निधीसाठी शो करून वर्षे गेली तरी आधी जे मला सांगण्यात आले होते पुढे पोलिसांसाठी हिंदी शो मिळतील ज्यात मोठे बजेट मिळेल. तसे पुढे काहीच घडले नाही.अर्थात कामाच्या आधी अशी गाजर शेती दाखवून काम झाल्यावर गाजर हलवा राहू दे पण साधी गाजर कोशिंबीर सुद्धा न देऊन गोड बोलणारे हलवाई मी भरपूर पाहिलेत.पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचा असा कटू अनुभव आल्यामुळे मनात राग तसाच होता.
मागच्या वर्षी गणेशोत्सवात ’लालबागचा राजा’ गणपतीच्या दर्शनाला जायचं ठरवत होतो पण तिथे रोज वाढणारी गर्दी आणि धक्काबुक्की पाहता न्यूज मध्ये पाहून रोज घरातूनच लालबागच्या राजाला हात जोडत होतो. विसर्जनाच्या दिवशी मात्र सकाळ पासून हुरहूर लागली की लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला जायला हवं होतं. मग एका मित्राने सांगितले मुख दर्शन पटकन होऊ शकेल. मित्राच्या बाईक वरून तिथं पोचलो तर गर्दी होती. मुख दर्शनाची भक्तांची रांग पुढे सरकत होती.जवळून दर्शन व्हावे म्हणून वाट पाहत तासन तास थांबलेल्या भक्तांची वेगळी मोठी रांग पाहून घाबरलोच.
मुख दर्शनाच्या रांगेतून हळू हळू पुढे चालत जवळ पोचल्यावर हात जोडून काही अंतरावर असणाऱ्या मूर्तीकडे पाहून वळताना पुढे उभा असलेला पोलीस जवळ येत विचारू लागला "आपण ते मराठी तारका चे महेश टिळेकर ना?"मी हो सांगताच "झाले ना दर्शन " असे त्याने विचारल्यावर मी मुख दर्शन घेतल्याचे सांगितल्यावर "टिळेकर साहेब इतकं जवळ अंतर असून बाप्पाच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद न घेताच जाणार तुम्ही?" त्याने विचारलेल्या प्रश्नावर मी खुलासा केला” माझी तर मनापासून इच्छा आहे चरण स्पर्श करून दर्शन घ्यावे. पण ह्या गर्दीत हे मंडळाचे कायकर्ते कसे जाऊ देतील मूर्ती जवळ?". मी बोलायला अवकाश त्याने माझ्या हाताला धरत "अहो हा गावडे काय कामाचा मग?"असं म्हणत मला पुढे घेऊन गेला मंडळाच्या कार्यकर्त्यांना माझी ओळख सांगितली त्यांनीही मला ओळखले आणि पुढे नेऊन बाप्पाच्या पायावर डोकं ठेवून चरण स्पर्श करता आले. डोळे भरून दर्शन झाले. त्या कार्यकर्त्याने बाप्पाच्या पायावर वाहिलेले कुंकू मला घेऊन दिले.दर्शन घेऊन तृप्त झालो.
गावडे पोलीसने पुन्हा हाताला धरून गर्दीतून मला सुखरूप बाहेर काढलं. त्याला मी धन्यवाद देत ”तुमच्यामुळे आज माझे इतकं जवळून दर्शन झालं "असं सांगताच ." साहेब तुम्ही पोलिसांसाठी शो करताय मग आम्ही इतकं ही करू नये का तुमच्यासाठी? आमच्या पोलिसांना तुम्ही नाचायचा चान्स दिला तुमच्या तारका शो मध्ये, तो व्हिडिओ पाहिलाय मी, आणि तुमचा वन रुम किचन सिनेमा जेंव्हा लागतो टीव्ही वर तेंव्हा मी आणि माझी बायको बघतोच .आमचीच स्टोरी आहे असं वाटतं. बघताना डोळ्यात पाणी येतं साहेब, वरळीला भाड्याच्या एका खोलीत राहतोय पाच वर्षाचा मुलगा आहे. पोलिसाला मिळणाऱ्या पगारात मुंबईत घर घेणं या जन्मात तरी शक्य नाही”.बोलताना गावडे काहीसा भाऊक झाला.त्याने माझ्या कामाच्या केलेल्या कौतुकानं खुश होण्याऐवजी त्याचं दुःख ऐकून मी हेलावून गेलो.निघताना त्याने माझ्याबरोबर सेल्फी घेतला. घरी गेल्या गेल्या बायकोला फोटो दाखवला की ती पण खुश होईल असं सांगताना त्याचा चेहरा खुलला.
मी पुन्हा एकदा त्याचे आभार मानून निघालो.चार पावले पुढं जात नाही तोच "टिळेकर साहेब, थांबा थोडं " असं म्हणत गावडे माझ्या जवळ आला.खाकी पँटच्या खिशातून ग्लुकोज बिस्किटाचा पुडा काढून मला देत म्हणाला "ट्रॅफिक मधून घरी पोचायला उशीर होईल तुम्हाला,भूक लागली तर काहीतरी खायला असूदे जवळ" हाताने त्याला बाय करत मी पुढे चालू लागलो. खाकी वर्दीच्या आतील भुतं मी याआधी पाहिली होती पण वर्दीतला हा ’माणूस' पाहून, त्याला भेटुन निघताना तोंडातून शब्द बाहेर आले ”बाप्पा वर्दी मधील या खऱ्या माणसाचं मुंबईत लवकर स्वतःचं घर होऊदे"