पर्यटक म्हणून कोकणात जाताय? कि जाऊन आलात.... आपला अनुभव डॅा.सुचित्रा घोगरे यांच्या सारखा होता का?

कश्मीर हे भारताचं स्वर्ग आहे तर कोकण हे महाराष्ट्रातील स्वर्ग आहे. वर्षाचे बाराही महिने देशभरातून लोक इथे पर्यटनासाठी येत असतात. इथे समुद्राशी निगडीच अनेक खेळही पर्यटकांना खेळायला मिळत असतात. पण त्या दृष्टीने जी सुरक्षा, प्रशासनाचा वचक इथे असायला हवा तो पहायला मिळत नाही आणि पर्यटकांच्या जीवाशी खेळ होऊन बसतो. असाच भयावह अनुभव शेअर केला आहे डॉ. सुचित्रा घोगरे-पाटील यांनी......;

Update: 2022-05-25 04:34 GMT

येवा कोकण आपलाच (अ)नसा

आणि कोकण अजिबात सुरक्षित नसा

नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी, फेसाळणाऱ्या लाटा आणि लाटांची गुंज... निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकण किनारपट्टीचे पर्यटकांना खूपच आकर्षण आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात बाराही महिने पर्यटक कोकणात येत असतात.‌ पर्यटकांसाठी किनारपट्टीवर अनेक नवनवीन बीच साईट्स समोर येत आहेत. बीच रिसॉर्ट्स, होम स्टे या माध्यमातून कोकणवासीयांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळाले आहे. ही खूपच चांगली गोष्ट आहे. पण याची दुसरी बाजू म्हणजे कोकण पर्यटन अजिबात सुरक्षित नाही. त्यावर प्रशासन, पोलिस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियंत्रण हा संशोधनाचा विषय आहे.

पर्यटकांसाठी सोयीसुविधांचा अभाव आहेच पण यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे पर्यटकांची सुरक्षितता होय. पण या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय पातळीवर काहीच काम केले जात नसल्याचे वारंवार लक्षात येते. पर्यटक बुडाल्याच्या बातम्या आल्या की प्रशासन जागे होते पण यावर कोणत्याही उपाययोजना आखल्याचे, त्या अंमलात आणल्याचे वर्तमानपत्रात वाचायला मिळत नाही आणि प्रत्यक्ष गेल्यावर तर दिसतही नाही. एकूणच कोकणात येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे हे नक्की. याचा काल आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला.

विस्तीर्ण अशा कोकण किनारपट्टीवर छोट्या छोट्या गावालगतच्या किनाऱ्यावरील सुरक्षेसाठी उपाय योजना करणे तसे अवघडच. पण प्रसिद्ध पर्यटन स्थळे असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेविषयी आनंदच दिसून येतो.

देवबाग तारकर्ली येथे वॉटर स्पोर्टस् विकसित होऊन बरेच वर्ष झाली आहेत. त्याठिकाणी स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांचे काहीच तिथे काहीच नियंत्रण नाही. भरती ओहोटी च्या वेळा आणि त्या अनुषंगाने पर्यटकांसाठी नियमावली, सुरक्षा व धोक्याच्या सुचना याच्या पाट्या कुठेच आढळल्या नाहीत. एकूणच इथे प्रशासन कुठेच दिसत नाही. दिसतो तो फक्त स्थानिक व्यवसायिकच.

काल सकाळी त्सुनामी आयलंड पहाणे आणि तिथे वॉटर स्पोर्टस् राईड्स घेणे या उद्देशाने गेलो. बोट ठरवताना लाईफ जॅकेट्स आहेत ना असे विचारले होते तेव्हा 'हो' असे उत्तर दिले होते. मात्र बोटीत बसल्यावर तिथे लाईफ जॅकेट्स नव्हतीच. याचे कारण विचारल्यावर इथे जवळच जायचं आहे जॅकेट्स ची गरज नाही असे उत्तर मिळाले. समोरच त्सुनामी आयलंड दिसत होते त्यामुळे इट्स ओके म्हणत तो विषय सोडून दिला.

त्सुनामी आयलंड, पुढे खाडी व समुद्र संगम आणि क्रोकोडाईल बीच अशी राईड आम्ही घेतली होती. त्याप्रमाणे

त्सुनामी आयलंड वर बोटीतील इतर पर्यटक उतरले. आम्ही दोन मिनिटे पुढे गेलो तिथेच बोट थांबवून त्या मुलाने पाण्याच्या रंगातील फरक दाखवला व परत लगेच फिरला. आम्ही म्हटलं हे ठिकाण आपण खूप लांबून दाखवताय पैसे मात्र भरपूर घेतलेत. तर त्याने कांगावा केला. शुध्द फसवणूक आहे हे कळत असूनही हा विषय सोडून दिला.

