एक अदखलपात्र मौत...
मेल्यानंतर माझ्या मृतदेहाला हिरवी साडी नेसवली जावी, हाती चुडा घालावा, कंबरेला लिंब बांधावा आणि वाजतगाजत विदा करावं अशी इच्छा बाळगणाऱ्या लच्चनबाईची पांढऱ्या प्लॅस्टिक बॅगमध्ये रवानगी झाली. पुनर्जन्म झाला तर बाईचा जन्म कधी न लाभो ! असं का म्हणायच्या लच्चनबाई? तिची कहाणी आणि तिचे विचार समीर गायकवाड यांनी आपल्या शब्दात मांडले आहे...
नुकतीच लच्चनबाई मेली. तसंही तिला कुणी नातलग नव्हतं. रक्ताच्या आप्तांनी लोटून दिलेलं. मला खात्री आहे की ती गेल्याची बातमी कळताच तिच्या अड्ड्यावरच्या पोरी मात्र आई मेल्यासारख्या ढसाढसा रडल्या असतील, अगदी घोर आक्रोश केला असेल. हजारात एखादी मालकीण इतकी मायाळू आणि संवेदनशील असते. साठीपार वय होतं तिचं. तिचं दमलेलं शरीर जळून खाक झाल्यावर तिच्या अस्थी विविध प्रवास करुन समुद्रात विसावतील.
मला आठवतेय तिला दोन खून करायचे होते एक जन्मदात्या बापाचा आणि दुसऱ्या तिच्या दल्ल्याचा, मात्र ते धाडस तिच्या अंगी आलंच नाही. तिच्या मरणानंतर कर्नाटकात दावणगिरीनजीक खेड्यात राहत असलेला तिचा थेरडा बाप सहजी मरणार नाही, हाल हाल होऊन मरेल. मागच्या लॉकडाऊनमध्ये अनेक बायकापोरी खोल्यांना कुलुप लावून निघून गेल्या पहाडी काळजाच्या लच्चनबाईची एकही पोरगी माघारी गेली नाही. ती फार लढाऊ बाण्याची होती. नास्तिक होती. फोरास रोडला ती एकमेव असावी जिच्या खोल्यांमध्ये कुठल्याही देवांच्या तसबिरी नव्हत्या. स्थूल देहाची, गोल चेहऱ्याची, मोठाल्या डोळ्याची, पानाची शौकीन असलेली लच्चनबाई दिलखुलास हसायची. मूडमध्ये असली तर बोटी - बॉटल मागवायची.
वसईतला कुणी एक आशिक होता तिचा, तो अपघातात गेल्यावर लच्चनबाईला त्याच्या अंतिम संस्कारासाठी त्याच्या घरी जायचं होतं पण समाजाच्या भीतीपोटी जमलं नाही. मग रात्रीच टॅक्सी करुन ती मुर्दाघरात गेली. त्याच्या छिन्नविच्छिन्न देहावर पडून रडली. सकाळी पोस्टमार्टेम करणाऱ्या डॉक्टरांना त्या बॉडीवर नक्कीच काही वेगळ्याच वस्तू आढळल्या असतील, अनामिक सुगंधही जाणवला असेल.
लच्चनबाई रसिक होती, हौशी होती. तिचा यार गेल्यानंतर तिचा रंगेलपणा संपला. आवडीच्या वस्तू निकाली निघाल्या. तिच्या जगण्यातलं सत्व हरवलं. तिच्या बायकापोरींना तिने खूप जपलं. आपली सगळी माया प्रेम त्यांना दिलं. पोलिसांसाठी आणि माझ्यासारख्या बुणग्यांसाठी ती मोठी आधाराची होती.
लच्चनबाईची एकच इच्छा होती, ती मेल्यावर तिच्या मृतदेहाला हिरवी साडी नेसवली जावी, हाती चुडा घालावा, कंबरेला लिंब बांधावा. तिला वाजतगाजत विदा करावं. यातलं काहीच नसीब झालं नाही. पांढऱ्या प्लॅस्टिक बॅगमध्ये तिच्या कलेवराची रवानगी झाली.
मरताना तिचे डोळे सताड उघडे असतील तर पाहणारा थिजला असता कारण त्यात एक निरागस आई दिसायची जिची लेक बाजारात नागवली गेली आणि एक प्रौढा दिसायची जिला आई व्हायचं होतं ! आपल्या स्वप्नांसोबतच ती मरण पावली. तिला जगण्याने छळलं होतं तरीही त्या जगण्यावर तिचं बेहद्द प्रेम होतं कारण स्वतःसाठी जगायचं तिने कधीच सोडून दिलं होतं. लच्चनबाईचं मूळ नाव सुलोचना होतं जे तिने त्यागलं होतं आणि त्याचाच अपभ्रंश करुन नुसतं लच्चन ठेवलं होतं.
सुलोचना कधीच मेली होती, तीन दिवसांपूर्वी लच्चनबाई मेली. तिच्या आठवणी जिवंत आहेत. कधी संताप आनावर झाला तर म्हणायची की जर पुनर्जन्म असलाच तर आपल्याला बाईचा जन्म कधी न लाभो !.. फार सोसलं होतं तिने. तिच्या काळजातला बाभुळकाटा दुनियेला कधी दिसलाच नव्हता...
तरीही मी तुला सांगतो लच्चन, पुनर्जन्म असलाच तर पुढच्या जन्मी तु मुलगी म्हणून माझ्या पोटी यावंस. तुझे लाड करेन. कोडकौतुक करेन. बाईपणातलं सुख जाणवेल असं जगणं तुला मिळवून देईन..