यही तो है आशा ! हेमंत देसाई
आशा भोसले यांच्याविषयी हेमंत देसाई यांनी लिहलेला लेख
माझ्या अत्यंत लाडक्या अशा आशा भोसलेचा आज वाढदिवस. लोकांच्या लक्षात ॲवॉर्ड्स राहत नाहीत, गाणी राहतात, असे अत्यंत मार्मिक व सार्थ उद्गार तिने काढले होते. सुरुवातीच्या काळात खालच्या पट्टीतील तिची गाणी अफाट लोकप्रिय झाली. शमशादचा झणझणीत सूर, गीता दत्तच्या स्वरातील निरामयता आणि लताच्या आवाजातील कोवळीक यात आशाला स्वतःची जागा निर्माण करायची होती. आशाने ती केली. आपल्या अष्टपैलूत्वाच्या बळावर कुठलेही गाणे तिने वर्ज्य मानले नाही. संगीतातही ब्राह्मणवाद असतो. म्हणजे कॅब्रे गीत म्हटले, क्लब सॉंग म्हटले की आपल्या पावित्र्यावर कुठतरीे डाग येतो असे मानण्याची पद्धत होती. आशाने असला फालतू विचार कधीच केला नाही. स्वराकाशात जेव्हा फक्त लता नावाची चांदणी तळपत होती, तेथे आपले स्वत्व जपत आशाने स्वतःची अशी जागा निर्माण केली. बदलत्या काळानुसार बदलण्याची वृत्ती तिच्यात आहे. त्यामुळेच पाॅप, रॉक, बीटल्स, जॅझ अशा सर्व प्रकारांत ती लीलया वावरली. जवळपास वीस भाषांमध्ये अकरा हजारांवर गाणी तिथे गायली आहेत.
मला आठवते, तीनेक वर्षांपूर्वी आशाने एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या बँडबरोबर रेकॉर्डिंग केले होते. आपल्या स्वतःच्या शर्तींवर जगणाऱ्या सत्वशील स्त्रियांचा आशा हा आवाज आहे. उदाहरणार्थ दम मारो दम. गंमत अशी की, रेडिओवर आशाची गाणी ऐकून, विशेषत: मराठी नाट्यसंगीत ऐकून आर डी बर्मनने केवळ तेरा वर्षांचा असताना तिच्याकडे ऑटोग्राफ मागितला होता. शाळाकॉलेजमध्ये शिकण्यापेक्षा मला संगीत शिकून संगीतकार व्हायचे आहे, असं आरडी तिला म्हणाला. तेव्हा आशाने त्याला झाप झाप झापले होते... पुढे दोघांनी विवाह केला. परंतु त्यांचे नाते नवरा-बायको यापेक्षा मैत्रीचे अधिक होते. "माझं बाळ' मधील 'चला चला नवबाला' हे आशाचे आरंभीचे मराठी पार्श्वगीत. लताचा आवाज सरळमार्गी नायिकांसाठी वापरला जात होता. आशाचा आवाज हा नायिकेचा होऊ शकत नाही असा आरंभकाळातील समज होता. पण 'बूट पाॅलीश' सारख्या सिनेमात 'नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी मे क्या है' या गाण्यात आशा अनेक मुलांच्या आवाजात निर्मळपणे गायली. 'लेके पहला पहला प्यार' मध्ये रफी व शमशाद असूनही आशाचा आवाजही स्वतंत्र बाण्याचा वाटतो.
'आवे मारिया' या गाण्याच्या वेळी तिने इंग्रजी शिकून घेतली. आइये मेहरबाँ, ये रेशमी झुल्फों का अंधेरा, आओ हुजूर तुमको ही आशाची अद्वितीय गाणी. तिच्या किती गाण्यांचा उल्लेख करायचा? पण मला रवीकडची आशा खूपच आवडते. खास करून 'तोरा मन दर्पण कहलाये'.. रवीकडचा तिचा आवाज झंकारणारा, धारदार. मी आशाशी नव्हे तर तिच्या आवाजाशी लग्न केलंय, असे आरडी म्हणायचचा. दोघे जण मिळून बिस्मिल्ला खान, आमिर खान, बीटल्स, शरले बॅसी, अर्थ, विंड, फायर, सर्र्जियो मेंडिस, रोलिंग स्टोन्स वगैरेंचे अल्बम ऐकत. वेस्टर्न, लॅटिन, ओरिएंटल, अरेबिक, बंगाली लोकसंगीत यांच्या प्रभावाखालील आरडी चे संगीत होते. त्याच्या सांगीतिक सहवासात आशाची कामगिरी विविधांगी, आधुनिक आणि जागतिक दर्जाची होत गेली. इतरांच्या गुणांचे ॲप्रिसिएशन करण्याची वृत्ती आशामध्ये आहे.
चढा सूर लावून एकदम खालच्या पट्टीत येण्याचं रफीचे कसब, शास्त्रीय गाण्यांवरची मन्नाडेची पकड, क्लासिकल शिकलेले नसूनही क्लासिकलही उत्तम गाऊ शकणारा किशोर, कोणाचेही अनुकरण न करता आपला वेगळा सूर लावणारा मुकेश, हेमंतकुमारचा समुद्रासारखा आवाज, मेहंदी हसनमधील ईश्वरी चमत्कार हे सर्व आशाला खूप आवडणारे. मुकेशच्या साथीमुळे तिचे हिंदी सुधारलं. 'द ग्रेट गॅम्बलर' चित्रपटातील 'दो लब्जों की है ये कहानी हे गाणे आशाने संथ लयीतून नदीसारखा अनुभव देत म्हटले आहे.
मंद्र सप्तकात गायचे, कुठचाही खरखरीतपणा येऊ न देता खर्ज लावायचा आणि पुन्हा सहजपणे तारसप्तकात जायचं हे आशा सहजपणे करते. याचं कारण म्हणजे शास्त्रीय संगीताचा उत्तम पाया आणि अत्यंत संघर्षशील व जिद्दी स्वभाव. आशाने केवढं भोगले, एवढं सोसले आणि गेल्या काही वर्षांत तर तिच्यावर दुःखाचे पहाड कोसळले आहेत. तरीसुद्धा ती थांबलेली नाही. यही तो है आशा!