गेले काही दिवस म्हणण्यापेक्षा ,किमान एक वर्ष झाले असेल बॉलिवूडमधील ए लिस्टर स्टार्सनी माध्यमांना विशेषतः प्रिंट मीडिया फिल्म प्रमोशनसाठी खिरापती (आय मीन ) मुलाखती देणे जवळ-जवळ बंद केले आहे ! याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे प्रिंट मिडीयाचे दिवसेंदिवस घटत चाललेले महत्व .. चॅनेलना फिल्म प्रमोशनच्या मुलाखती दिल्या की स्टार्सचे 'प्रमोशन ' संपले ही भावना सगळीकडे रुजलेली आहे . महत्वपूर्ण ५-६ चॅनेल्सना मुलाखती देणे सध्या अत्यावश्यक मानले जाते . त्यानंतर देशांतर्गत 'सिटी प्रमोशनल टूर ' आखल्या जातात . दिल्ली ते गुजरात , आणि हरियाणा ते लखनौ अशा शहरांमध्ये स्टार्सचे प्रमोशन पार पडते . गेलाबाजार एखाद्या ग्लॅमरस लौकिक असलेल्या -मिठीबाई किंवा एनएम कॉलेजमध्ये फिल्ममधील रोमँटिक पेयर कॉलेजच्या स्टूडेंट सोबत एखादा प्रमोशनल इव्हेंट पार पाडते . यात ट्रेलर लाँच , त्यापूर्वी टिझर लाँच , सॉन्ग लाँच असे इव्हेन्ट फिल्म रिलीज होईपर्यंत पार पडत असतात , यात प्रिंट माध्यमांना बऱ्याचदा गृहीत धरले जात नाही . (मासिकांमधून फिल्म प्रमोशनचा उपयोग नसतो , कारण मासिक प्रकाशित होईपर्यंत फिल्म रिलीज झालेली असते !) नियतकालिकं आता नामशेष झाली आहेत .. त्यामुळे वर्तमानपत्रं , साप्ताहिकं यांचे अस्तित्व असून नसल्यासारखे झाले आहे ! तर मुद्दा असा की नव्या पिढीतले 'कॉर्पोरेट प्रोडक्शन हाऊसेस ' आणि त्यांच्या इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी यांना चित्रपट प्रसिद्धीचे महत्व राहिलेले नाही ही वस्तुस्थिती आहे . बॉलिवूडचा किंग खान उर्फ शाहरूख खान याचे अलीकडे २ बिग बजेट चित्रपट रिलीज झालेत . 'पठाण ' आणि दुसरा 'जवान '. या दोन्ही फिल्म्सना घवघवीत यश मिळालं असा निर्मात्यांचा दावा आहे !! पठाण या एसआरके (शाहरुख खान) फिल्मचे निर्माते यशराज फिल्म्स तर 'जवान ' फिल्मची निर्माती सौ गौरी खान (म्हणजे अस्मादिक शाहरुख खानच नाही का !) होती . हल्ली सलमान खान अभिनित फिल्म 'टायगर ३ ' . शाहरुख , सलमान खान यांच्या 'खान 'दान स्टार्सवर बॉलिवूडची अर्धी भिस्त आहे .. खान हिरोंचे चित्रपट वर्षातून एकदाच येतात आणि त्यांचे कोट्यवधी चाहते त्यांच्या चित्रपटाची (आतुरतेने ) वाट पाहत असतात .. तरीही नव्या प्रमोशनल स्ट्रॅटेजी नुसार शाहरुख ,सलमान आणि त्याच्या पावलांवर पाऊल टाकून अभिनेत्री कॅटरिना , आलिया भट , दीपिका पदुकोण यांनीही घाऊक मुलाखतींचा रतीब हल्ली बंदच केला आहे ! एका नामांकित प्रचारक कंपनीच्या वरिष्ठ प्रचारक व्यक्तीने याबाबत केलेले भाष्य - बडे स्टार्सने अब इंटरव्यू देना बंद किया है ! हर बडा और छोटा स्टार खुद की और फिल्म की पब्लिसिटी (प्रमोशन ) खुद के सोशल मीडिया हॅन्डल पर कर लेता है ! स्टार्स के सोशल मीडिया हॅन्डल करणे के लिये खास तौर पर मॅनेजर रखे जाते है ' अब स्टार्स नहीं देंगे इंटव्ह्यूज ! उन्हे कोई जरुरत नहीं रही '
असो ! कालाय तस्मे नमः ' पण झालंय असं की नव्या प्रचारकी तंत्राचा हा नवा भाग आहे म्हणूया - दर दिवशी बहुतेक प्रोडक्शन हाऊसेसकडून त्यांचा सिनेमा रिलीज झाला कि त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे (वाढीव ) आकडे मीडियाकडे पाठवले जातात ! फिल्म हाऊस फुल आहे असं हे आकडे दर्शवत असले तरी प्रत्यक्षात थिएटर्स मात्र रिकामी असतात ! हल्लीच टायगर ३ हा सलमानचा ऐन दिवाळीत रिलीज झालेला चित्रपट ,ज्याच्या बॉक्स ऑफिसचे आकडे कौतुकास्पद वाटत होते , पण काही समीक्षकांनी या फिल्मला 'अति उत्तम ' म्हटले तर काहींनी
टायगर ३ थकलेला , नकोसा वाटला असे रोखठोक मत मांडले ! मी स्वतः बोरिवली येथील मॅक्सस मध्ये टायगर रिलीज झाल्यांनतर दुसऱ्या दिवशी सहकुटुंब पाहिला ,पण थिएटर अर्धे देखील भरलेले नव्हते ! स्टार्सना मुलाखती द्यायच्या नाहीत , तशी आवश्यकता त्यांना वाटेनाशी झालीये पण प्रोडक्शन हाऊसला मात्र त्याच मीडियावाल्याना बॉक्स ऑफिसचे फसवे आकडे पाठवायचे आहेत .. ब्लॉक बुकिंग , कॉर्पोरेट बुकिंग असे नव्या टर्ममध्ये फसवाफसवी चालू आहे ! कोरोना -लॉक डाऊननंतर निर्माते आपले चित्रपट कसे सुपर हिट झालेत याचा खोटा डेटा पसरवू लागलेत ! पण जर निर्माते असा खोटा आभास निर्माण करताहेत तर 'सोल्ड आउट ' तिकीटावर त्यांना जीएसटी भरावा लागतोच !
मांजराने डोळे मिटून दूध प्यायले तरी जग त्याला बघतेच !
एकूणच काय , तर असे प्रकार वरचेवर होऊ लागलेत ,म्हणून हा पंक्ती प्रपंच !