१७२ वर्षांनीही सावित्री-जोतीचा वनवास काही संपत नाही - प्रा. हरी नरके

Update: 2020-12-11 05:45 GMT

१) १८४८ साली सावित्री-जोतीने त्यांच्या दलित-ब्राह्मण-मुस्लिम मित्रांच्या सहकार्याने स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्याला आता १७२ वर्षे उलटली. जोतीरावांच्या मृत्यूला १३० वर्षे होऊन गेली, पण जिवंतपणी त्यांना जो वनवास सोसावा लागला तो आज १७२ वर्षे उलटली तरी संपायला तयार नाही. पेशवाई आणि ब्रिटीशांचे राज्य गेले, लोकशाही आली, स्त्रिया आणि दलित-बहुजन शिकले, शिक्षणसम्राट झाले, राजकीय सत्तेच्या चाव्या त्यांच्यातल्या काहींच्या हातात आल्या, ते फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र, जय जोती-जय सावित्री असला तोंडदेखला गजर करू लागले, पण त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्यात तुमच्या ध्येयवादाबद्दल, जीवनकार्याबद्दल आस्था निर्माण झाली का?

२) १९५४ साली आचार्य अत्र्यांनी खूप मेहनत घेऊन "महात्मा फुले" हा मराठी चित्रपट निर्माण केला. चित्रपट दर्जेदार होता. पण तिकिटबारीवर तो चालला नाही. कारण तुमच्या कार्याचे/विचारांचे लाभार्थी चित्रपट गृहांकडे फिरकलेच नाहीत.

या चित्रपटाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यात कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे, खुद्द आचार्य अत्रे, केशवराव जेधे यांनी भुमिका केलेल्या होता. तो चित्रपट आपल्याला फार आवडल्याचे पत्रही बाबासाहेबांनी अत्र्यांना लिहिले. त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तथापि चित्रपट न चालल्याने अत्रे मात्र कर्जात बुडाले.

३) आज सर्व स्त्रिया, दलित-बहुजन-ओबीसी-अल्पसंख्याक शिकले, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली, त्यांच्यात मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग तयार झाला. तो उच्चजातीवर्गांचे आंधळे अनुकरण करू लागला. त्याला आपल्या जोती-सावित्रीसारख्या पुर्वजांचे ठार विस्मरण झाले, त्यांच्यासाठी ज्यांनीज्यांनी अपार खस्ता खाल्ल्या त्यांना तो सपशेल विसरला. तो आज निर्बुद्ध करमणुकीत बुडालेला आहे. चंगळवादात आणि दैववादात मश्गूल आहे. त्याला तुम्ही नको आहात.

४) जाने २०२० मध्ये "सावित्री-जोती आभाळाएव्हढी माणसं होती" ही मालिका सोनी मराठीवर दशमी क्रिएशनने सुरू केली. मधला करोना लॉकडाऊनचा चार महिन्यांचा खंड वगळता सुमारे वर्षभर ही मालिका चालू आहे. अनेक जाणकार ही मालिका सवड काढून बघतात. समक्ष भेटीत आणि फेसबुकवर तसे सांगतात. कलावंत, लेखन, दिग्दर्शन, निर्मिती दर्जेदार असल्याचे नमूद करतात पण मग त्याचे टीआरपीमध्ये रुपांतर का होत नाही? ह्या प्रश्नाचे उत्तर काही केल्या मिळत नाही.

५) मनोरंजन वाहिन्यांचे अर्थकारण टीआरपीवर अवलंबून असते. आजूबाजूला प्रचंड स्पर्धा आहे. प्रत्येकजण चांगला टीआरपी मिळवण्यासाठी धडपडतोय. टीआरपी प्रकरण अगम्य आहे. तरिही त्याचा महिमा अगाध आहे. लोकशिक्षण, समाजप्रबोधन, जाणीवजागृती, अभिरूचीनिर्माण यांना त्यात फारसे स्थान असत नाही. असले तर शेवटी कुठेतरी असते. निदान त्यांना प्राधान्य नक्कीच नसते. शिवाय आजचा राजकीय काळही प्रबोधनविरोधी आणि विपरीत. अशावेळी दशमीने आणि सोनी मराठीने वर्षभर अशी मालिका चालवली हेच विशेष. आज या मालिकेचे १८५ भाग पुर्ण झाले.

१८२७ साली जन्मलेल्या जोतीरावांच्या जडणघडणीची आणि शिक्षण क्रांतीची-कार्याची अतिशय प्रभावी मांडणी मालिकेत करण्यात आली. सध्या मालिकेत १८५२-५३ च्या काळातली कथा दाखवली जात आहे. हाच क्रम आम्हाला १८९७ पर्यंत चालवायचा आहे. पण चालेल का तो? सांगता येत नाही.

६) फेसबुकवर लाइक करण्याला पैसे पडत नाहीत. शिवाय पोस्ट न वाचताही लाईक ठोकता येतो. (एका लाईकला उद्या फेसबुकने शंभर रुपये दर आकारला तर सगळे लाइक चुटकीसरशी गायब होतील.) त्यामुळे फेसबुक/ट्विटरवरची लोकप्रियता अत्यंत फसवी आहे. तिचे शिक्षणात, प्रबोधनात, टीआरपीमध्ये, कशातच रुपांतर होत नाही. फेसबुक्यांची विस्मरण शक्ती अगाध आहे. कृतज्ञताबुद्धी अत्यल्प आहे.

७) जोतीराव-सावित्रीबाई तुम्ही कपाळकरंट्या, कृतघ्न आणि नतद्रष्ट बहुजनांसाठी अकारण खपलात. तुमचा त्याग सपशेल वाया गेलेला आहे. तुम्ही जे पेरलेत ते फारसे उगवलेले नाही. असलेच तर अत्यल्प उगवलेले आहे. १७२ वर्षांनंतरही अज्ञानमग्न असलेल्या ह्या वाचाळांना, वल्गनावीरांना आणि आत्ममग्न फत्तेलष्करांना माफ करा.

- प्रा. हरी नरके

Tags:    

Similar News