तू बघितला आहेस का तो जुना वेल?
पपायरस गवताची बेटं नाईल नदी व्यापणारी, सुदानला आक्रमणांपासून वाचवणारी. या नाजूक, नक्षीदार गवताच्या बेटांवर गावं उभी राहिली. पपायरसच्या सोनेरी कागदाने एका साम्राज्याची संस्कृती लिहून ठेवली आपल्यावर. फक्त इजिप्तची नाही तर खूपशा युरोपची देखील: पिसासारख्या तरंगत्या गवतानं. वाचा डोक्याला खुराक देणारा परिणीता दांडेकर यांचा लेख;
मोठ्या झाडाच्या खांद्यावरून आकाशापर्यंत जातो आणि फुलं येतात याला वर कुठेतरी. जमिनीवरून ती दिसली नाहीत तरी वाळली की त्यांच्या भिंगऱ्या होतात आणि मग उन्हाळ्यात या शेकडो भिंगऱ्या गोलगोल वाऱ्यावर भटकायला निघतात आपल्या बिया दूरवर पसरवायला. येळवणला आहे हा वेल. म्हणजे असेल.
नीलमणी अशीच. निळी चांदणीसारखी फुले, वाळल्यावर निळीच राहतात, रंग फक्त थोडा समंजस होत जातो. ही पण गिरक्या घेत बिया उडवते. आपण म्हणतो झाडं, वेली अचल आहेत, पण किती तऱ्हांनी भटकत असतात ती. त्यांचे रोवलेले भाग नाही, पण हलके, स्वतःला सोडून देणारे, तरंगणारे भाग. काश गवताची पिसं, कमळाच्या, कुमुदिनीच्या बिया अशाच हलक्या किती दिवस पाण्यावर फिरणाऱ्या.
Pistiaची तरंगती हिरवी कमळं पाहिली आहेस? किंवा जांभळ्या तुऱ्यांची Water Hyacinth? हिचे hometown Nile नदी . हिच्या तरंगत्या बेटांवर पक्षी उतरतात, घरटी होतात, Stilt आपल्या लांब, सुंदर पायांनी या बेटांवर चालतात.
पपायरस गवताची बेटं नाईल नदी व्यापणारी, सुदानला आक्रमणांपासून वाचवणारी. या नाजूक, नक्षीदार गवताच्या बेटांवर गावं उभी राहिली. पपायरसच्या सोनेरी कागदाने एका साम्राज्याची संस्कृती लिहून ठेवली आपल्यावर. फक्त इजिप्तची नाही तर खूपशा युरोपची देखील: पिसासारख्या तरंगत्या गवतानं.
नेवरीची बारकी माणिक-गुलाबी फुलं रात्रभर नदीकाठच्या झाडावर झुंबरासारखी चमकत राहतात, पण पहाट झाली की झाडाची बोटे सोडून एका-मागे-एक नदीत उतरून प्रवाहाबरोबर संथ वाहत जातात. वाह्ण्यासाठीच त्यांची रचना. यांना शहरातल्या रस्त्यावर निपचित पडलेले बघवत नाही.
Moorlands मध्ये कितीतरी मैल नदीवर झुकणारी देखणी Willow झाडं दिसत नाहीत, पण नदीच्या काठाने मात्र ही निगुतीने लावल्यासारखी लाईनीत येतात. यांच्या बिया हलक्या, पंख असलेल्या, पाण्यावर तरंगत आपला प्रवास करणाऱ्या. तसंच Birch झाडाचं. यांच्या तरंगत्या बियांना पाणीच लागतं रुजायला. किंवा आपल्या नदीकाठच्या करंजाचं. या सोन्याच्या नाण्यासारख्या बिया वाहत्या पाण्यात पडणार, तरंगणार, वाहात जाणार, मग रुजणार.
कशाचा न लागभाग, कशाचा न पाठलाग, आम्ही फुलांचे पराग.
अरुणाचल, सिक्कीममध्ये सगळ्यात जास्त फुलपाखरं आहेत. नदीकाठच्या दगडांवर थवेच्या थवे उतरतात मीठ-पाणी चाखायला. निळी, मोरपिशी, गर्द हिरवी. फुलपाखरांना किलोने मोजणार ?
पाण्यावरील Mayfly, Caddisfly. यांची पाऊले इतकी हलकी की नदीच त्यांच्यासाठी रेशमी दुपट्टा. त्यांच्या पायाने पाण्याचा आरसा तडकत नाही, आणखी लख्ख होतो. Water-sliders छोट्या हिर्यांसारखे डोहावर skating करत जातात.
हे नाजूक जीव इतके चोखंदळ की यांच्या फक्त अस्तित्वाने स्वच्छ, वाहती नदी ओळखू येते. मुक्तवाहिनी नद्यांचे खास आपले चतुर आहेत, त्यांना तुमचे-आमचे साठेलेले पाणी नाहीच चालत 🙂
हजारो रिव्हर टर्न, झगझगीत निळे Wire-tailed swallows वेलांट्या घेत राहतात नदीवर. मधेच उंच आकाशातून सूर घेतात आणि पाण्यात पडणार-पडणार इतक्यात आपल्या बारक्या छातीला पाणी लाऊन परत वर सूर घेतात.
आम्हा नाही नाम-रूप, आम्ही आकाश स्वरूप जसा निळा-निळा धूप.
किती भारी आणि किती हलकं. वाहणारं, उडणारं , तरंगणारं. एकाच ठिकाणी फतकल घातलेल्या हट्टी मुलासारखं नाही? बदलाची भीती नाही, बदलाबद्दल अढी नाही.
या हलकेपणात उगीच लुडबुड करू नये. इथे गच्च दोर, सिमेंटच्या भिंती, प्लास्टिकच्या कुंड्या, कडी-कुलपं आणली तर संपलं. मणिपूर मधल्या लोकताक तळ्यात तरंगती बेटे आहेत गोल-गोल. गवताने, पानांने घडलेली, इथून तिथे जाणारी. या स्पंजच्या बेटांवर मऊ तळव्यांची सांगाई हरणं नाचतात.
सांगाई हरणांना सिमेंटच्या Zooमध्ये आणलं तर त्यांचे तळवे दुखतात. लोकताक तळ्याला धरणाच्या भिंतीने बांधून ठेवलं, त्यातलं पाणी कमी-जास्त होऊच दिलं नाही, त्याला सतत 768.5 मीटरची "शाश्वती" दिली तरी सगळी परिसंस्था कोसळू लागते.
हलकेपणा सोपा नाही. स्वतःला वाऱ्यावर, प्रवाहावर सोडून देणे सोपे नाही. सहजता स्वाभाविक असली तरी सोपी असते असे नाही. आपल्या आखीव-रेखीव जगात तर नाहीच.
परवा Aldous Huxley चे Island वाचत होते. Brave New World पेक्षा खूप वेगळे. थोडे हिरवट. "There are quicksands all about you, sucking at your feet, trying to suck you down into fear and despair. That's why you must walk so lightly, my darling. On tiptoes; and no luggage, not even a sponge bag. Completely unencumbered."
शिकणार. थोडंथोडं, हळूहळू शिकणार
- परिणीता दांडेकर
लेखिका 'साउथ एशियन नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल' या 'ना नफा' संस्थेसाठी काम करतात.