हिंदू धर्मासह इस्लाम धर्मात सेक्स बद्दल माहिती देणारे ग्रंथ कोणते?

ज्या देशात योनींची मंदिरं आहेत. योनिदेव्या आहेत. त्या देशात धर्मांध लोक ‘कामसूत्र’ नावाचा ग्रंथ जाळतात. काय आहे ‘कामसूत्र’? हिंदू धर्मासह इस्लाम धर्मात सेक्स बद्दल माहिती देणारे ग्रंथ कोणते? जाणून घेण्यासाठी वाचा डॉ. प्रदीप पाटील यांचा विशेष लेख

Update: 2021-08-31 11:21 GMT

सेक्स" कायमचा जाळून टाकता आला असता तर बरे झाले असते. म्हणजे निदान कामसूत्र ग्रंथ तरी जाळण्यासाठी जाळणारे जन्माला आले नसते!!

सेक्स ही आदिम प्रेरणा आहे. त्यातूनच तर प्रत्येक जीव जन्माला येतो आणि या जगात विविध अविष्कार तो निर्माण करत राहतो.

खरं तर या जगाची जननी विविध अशा मैथुनाची निर्मिती आहे. मग ते मैथुन रासायनिक अभिक्रियांचे असो जीवांचे असो वा सूक्ष्मात सूक्ष्म अणूंचे असो. ज्या हिंदुधर्माचा आंधळा जयजयकार करत कामसूत्राची होळी परवा गुजरातेत केली. त्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेला पुरुषार्थ हा जाळण्यासाठी नव्हता, नाही...

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही देवांनी दिलेली हिंदूंना जगण्यासाठीची आज्ञा आहे. यात काम म्हणजे प्रेम आणि सेक्स. तेच तर एकत्र करून वात्सायन नावाच्या ऋषीने लिहून काढले आणि आयुष्यभर संशोधन करून जे निष्कर्ष काढले, मग भले ते अवैज्ञानिक असोत पण संशोधन वृत्ती तर दाखवली! त्या वात्सायन ऋषीने कामसूत्र लिहून काढला. तो फक्त सेक्स चा ग्रंथ नाही. तो स्त्री-पुरुषांनी एकत्र आल्यावर कशा तऱ्हेने नातेसंबंध ठेवावेत याचे विवरण करतो.

म्हणजे इथे जाळणारे स्वतःच्या धर्मालाच जाळत आहेत. तालिबान्यांना नावे ठेवणारेच स्वतः जाळपोळ, तोडफोड यावर श्रद्धा ठेवणारे आहेत. आणि.. त्यावरच तर आजचे राजकारण उभे आहे.

सुवासिक धूप, मेणबत्या, संगीत, सुवासिक तेल हे सेक्स मध्ये कसे उपयोगात आणता येतात. एवढेच कामसूत्रानेच फक्त सांगितलेले नाही. तर योग सुद्धा सेक्स कसे करावा हे सांगतो.

योगा हे तंत्रमार्गातून अवतरले आहे. तंत्रमार्ग म्हणजे तांत्रिक विद्या आणि यात सेक्स विषयी भरपूर काही सांगितले गेले आहे.

तंत्र मार्गावरील अनेक पुस्तके आहेत. ती हिंदूच आहेत. योगमार्गातील असलेल्या अनेकांना भुजंगासन हे प्राचीन आसन माहित असेल. या आसनाचा पहिला उल्लेख घेरण्ड संहिता या पुस्तकात आढळतो. त्याच बरोबर 'हठयोग प्रदिपिका' हा एक प्राचीन ग्रंथ आहे. ज्यामध्ये पुरुष लिंग, पुरुष अंडकोष आणि लिंगभाग आणि सेक्स याविषयी भरपूर लिहिले गेले आहे. भुजंगासन हे सेक्स प्रदीप्त करते असे यातून दर्शविले आहे.

मग ही पुस्तके जाळायची का?

याच योगाचा आधार घेऊन अनेक हिंदू बुवा तयार झाले आणि ते अमेरिकेत युरोपात सुद्धा गेले. तेथे त्यांनी योगा शिकवता शिकवता अनेक सेक्स स्कॅंडल केलेली आहेत. उदाहरणार्थ, स्वामी रामा हे तीस वर्षापूर्वी पेनिन्सिल्व्हिया येथे आश्रम चालवायचे. एका 19 वर्षाच्या मुलीने लैंगिक छळाच्या आरोपाखाली त्यांच्यावर कोर्टात केस दाखल केली आणि हे महाशय आपला पोकॉनो फुटहिल्स येथील आलिशान आश्रम सोडून भारतात पळून आले!! पण त्या मुलीला पाच वर्षानंतर दोन लाख डॉलर्स अशी भरपाई द्यावी असा कोर्टाने आदेश दिला.

