'जागतिक महिला दिना'च्या निमित्ताने अमरावती येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 'औद्योगिक क्षेत्रात महिलांची भुमीका' या विषयावरती नुकतेच व्याख्यान दिले. उद्योग या क्षेत्राशी तसा माझा फारसा संबंध यापुर्वी कधीच नव्हता. परंतु समुपदेशन केंद्र सुरु केले अन् अनेक महिलांना नैराश्यातून बाहेर काढले तेव्हा काही जणी हाताला काम ही मागू लागल्या..
सर्वांच्या हाताला काम देणे मला शक्य नसले तरी माझ्या अवतीभवती असणाऱ्या ज्या दैनंदिन कामाकाजात मला सतत सोबत करतात अशा माझ्या गरजु महिलांना मी शिलाई मशीन युनिट व पार्लर चे युनिट टाकुन दिले.. गेल्या एक वर्षापासून ते सुरळीत सुरु आहे. आणि मग तेव्हा कुठे उद्योग या क्षेत्राशी माझा जवळुन संबंध यायला लागला.
अनेक अडचणी, नियोजन, नफा तोटा, मार्केटिंग हे सर्व जवळुन अनुभवता आले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे या विषयावरती विद्यार्थींनींशी संवाद साधताना आधी त्यांच्यात सकारात्मकता रुजवणेही गरजेचे होते. प्रेरित करणेही गरजेचे होते.
महाराष्ट्रातील काही सुप्रसिद्ध उद्योजिकांच्या डाॅक्युमेट्रीज मी शब्द व ध्वनीबद्ध केल्या असल्याने यावेळी मुलींना मार्गदर्शन करतांना त्या दाखवल्या. फक्त शब्दांनी संवाद साधण्यापेक्षा दृक श्राव्य माध्यमातून संवाद साधने अधिक परिणामकारक ठरते. याचा खूप चांगला अनुभव मला या काही महिन्यांच्या व्याख्यानातून आला.
या संस्थेत व्याख्यान सुरु होण्यापूर्वी माझ्या हातुन गुलाबाचे रोपटे लावून घेतले तो तर अविस्मरणीय क्षण होता. अन् तब्बल दिड तास मुली मन लावून आपल्याला ऐकू शकतात तेव्हा माझी अन् माझ्या शब्दांची दोघींचीही जबाबदारी वाढली.
8 मार्च जवळ येताच पुढील अनेक कार्यक्रम वाट बघतच होते. तेव्हा भावी उद्योजिकांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडलेले सुंदर व्याख्यान संपले अन् मुलींचा निरोप घेतला.
-Kshipra Mankar