'मीच माझ्या रुपाची राणी ग'
मन मारुन जगणाऱ्या अनेक स्त्रीया तुम्ही पाहिल्या असतील. अशा महिलांसाठी वेश्या व्यवसाय करणारी जमखंडीची सावित्री नक्कीच आदर्श आहे. सावित्री सांगते "दुनियेने पैसे दिले की मी त्यांच्याखाली झोपते इथवरच माझा आणि त्यांचा संबंध.. काम झालं की पब्लिक निघून जातं.. माझ्यावर मालकी नाही कुणाची न कुणाची ताबेदारी. मी काळी असली म्हणून काय झालं? मला जे रंग आवडतात त्याच रंगाच्या साड्या मी नेसणार.”;
मिरजेतल्या उत्तमनगर वस्तीत एका केसस्टडीच्या वेळेस बागलकोटमधील जमखंडीची सावित्री भेटली होती. एकदम कजाग. दिवसातून दहा वेळा तंबाखू मळणारी. पदराचे भान नसणारी. बोलताना उजव्या हाताच्या तळव्यावर डाव्या हाताची मुठ आपटणारी. वेळप्रसंगी आपल्या गिऱ्हाईकाला गच्चीला धरून बाहेर काढणारी आणि बाका प्रसंग असेल तर लाथेने तुडवून काढणारी. तोंडाचा चंबू करून हवेची फुक मारावी तशी ओठाच्या डाव्या कोपऱ्यातून थुंकीची पिचकारी उडवणारी. बोलताना मध्येच थांबून डोळे रोखून बघणारी. लाडात आली की हातातल्या बांगडयांचा चाळा करणारी डावखुऱ्या हाताची बिनधास्त बाई..
खुर्चीवर पाय सोडून बसली की पावलांनी तबला वाजवावा तसा एक सलग टाचा चवडे आपटत राहणारी. रागात असली की भिताडाकडे तोंड करून बसणारी आणि आनंदाचा ओव्हरडोस असला की दोन टॅंगोपंच आरामात रिचवून आपल्या फळकुटाच्या खोलीच्या साम्राज्यात बिनघोर लोळत पडणारी. कधी कथित निर्लज्जतेची सीमा गाठली की अनावृत्त होऊन दाराआडून डोकावणारी. केसाचे कधी बोचकं करणारी तर कधी मस्त आवरून सावरून गजरा माळून अंबाडा घालणारी.
जेवायला बसली की मचामचा आवाज करणारी. चहा पिताना फुर्र फुर्र करणारी, इच्छा असेल तरच धंद्याला बसणारी नाहीतर सिनेमा थियेटरात जाऊन बसणारी. कधीही कुणाच्याही भांडणात मधे न पडणारी पण संकटात मदत करणारी. कधीही कुण्या लहान लेकराच्या गालावरून हात न फिरवणारी पण मर्जी होताच वस्तीतल्या खुडूक झालेल्या रंडीला आपल्या कमाईतली मोठी नोट देणारी सावित्री एक अजब रसायन होतं...
रंगाने बऱ्यापैकी काळी होती ती. जगातल्या कथित सौंदर्याच्या व्याख्येच्या मापदंडानुसार ती देखणी तर अजिबात नव्हती. तिच्या मते सौंदर्याच्या व्याख्या ज्याच्या आधारे ठरवल्या गेल्या ते सगळी मानके म्हणजे बायकांच्या विरुद्धचा एक चापलुसीचा वासनायुक्त बनाव होता. तिच्या चेहऱ्याची ठेवण बऱ्यापैकी वेगळी होती. व्हंडगुळया कपाळाची, बसक्या नाकाची आणि दात पुढे आलेल्या काळ्या मोठ्या ओठाची पुरुषांसाठी काहीशी अनाकर्षक अशी.
