आमच्या आया सिरियलमधल्या आयांसारख्या नाहीत, हेच बरं

आज मदर्स डे च्या निमित्त टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांमधील आया कशा अतिशयोक्ती करून रंगवल्या जातात याबद्दल दै. लोकसत्ता च्या पत्रकार भक्ती कानोलकर यांनी लिहिलं आहे. सोबतच आईला मदर्स डे च्या शुभेच्छा ही दिल्या आहेत. नेमकं काय म्हणाल्या आहेत भक्ती जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख...

Update: 2022-05-08 11:38 GMT

 मध्यंतरी एका सिरियलचा प्रोमो सारखा दिसत होता. त्यात निवेदिता सराफ होत्या. 'माझ्या आईची साडी तुम्ही नेसल्यामुळे मला वाटलं तुम्ही माझी आईच आहात!' असं त्यातली मुलगी म्हणते आणि निवेदिता म्हणतात… 'अगं आईच आहे मी तुझी!'

हा प्रोमो जेवढ्या वेळा दिसला तेवढ्या वेळा तो बघुन मी आणि प्रसाद दात काढत होतो. त्यात एकदा मी फोनवर मम्मीला म्हटलं - काय फाल्तुपणा असतो गं या सिरियल्सचा… निवेदिता सराफांच्या जागी आमच्या आया (यात मावशी, आत्या, काकू या समवयस्क बायकाही आल्याच अर्थात!) असत्या तर - 'मेल्यांनो, नीट डोळे उघडुन बघा की पण जरा!' म्हणुन 'वसवसल्या' असत्या. काय त्यांचे कपडे. काय त्यांचे दागिने. काय ते सतत रडके, अन्यायग्रस्त भाव. कुणी एक ठेवुन दिली तर दुसरी ठेवून घ्यायला सदैव तत्पर. बघुनही हॅंग होतं डोकं! त्यावर मम्मीलाही हे पटलं आणि मग सिरियलमधल्या 'अंगावर येणाऱ्या' आयांबद्दल आमच्या गप्पा झाल्या.

सिरियलमधल्या आयांसारख्या आमच्या आया दिवसभर काठापदराच्या साड्या नेसुन टेचात राहत नाहीत. स्वयंपाकघर हे एकच त्यांचं जग नाही.

पोरांचे नसते लाड करत नाहीत. पोटापाण्यासाठी नोकरीधंदा करतात. त्यांना बाहेर त्यांचं जग आहे. त्या जगाचे फायदेतोटे आहेत आणि स्ट्रेसही आहेत.

पोरांना सतत तव्यावरुन गरम पोळी पानात वाढणं किंवा गाजर का हलवा ॲण्ड ॲाल करुन खायला घालणं यातच इतिकर्तव्यता मानत नाहीत. उलट नावडीचा पदार्थही पहिला वाढलाय तेवढा संपवायचाच नाही तर गळ्यात बांधेन म्हणुन अन्याय करतात. सहसा - मुलांना हेवेदावे करायला, कुटूंबातल्या इतरांशी राजकारणी धूर्तपणे वागायला शिकवत नाहीत. स्वतःचं बहिण, जाऊ, नणंदा वगैरेंशी काही बिनसलं तर त्यांच्या विरुद्ध कटकारस्थानं करत नाहीत. त्यांच्या संसारात विष कालवत नाहीत. उलट, एकमेकींची फोनवरच झाडाझडती घेऊन पुन्हा दोन तासांनी - आज तुझ्याकडे जेवायला काय नी माझ्याकडे काय… वगैरे करत गळ्यात गळे घालतात.


सिरियलमधल्या आयांसारखं यांनी मुलांना शेफारवुन वगैरे ठेवायचा तर प्रश्नच येत नाही. मुलांनी आपापली battles आपण लढावीत असं मानणाऱ्या आणि त्यासाठी मुलांना सर्वतोपरी तयार करणाऱ्या आहेत आमच्या आया. शिवाय मुलं ही शक्यतो उठसुट कौतुकं करुन डोक्यावर बसवण्यासाठी नसून संस्कार, धाकधपटशा वगैरे ओझ्याखाली दाबुन टाकून साग्रसंगीत समाचार घेण्यासाठीच आहेत असा किमान आमच्या तरी आयांचा समज आहे.

अर्थात त्यामुळे आमचंही काही नुकसान झालेलं नाही. झाला असेल तर फायदाच झालाय. कुणी अनाठायी कौतुक केलं तर अंगावर मांस वगैरे चढत नाही, उलट जरा ॲाक्वर्डच वाटत राहतं. आपण फार शहाणे आहोत असं वाटून पाय जमिनीवरुन हलायला लागले की आपोआप मागुन कुणी तरी लगाम खेचतं आणि पाय पुन्हा जमिनीला टेकतात. या अशा आयांमुळे कुणी अरे म्हणुन जवळ आलं तर कारे म्हणुन त्याला रोखता येतं. कुणी मुळूमुळू रडवायचा इरादा ठेवला तर प्रसंगी त्याचे दातही घशात घालता येतात.

त्यामुळे आमच्या आया सिरियलमधल्या आयांसारख्या नाहीत, हेच बरं आहे! नाही, बेस्ट आहे!

सिरियलमधल्या गुडीगुडी आयांसारख्या दूर दूर तक नसलेल्या… नॅार्मल जगणाऱ्या… मुलांनाही नॅार्मल जगायला तयार करणाऱ्या… आंतर्बाह्य ओरिजिनल असणाऱ्या - तुमच्या आमच्या आयांना हॅपी मदर्स डे!

Tags:    

Similar News