भारतात तर अशा अनेक सेक्स गुरूंनी अनेक महिलांना फसवले आहे, लुटले आहे. त्यावेळी कामसूत्र जाळणारे लपून बसलेले होते! तेव्हा धर्म धोक्यात आलेला नव्हता!! मग योगा आणि योग गुरु यांनासुद्धा शिक्षा द्यायला नको काय?

तंत्रविद्येत कुंडलिनी नावाच्या अवैज्ञानिक मताला खूप महत्त्व दिले जाते. अगदी कार्ल जुंग या मानस तज्ञाने सुद्धा कुंडलिनी जागी करण्याची विद्या शिकायचा प्रयत्न केला होता. कुंडलिनी म्हणजे अत्युच्च काम आनंद देणारी चक्रं होत असे प्रतिपादन अनेक तांत्रिकांनी केले आहे. ज्या कमळाला निवडून सत्तेवर बसविले आहे. ते कमळ कुंडलीनी चक्रात ह्रदय चक्रात जेव्हा उमलते. तेव्हा काम जागा होतो. हे खुद्द वात्सायन म्हणतो. मग म्हणून जाळणाऱ्या धर्मवीरांचा राग आहे की काय कामसुत्रावर? हे तर तालीबान्यांनी मुसलमानानांच मारून टाकल्यासारखे नाही का होणार? आता मग या कमळाचे काय करावे?

बरं हे फक्त भारतातच घडले आहे असे नाही. हे कामसूत्र जाळणारे हिंदुत्ववादी धर्मांध ज्या मुस्लिमांना शत्रू मानतात. त्या धर्मात देखील कामसूत्रासारखी पुस्तके आहेत. अरबी भाषेत लिहिलेले 'अल् रौद अल् अतीर फी नुझहद् अल् हतीर' सारखे ग्रंथ अरबी कामग्रंथ आहे.

आता बुद्धाचा पुतळा फोडणाऱ्या तालिबान्यांना हा ग्रंथ जाळण्याची प्रेरणा आमच्या भारतातले धर्मवीर देऊन मोकळे झालेले आहेत.

लैंगिक विज्ञान हे संशोधित करणाऱ्यांचा सन्मान या समाजात कधीही झालेला नाही. धर्माने तर सातत्याने लैंगिकता ही त्याज्य ठरवत आणलेली आहे. अध्यात्माच्या नावाखाली सर्वसंगपरित्याग नावाची भोंगळ कल्पना सेक्सच्या मुळावर कायम उठलेली आहे. प्रश्न असा आहे, ज्या कामक्रीडेमुळे आपण जन्माला आलो तिचा ग्रंथ जाळणे म्हणजे स्वतःला जाळण्यासारखे आहे.

नाहीतरी सध्यातरी राजकारणासाठी काहीही जाळायला शूरवीर धर्मवीर तयारच आहेत.

सर्वच धर्मातले.

तोच तर खरा धर्म आहे !

कामसूत्रा बरोबर 'कामा'चे महत्त्व सांगणाऱ्या देवादिकांनी निर्देश केलेल्या कोकशास्त्र उर्फ रतीशास्त्र, अनंगरंग, रतीरहस्य, समरदिपिका, जयमंगल, रतीमंजिरी, रतीअर्थदिपिका, कामाट्टुपल, इ. असे अनेक ग्रंथ आहेत.

या साऱ्याच ग्रंथांना खरेतर मानवी जीवनाचा एक पैलू निर्भीडपणे मांडल्या बद्दल सन्मान द्यायला हवा. युरोपातल्या 'स्पेक्युलम दा फोदरी', आफ्रिकेतील 'लिबर द कॉयटू' सारखे जगभर अनेक ग्रंथ हे त्या त्या देशांनी जपून ठेवले आहेत. त्या देशातील धर्मांध जेव्हा जागे होतील. तेव्हा ते जाळून टाकण्याचा हिंदुस्थानचा आदर्श मात्र नक्कीच घेतील.

खरेतर लैंगिक विज्ञानात थोर काम केलेल्या किन्से, मास्टर्स आणि जाॅन्सन यांच्या सेक्स वरील संशोधनावर पाणी फिरवण्याचे काम त्यावेळी धर्मांधांनी केले होते. पण ते त्यांना पुरून उरले होते. म्हणूनच तेथे १९७० च्या दशकात कामक्रांती किंवा सेक्शुअल रिव्होल्युशन झाले. आणि स्त्री-पुरुष समानतेबरोबरच लैंगिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले.

धर्मज्वर चेतवत ठेवून सत्ता राखायची थेरं आता स्वधर्मातीलच एका पुरूषार्थावर उलटली आहेत. जाळणे, तोडणे, मारणे, आणि सर्वार्थाने फेकणे हा पुरूषार्थ प्रछन्नपणे बागडतोय या देशात!

या देशात योनींची मंदिरं आहेत. योनिदेव्या आहेत. अघळपघळ पसरलेल्या इथल्या लैंगिक जाणिवांचे सामाजिक अविष्कारही बहुविध आहेत. कोणाला कोणाला जाळणार?

- डाॅ. प्रदीप पाटील

Tags:    

Similar News