गणेशोत्सव आणि आमची भूमिका- सत्यशोधक सचिन शर्वरी.

केवळ लोकांच्या समाधानासाठी लोकांचा अंधार गडद करणं योग्य असतं का? लोकांचं तात्पुरतं समाधान करण्यासाठी केलेली कृती योग्य की लोकांमध्ये दूरगामी परिवर्तन व्हावं म्हणून दिलेला नकार योग्य… वाचा सत्यशोधक समाजाचे सचिन शर्वरी यांचा भविष्यातले विचार मांडणारा लेख…

Update: 2021-09-19 06:08 GMT

आमचं लग्न झाल्यानंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाऐवजी आम्ही आमच्या गावातील विठ्ठल मंदिरात शर्वरीचा गल्लीतील महिलांसोबत 'मासिक पाळी संवाद' ठेवला होता. लग्नानंतरच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात महिलांना नवीन सून कशी दिसते, माहेर कोणतं, माहेरहून काय काय घातलंय हे पहायचं असतं, पण आम्हाला महिलांना 'ही सून नक्की काय काम करते, कोणत्या विचारांची आहे' हे दाखवायचं होतं; म्हणून हळदीकुंकवाला असा नवीन रंग दिला.

या छोट्या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रबोधन करणाऱ्या आपल्याच गावातील सचिन-शर्वरीचा 'प-पाळीचा' कार्यक्रम आपल्या गावात मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे असं गावातील काही युवकांना, मित्रांना वाटलं आणि त्यांनी गणेशोत्सवात हा कार्यक्रम देवीच्या मंदिरासमोर- गणेश मंडळाच्या बाजूच्या समाजमंदिरात आयोजित केला.


 



कार्यक्रमाची तयारी, खर्च, प्रचार अशी सर्व तयारी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच केली आणि त्यामुळे कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शर्वरी उपवास, व्रतवैकल्ये या सोबतच पाळीतील अंधश्रद्धा आणि सणावाराला पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या न घेण्याबद्दल ही तिथं बोलली. या कार्यक्रमाबद्दल मी याआधी लिहिलं आहेच; पण आज त्यानंतर काय झालं ते लिहितोय.

कार्यक्रमानंतर

गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्या मित्रांनी आमचं वय कमी असूनही आदर आणि प्रेमापोटी मला आणि शर्वरीला आरती करण्याची विनंती केली. हे अनपेक्षित होतं. आम्ही तिथे नम्रपणे सांगितलं,

"आम्ही केवळ सत्यशोधक पध्दतीने लग्न केलं नाहीये तर आम्ही सत्यशोधक विचारांवर जगणारे कार्यकर्ते आहोत. गणपती आमचा विवेक आणि बुद्धी दोन्हीला पटत नाही. त्यामुळे केवळ तुमच्या आग्रहाखातर गणेशाची आरती करणं हे सत्यशोधक विचारांशी प्रतारणा ठरेल. माझा मोठा भाऊ-वहिनी हे आस्तिक आहेत; त्यामुळे वाटल्यास तुम्ही त्यांना आरती करण्यासाठी विचारू शकता."

कार्यकर्त्यांनीही आमचं मत अतिशय आदरपूर्वक स्वीकारलं आणि आम्ही आरती केली नाही.

दुसऱ्या दिवशी तेवढ्याच प्रेमाने आणि आदराने त्याच कार्यकर्त्यांनी आम्हाला गणेशोत्सवात आयोजित विविध स्पर्धांच्या परीक्षणासाठी बोलावलं आणि आम्ही ही गेलो. त्यानंतरही गावातील शाळेत मुलींसाठी आमचा कार्यक्रम आयोजित केला गेला.

दुसरी घटना पुण्यातील. एका अभ्यासिकेत समन्वयक असलेल्या सन्मित्र किसनने गणेशोत्सवात आयोजित व्याख्यानमालेत मला बोलावले. आमंत्रण स्वीकारण्याआधीच 'पण मी आरती करणार नाही' असं किसनला कळवलं. तरीही मला बोलावलं गेलं; कार्यक्रम सुंदर झाला.





 


सांगायचा मुद्दा हाच की माझ्या आरती न करण्याने समाज माझ्यापासून तुटत नसतो. ज्या सहिष्णुतेने त्यांचं गणपती बसवणं मी स्वीकारतो. तेवढ्याच सहिष्णुतेने माझा सत्यशोधक विचार ते स्वीकारत असतात. मुळात माझ्या या विचारांमुळेच, कामामुळेच मला सार्वजनिक कार्यक्रमांना बोलावलं जात असतं. त्या विचारांसकट माझ्यावर लोकांचं प्रेम असतं, आदर असतो; त्यामुळे लोकांना वाईट वाटण्याचा, न पटण्याचा प्रश्नच येत नाही.

किमान समान मुद्द्यांवर आपण एकत्र आलंच पाहिजे पण आपली विचारधारा न सोडता. लोक गणपतीला बुद्धीची देवता मानतात म्हणून आपण ही गणपतीला बुद्धीची देवता म्हणालो तर हा सावित्रीज्योतीसोबत अन्याय होईल. विवेकाशी प्रतारणा होईल.




 लोक अंधारात आहेत; पण आपण उजेडाचे दूत आहोत. केवळ लोकांच्या समाधानासाठी लोकांचा अंधार गडद करून कसं चालेल? आपल्याला लोकांचं तात्पुरतं समाधान हवंय की लोकांमध्ये दूरगामी परिवर्तन हे ठरवता आलं पाहिजे आणि म्हणूनच आपली भूमिका - आपला विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी आपले सार्वजनिक आयुष्यातील विचार आपल्या वैयक्तिक आयुष्यात लोकांना दिसले ही पाहिजेत. एवढंच.

Tags:    

Similar News