Corona Pandemic : व्यवस्थेचा राग येतोय का? मग हे नक्की वाचा
करोनाचा हाहाकार माजलाय... ऑक्सिजन मिळत नाहीये, बेड मिळत नाहीयेत, खूप राग येतोय ना इथल्या व्यवस्थेचा ? रोजगार, शिक्षण, आरोग्य सगळं काही विस्कळित झालंय. या परिस्थितीला आपल्या राज्यकर्त्यांची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत की आपण? वाचा डॉ. साधना पवार यांचा विचार करायला लावणारा लेख...
ऑक्सिजन मिळत नाहीये, बेड मिळत नाहीयेत, खूप राग येतोय ना इथल्या व्यवस्थेचा ?
पण, साथ ओसरेल तसे आपला व्यवस्थेवरील राग ही ओसरेल. आपण आपापल्या रोजीरोटीच्या मागे लागू. जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या ओझ्याखाली दबून जाऊ.
आपण निवडून दिलेल्या सरकारची नक्की कामे काय असतात? ते ती करतात का? यासाठी विचार करण्याइतका वेळ आपल्याकडे कुठे असेल? आणि मिळालाच वेळ तर तो असल्या बोअर गोष्टींचा विचार करण्यात आपण कशाला घालवू? नाही का ?
आपल्याला कधी कधी टेन्शन येतं ...
कशाचं असतं ते बहुतांश वेळा? आठवा बरं !
आपल्या मुलांना चांगल्या शाळांमधून चांगलं शिक्षण मिळेल का? त्यासाठीची पैश्याची व्यवस्था आपण करू शकू का? घरी कोणाला अचानक आजारपण आलंच तर त्याचा खर्च आपल्याला झेपेल का? घर घ्यायचं आहे पण नोकरी व्यवसाय बेभरवशाचे झालेत, होम लोन चे हफ्ते कसे फेडणार? या सर्व गोष्टी अवघड झाल्या आहेत आज सर्वसामान्यांसाठी... आणि याला कारण आपल्या राज्यकर्त्यांची चुकीची धोरणे.
मुळात धोरणे ठरवण्यासाठी लोक प्रतिनिधी निवडून द्यायचे हे कोट्यवधी जनतेला माहीतच नाहीये. ट्रॅफिक पोलिसाने अडवल्यावर आपल्या नेत्याने आपली विना दंड सुटका करावी, नेत्याने आपल्या घरच्या बारशाला लग्नाला येऊन आपली इज्जत वाढवावी, आपल्या समाजाचा नेता मोठा व्हावा, नेत्याने त्याच्या संस्थेत आपल्याला नोकरी द्यावी. अश्या उद्दात्त अपेक्षा असणाऱ्या आपल्या जनतेला आपल्या नेत्याने चांगली धोरणे ठरवण्यासाठी पुढाकार घेतला तर आपल्याच नव्हे तर आपल्या पुढील पिढ्यांचे देखील कल्याण होईल हे कसे समजावे ?
असो, पुढील निवडणूक येईल तो पर्यंत ही खदखद जागृत ठेवा म्हणजे झालं, तेंव्हा निवडणूक जवळ आल्यावर नेत्याकडून मिळणारा पैसा ही खदखद शांत करू नये म्हणजे झालं.
हो आणि अगदी सुरुवातीपासून आपले आरोग्य, शिक्षण, समानता यावर कोण मनापासून काम करतंय, कोण झटतंय याकडे लक्ष असू द्या !
डॉ. साधना पवार
(स्त्री रोग तज्ज्ञ)