सावधान! तुम्ही 'मिसरी' ने दात घासताय का?
तुम्ही ‘मिसरी’ ने दात घासतात का? तर हा लेख तुमच्यासाठी आहे. तुमच्या आजुबाजूला जर कोणी या मिसरीने दात घासत असेल तर हा लेख नक्की त्यांना वाचून दाखवा... वाचा स्त्रियांनी मिसरीचं व्यसन कसं सोडवावं? डॉ. साधना पवार यांचा जीव वाचवणारा लेख
ट्रेडमिलवर चालत होते, गाणी ऐकत होते मिसरी कि डली है वो, हम्म्म्म मिसरी कि डली...
क्काय ?
एलेक्सा स्टॉप, रिवाइंड...
परत... मिसरी की डली है वो !
मिसरी ? सीरियसली ??
मिसरी म्हणजे आमच्याकडे तर तंबाखू खरपूस भाजून पूड करून बायका दात घासतात ती पावडर. आता या गाण्यात हा हिरो आपल्या सुंदर प्रेयसी ला 'मिसरी की डली' का म्हणत असावा ? या प्रश्नाने पछाडले. अलीकडे असल्या सगळ्या शंका मी बापुडी आमच्या मुलगीलाच विचारते. या जनरेशनला असली माहिती फार...
तिने फटक्यात गुगलवर सर्च करून सांगितलं हिंदीतील मिसरी म्हणजे खडीसाखर हे सांगितलं. मग मात्र जीव थोडा भांड्यात पडला. खडीसाखर होय ! मग ठीकाय.
हिंदीमधील 'मिसरी'गोड हो, पण आपली मराठीतील तंबाखूची मिसरी फार वाईट. आमच्या सांगली, कोल्हापूर, सातारा पट्ट्यातील बऱ्याच बायकांना तर याचं भारी व्यसन. आता सध्या पन्नास-साठ वर्षे वय असणाऱ्या बायका तर अगदी लहानपणापासून ही तंबाखूची मिसरी घासताहेत आणि तंबाखूच्या दुष्परिणामांना बळी पडताहेत.
कित्येक जणींना अपचनाचा त्रास होतो, भूक कमी होते, रक्ताची कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. कित्येक जणींना तोंडाचा, हिरड्यांचा, जीभेचा, घश्याचा, फुफ्फुसांचा कँसर होतो. तर कित्येक जणींना यातील निकोटीनमुळे चाळिशीतच हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे हार्ट अटॅक येतो.
आधी मला वाटायचं ग्रामीण भागातील, थोड्या म्हाताऱ्या झालेल्या बायकाच ही मिसरी घासतात. पण एकदा माझ्याकडे सीझर झालेल्या एका अतिश्रीमंत शहरी उच्चशिक्षित मुलीचे टाके छान भरूनच येईनात, पोषण स्वच्छता रोगप्रतिकारक शक्ती तर चांगली वाटत होती. टाक्यात पाणी होण्याचे कारण काही कळेना, तेंव्हा तिच्या नवऱ्याने तिच्या या व्यसनाविषयी सांगितले. मी शॉक्ड !
इतकी सुंदर हिरोईन सारखी दिसणारी मुलगी तंबाखूची मिसरी घासू शकते. यावर विश्वास बसेना. टाके भरून न येण्याचे कारण तंबाखू असू शकते कारण निकोटीनमुळे केशवाहिन्या ब्लॉक होतात. वाईट वाटलेलं तेव्हा. तिला सुद्धा ही सवय.. आई मिसरी घासत असल्याने लहानपणीच लागली होती. तिने नंतर समुपदेशन घेऊन मात्र तंबाखूची मिसरी कायमची सोडली.
एकदा लागलेलं हे व्यसन सहजासहजी सुटत नाही. मग मिसरी घासल्याशिवाय काहीच काम करता येत नाही, पोट साफ होत नाही, मिसरी नाही घासली तर बेचैन व्हायला होतं आणि अश्या प्रकारे आपल्या स्त्रिया या व्यसनाला बळी पडतात.
स्त्रियांचे या व्यसनाविषयी खूप मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन यासाठीचे समुपदेशन आणि उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करण्याची गरज आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे.
शहरी, ग्रामीण, तरुण, वृद्ध, गरीब-श्रीमंत अश्या सर्वच स्त्रियांना ग्रासणाऱ्या या व्यसनाच्या संपूर्ण निर्मूलनासाठी वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर प्रयत्न कारण्याचा आज संकल्प करूया. स्त्रियांनो, मिसरीचे व्यसन सोडा, आरोग्याशी नाते जोडा !
डॉ. साधना पवार, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, पलूस.