"आई" आंदोलनातील ठस्से आता गडद होतायत गं ...!!
आपली आई जेव्हा आंदोलनात उतरते तेव्हा मुल घडकी बिघडत युवराज पाटील यांचा आहे लेख त्यासाठी वाचायलाच हवा.;
नुकतंच काही महिन्यांपूर्वी दिल्लीत सुरू असलेलं शेतकरी आंदोलन यशस्वीपणे पार पडलं. त्यात मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा फारसा सहभाग नव्हता. पण याचा अर्थ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कधी आंदोलनंच केली नाहीत असं नाही. महाराष्ट्राला देखील फार मोठ्या शेतकरी आंदोलनाचा इतिहास आहे आणि त्यात स्त्रियांचा देखील तेवढाच मोठा सहभाग होता. राज्याचे जिल्हा माहिती संपर्क अधिकारी युवराज पाटील यांनी त्यांच्या आईचे अनुभव सगळ्यांसोबत सामायिक केले आहेत. वाचा त्यांचा हा विशेष ब्लॉग...
"आई" आंदोलनातील ठस्से आता गडद होतायत गं ...!!
शेतकरी संघटना ऐन भरात होती... आईने वडिलांच्या आग्रहामुळे शेतकरी संघटनेत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला... काळ असेल 85 - 86 चा मी घरातला थोरला होतो, त्यामुळे मला अधिक ठळकपणे आठवतं... माझ्या आईने आयुष्यात पहिल्यांदा थेट शरद जोशी यांच्या समोर पहिलं भाषण केलं... पाटलाच्या घरची सून म्हणून नवऱ्याकडे आणि पाटलाघरची लेक म्हणून वडिलांच्या घरी चार भिंतीत राहिलेली... इयत्ता 4 थी पर्यंत शिकलेली.. पण अंगभूत हुशारी.. आवाजात धार ती आज पर्यंत फक्त पोथी वाचण्यात आणि जात्यावरल्या ओव्या म्हणण्यात गेलेली... पण नवऱ्याला लागलं चळवळीचं वेड आणि या शेतकरी चळवळीत स्त्री मुक्तीच्या लढ्याची बीज रोवली गेली... वडिलांनी आईला आता चौकट तोडायची, पाहुणे रावळे काय बोलतील याचा विचार करायचा नाही म्हणून चळवळीत उतरायला तयार केलं.. आणि त्याची ठिणगी पडली हाळी - हंडरगुळी ता. उदगीर येथे... तिच्या आयुष्यातलं पहिलं भाषण गाजलं...पुढं आई शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीची लातूर जिल्हा अध्यक्ष झाली... आणि आमचं घर शेतकरी संघटनेच्या चळवळीचं केंद्र बनलं... अनेक रास्ता रोको , रेल रोको यात आईचा सक्रिय सहभाग.. नंतर जेल हे होत राहिलं... 87-88 ला कापसाच्या रास्ता रोको आंदोलनाचं नेतृत्व आई करत होती... सोबत शेकडो स्त्रिया होत्या...आंदोलन शांततेत चालू होतं, घोषणा - गाणे पोवाडे चालू होते...अनेक वाहने उभी असताना एक भरधाव कार आली... सगळे आंदोलक इथरबिथर झाले... आईच आंदोलनाचं नेतृत्व करत होती.. ती थेट गाडीच्या पुढे आली आणि गाडी वाल्यानी थेट तिच्या अंगावरून गाडी घातली.. तिच्या एका पायावरून टायर गेलं.. मोठा गदारोळ झाला.. सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली.. आम्ही लहान लहानच पण मी थोरला असल्यामुळे मी धीर धरून रडणारी बहीण आणि भाऊ यांना गप्प करत आणि मधून मधून मीही रडत घरी... आई दवाखान्यात, फ़ार मार लागला नाही असं म्हणून दुसऱ्या दिवशी घरी आली.. आमचाही जीव भांडयात पडला पण मधल्या हाडाला लागलेल्या माराचं दुखणं काही वर्षांनी कायमचं होऊन गेलं.. चळवळीच्या बातम्या थंड झाल्या.. पुला खालून अनेक पावसाळ्याचे पाणी गेले... आणि आईच्या त्या वेळच्या काही फारसं लागलं नाहीचे व्रण वयाच्या 65 मध्ये मोठं दुखणे घेऊन बाहेर पडले 2017 मध्ये तिला उठता बसता येईना म्हणून चक्क गुडघा बदलावा लागला.. एक गुडघा बदलला दुसऱ्या गुडघ्यावर भार पडला.. पाय सुजायला लागले.. आज पुन्हा अनेक टेस्ट केल्या... आणि आईला काही आठवलं का नाही माहिती नाही माझ्या डोळ्या समोर एका आंदोलकाचा भूतकाळ वर्तमान होऊन डोळ्यापुढे आला... त्या काळी विचाराने भारलेली माणसं आज म्हातारी होतांना पाहून समाज म्हणून त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता तिच्या मुलापेक्षाही या समाजाचा घटक म्हणून मोठी व्हायला हवी... आई तुझ्या आजच्या वेदना भूतकाळात समाजाच्या भल्यासाठी म्हणून वाहिलेल्या समिधा आहेत...!!
@युवराज पाटील