चपटी हनुवटी आणि वर आलेले गाल यामुळे तिला सगळे चौकटची काळी राणी म्हणत! तिला कुणी असं तोंडावर बोललं आणि तिचा मूड असला तर ती हसायची आणि मूड नसला तर तिच्या हाती चप्पल असायची. तिला आपल्या दिसण्याचे काहीही सोयरसुतक नसे. मिचमिच्या डोळ्यात ती भलं मोठं काजळ घालून बसायची. तिच्या काळ्या रंगाला खुलून न दिसणाऱ्या साड्या घालायची, ब्लाऊज आणि साडीच्या रंगाचा मेळ नसे, कशाचाही ताळमेळ न लागेल अशा प्रकारचे कपडे ती घाली. कधी कधी तर परकर पोलकं आणि त्यावर टॉवेल असं भयंकर कॉम्बिनेशन असे ! इतक्यावरच ती थांबत नसे. लिपस्टिकपासून ते पावडरपर्यंत जाम लेप फासाफाशी ती कधी करायची तर कधी काहीही न लावता एकदम कोरा काळा तुकतुकीत चेहरा.
निघताना अखेर न राहवून तिला विचारलं, "सावित्रे अशी का राहतेस? तुला लोक हसत असतील असं वाटत नाही का?"
सावित्रीने दिलेलं उत्तर प्लेटो, ऍरिस्टॉटलच्या तर्कशास्त्राच्या तोडीचं होतं -"दुनियेने पैसे दिले की मी त्यांच्याखाली झोपते इथवरच माझा आणि त्यांचा संबंध.. काम झालं की पब्लिक निघून जातं.. माझ्यावर मालकी नाही कुणाची न कुणाची ताबेदारीही नाही, मी काळी असली म्हणून काय झालं? मला जे रंग आवडतात त्याच रंगाच्या साड्या मी नेसणार. नटल्या सजल्यावर जगाला मी कशी दिसते याला घेऊन मी काय करू? मला जसं आवडतं तसं मी सजते, नटते.
माझी वासना, माझी भूक, माझं नटणं, माझं जीवन हे सर्वतोपरी माझं आहे. संसारी बायकासारखी माझ्यावर कुणाची बंधने नाहीत, मी मुक्त आहे, स्वतंत्र आहे, मी माझ्यासाठी जगते. मी साडी काळी नेसली की पांढरी साडी नेसली याचं जगाला काय वाटत असेल या विचाराने मला फरक पडत नाही. कारण एकेक करून सगळी वस्त्रे मी उतरवते, ती पण माझ्या मर्जीने! आता तूच सांग, सगळीकडं चालती का अशी बायांची मर्जी? मी माझ्या मर्जीची राणी आहे. मग ती चौकट असो वा इस्पिक मला घेणंदेणं नाही. ज्या जगाने मला इथे लांडग्याच्या हवाली केले त्या जगासाठी मी माझं जगणं आणि माझ्या आवडी निवडी का सोडू?"
उंट छाप बिडी हा तिचा आवडता धूरसोड्या ब्रँड होता. त्याची वलये हवेत सोडत ती समोरच्याच्या डोक्याचा ताबा घेई. कधी कधी काही लोक आपल्याला खूप काही शिकवून जातात त्यातीलच ही एक वल्ली. सावित्रीच्या तळहाताला मोठे घट्टे होते, बालपणी दगडखाणीत कामाला होती ती. आपल्या मर्जीने पळून आली होती आणि मर्जीने जगत होती. तिचा मार खाणारा म्हणायचा, 'बाईचा हात आहे का दगड!' पण असं कुणी म्हटलं की तिचं दगडी बालपण तिला आठवे आणि मग दार बंद करून ती स्वतःला कोंडून घेई.
स्त्रीचं मन जाणता यायला हवं, तिच्या मर्जीचा आवडी निवडीचा आदर व्हावा, तिला तिचं स्थान द्यायला हवं या मोठ्या गोष्टी, जगासाठी किडामुंगी असलेल्या सावित्रीने माझ्या मनात अधिक ठळक केल्या.
- समीर गायकवाड