करोनाची लढाई घरातही आणि फिल्डवरही...

घरात लागोपाठ 9 जणं करोनाबाधित... त्यात पत्रकार म्हणून फिल्डवर काम करताना बेड, इंजेक्शनसाठी लोकांची होणारी फरफट, मृतदेहांच्या रांगा आणि रेमडेसिवीर बातम्यांचे कव्हरेज करताना रडायला यायचं... गेल्या 20 दिवसातल्या लढाईचा अंगावर काटा आणणारा अनुभव सांगतायेत टीव्ही 9च्या पत्रकार अश्विनी सातव डोके...;

Update: 2021-04-26 04:32 GMT

मागचे वीस-पंचवीस दिवस आयुष्यात पुन्हा येऊच नयेत... घरात सगळे जण सगळी काळजी घेत असतानाही एका बेसावध क्षणी कोरोनाने घरात प्रवेश केलाच... काकी, काका, आई, तिघे भाऊ, भावजय, पाच वर्षांची भाची अन पावणे दोन वर्षाचा भाचा असे नऊ जण पॉझिटिव्ह.... एकापाठोपाठ एक असा संसर्ग...

टेस्ट करण्यापूर्वीच सगळ्यांची औषधं सुरु केली होती. लक्षण सर्वांनाच... खोकला, ताप, अशक्तपणा... टेस्ट झाल्यावर काका आणि काकीच HRCT केलं. काकाचा स्कोर 8 डॉक्टर म्हणाले काकाच वय पाहता ऍडमिट केलल बरं राहील. स्वतःच डोकं न चालवता डॉक्टर सांगितलं ते ऐकायचं हे पक्क होत. लगेच डॉक्टरांच्या सांगण्यानुसार काकाला ऍडमिट केलं. अन् बाकी सगळे होम क्वॉरंटाईन....

तीन एक दिवसात भावाचा त्रास वाढला... ताप काही कमी व्हायचं नाव घेत नव्हता. मग त्यालाही लगेच ऍडमिट केलं. ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्यानं त्याला ऍडमिट केल्यावर लगेच ऑक्सिजन सपोर्ट दिला. हा स्टेबल होत नाहीच तोवर धाकट्याला त्रास व्हायला सुरुवात. मग लगोलग सगळ्या तपासण्या... पण डॉक्टर म्हणाले त्याला ऍडमिट करण्याची आवश्यकता नाही. घरातच ट्रिटमेंट देऊ... सगळे ठीक होतील. जरा दिलासा मिळाला.

दरम्यान, ऑफिसला सुट्टी नव्हती. रोज घर, हॉस्पिटल, ऑफिस, अन् ऑफिस, हॉस्पिटल, घर असा दिनक्रम सुरु होता. मध्येच ऑफिसमधील एक जण पॉझिटिव्ह... टेंशन मध्ये आणखी भर... लगेच मी टेस्ट केली....पण तीन दिवस झाले तरी रिपोर्ट येईना... शेवटी एकदाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला अन हुश्श केलं... फिल्डवर काम करताना बेड इंजेक्शन यांच्यासाठी लोकांची होणारी फरफट पाहिली की घरच्यांचे चेहरे समोर यायचे... त्या लोकांसोबत माझा ही इंजेक्शन, प्लाझ्माचा शोध सुरुच असायचा... फिल्डवरची परिस्थिती पाहून 'मन चिंती ते वैरी ना चिंती...', अशी अवस्था होती.... त्या पंधरा-वीस दिवसात झोप नावाचं प्रकारचं नव्हता... डोळे बंद केले की नको ते दिसायचं...

रेमडेसिवीरच्या बातम्या करताना तर रडायला यायचं इतकी वाईट परिस्थिती... त्यातच एक दिवस ससून मध्ये मृतदेहांच्या रांगा लागल्याचा फोन आला... जायची हिम्मत झाली नाही... सगळ्याच हॉस्पिटलमध्ये सारखी परिस्थिती... डॉक्टर, नर्स, मामा, मावशी, सेक्युरिटी गार्ड, ऍम्ब्युलन्स ड्रायव्हर यांच्यावर केवढा ताण आहे हे जवळुन अनुभवलं. हे सारं सहन करण्यापलिकडलं होत... त्यातच बेड, इंजेक्शन, ऑक्सिजन व्हेंटिलेटरसाठी येणारे अनेक परिचितांचे फोन... सगळं एकूण मानसिक, शारीरिक पातळीवर थकवणार होत...

बारा दिवसांनी काकाला डिस्चार्ज मिळाला... तेव्हा जरा रिलॅक्स वाटलं... घरच्यांचा त्रासही बराच कमी झाला होता. काकाला घरी सोडल्यावर तीन चार दिवसांनी भावाला डिस्चार्ज मिळाला. दोघेही घरी आल्यावर एका मोठ्या टेंशन मधून सुटका झाली. आता सगळे घरी व्यवस्थित आहेत. पण अजूनही होम क्वॉरंटाईनचे नियम पाळतायेत....

या सगळ्यात सर्वात जास्त मदत झाली ती लोकमान्य हॉस्पिटल आणि डॉ. Shrikrishna Joshi यांची... भावाला ऍडमिट केल्यावर डॉक्टर स्वतः पॉझिटिव्ह झाले. तरी ते स्वतः मला भावाचे सगळे अपडेट देत होते. अन् विशेष म्हणजे निगेटिव्ह झाल्यावर लगेच ड्युटीवर हजर झालेत. लोकमान्यच्या सगळ्याच स्टाफचे आभार मानावे तितके कमी आहेत. अहोरात्र प्रत्येक जण झटतोय... येणाऱ्या प्रत्येक फोनवर नातेवाईकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातायेत... सिक्युरिटी गार्ड न थकता न कुरकुरता पेशंटसाठी दिलेली वस्तू अवघ्या काही मिनिटात त्याच्या जवळ पोच करतायेत...

लोकमान्य आणि डॉ. जोशी यांच्याबरोबरच डॉ. अमरसिंह निकम. डॉ. धनंजय वाघ, डॉ. अविनाश भोंडवे, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अनिल बेलेकर, माझे सहकारी Vaibhav Sonawane Pravin Doke यांचीही मदत तितकीच महत्वाची..... लोकहो, कोरोना बरा होतो हे नक्की पण त्यासाठी आपणही काळजी घेणं अन् डॉक्टर सांगितलं ते ऐकणं तितकचं गरजेचं आहे. ज्यांना कोणाला अजूनही कोरोना वैगेरे थोतांड आहे असं वाटत त्या सगळयांना एकदा कोरोना वॉर्डमधून दोन तास पीपीई किट न घातला फेरफटका मारुन आणला पाहिजे...

आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे... तरीही डॉक्टर आणि सर्व प्रकारचा मेडिकल स्टाफ ज्या पध्दतीने काम करतोय त्यांना सलामच आहे. कोरोनाच संकट संपवायचं असेल तर नियम पाळायला हवेत. कोरोना घरात आल्यावर नेमकी काय अवस्था झाली होती हे शब्दात नाही सांगता येत... एक प्रकारची हतबलता आली होती... या वीस दिवसात अनेक जवळचे सोडून गेलेत, काही अजून हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल आहेत... अशी वेळ तुमच्या कोणावर येऊ नये, यासाठी तरी स्वतःला जपा, नियम पाळा..

अश्विनी सातव डोके

(सदर पोस्ट अश्विनी सातव डोके यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Tags:    

Similar News