परत येऊन स्कूटर राईड बनाना राईड घेत होतो तेव्हढ्यात पॅरासेलिंग बुक झाल्याने बोट न्यायला आली. त्यातून थोडे पुढे गेलो व परत त्यातून पॅरासेलिंग च्या बोट मध्ये बसलो. तिथेच फक्त लाईफ जॅकेट्स होती व तो बोटमन वारंवार सुरक्षिततेच्या सुचना देत होता. एवढीच एक सकारात्मक बाजू तीन दिवसांच्या कोकण प्रवासातील.

पॅरा सेलिंग करुन परत आलो व त्सुनामी बेटावर जायला दुसऱ्या बोटीत बसलो. बेटाजवळ आलो तर सर्व बेट पाण्याखाली गेले होते. लाटांचा जोर वाढला होता. एकूण परिस्थिती पाहून आम्ही तिथे न जाण्याचा निर्णय घेतला व आम्ही यातून उतरणार नाही असे सांगितले. तसेच आम्ही पैसे देतो पण आम्हाला इथे न सोडता पुढे जाऊन धक्क्यावर सोडा अशी विनंती केली. पण तुम्हाला ज्याने सोडलंय तोच घेऊन जाईल तुम्ही बोटीतून उतरा असे सांगून त्याने आम्हाला अक्षरशः बोटीतून बाहेर पडायला भाग पाडले.

बोटीतून उतरणे भयंकर होते. एकतर खांद्यापर्यंत पाणी होते. लाटांचा जोर वाढला होता. बोट पूर्ण एका बाजूला कलत होती. यात छोट्या अमोघच्या डोळ्याखाली बोटीचा जोरदार मार लागला तर त्याच्या डॅडीच्या म्हणजे मेहूण्यांना पायाला मार लागला. बहिण आणि तिचा छोटा मुलगा उतरत असताना जोराची लाट आली आणि बोट नेमकी त्याच बाजूला पूर्णतः झुकली आणि ती दोघीही बोटीच्या खाली अडकता अडकता वाचली.‌ बोटीतून उतरल्यावर पुढे सुरू झाली तो जीवघेणा थरार.

(त्याविषयी लिहायचं म्हटलं तरी अंगावर शहारे येतात मन अस्वस्थ बनतं आणि म्हणूनच ही पोस्ट लिहायची अर्धवट सोडून दिली होती. पण आजची दुर्घटना वाचली आणि पुन्हा यावर लिहिण्याची गरज लक्षात आली.) अंगावर येणारी प्रत्येक लाट काळजाचा ठोका चुकवत होती. आमच्या खांद्या एवढी पाण्याची पातळी वाढली होती आणि त्यात लाटांवर लाटा येत होत्या. साडेसात वर्षांच्या अरुष, दाक्षिणी दोघांना तिथल्या एका छोट्या मचाणावर बसवले होते. मोबाईल पैसे पर्स वगैरे महत्वाचे साहित्य बरोबर नेलेल्या मोठ्या वॉटरप्रुफ बॅग मध्ये ठेवले होते. आणि मचाणाचे एक एक खांब पकडून आम्ही लाटांना सामोरे जात होतो. लाटेच्या तडाख्यात माझा चष्मा वाहून गेला. अनेकांचे साहित्य वाहून जात होते. लहान मुलांसाठी भयंकर स्थिती होती. पण स्थानिकांना या परिस्थितीशी काहीही देणंघेणं नव्हते. ते निर्ढावलेपणाने या परिस्थितीकडे बघत होते. एका मचाणावर बसलेल्या स्थानिक लोकांना मदतीसाठी विनंती करत होतो. आमच्या बोटीच्या माणसाला फोन लावा म्हणून ओरडुन सांगत होतो. पण ते अक्षरशः दुर्लक्ष करत होते.

त्सुनामी बेटावर मचाण तयार करुन त्यावर खाद्यपदार्थ वेगवेगळ्या वस्तूंची दुकानदारी लावलेले तिथले स्थानिक लोक त्यांची दुकाने गुंडाळून गायब झाली होती.

बेटावर पर्यटकांशिवाय कोणीही नव्हते आणि प्रत्येकजण लाटांचा सामना करत मदतीसाठी ओरडत होते. एक बोट आली पण तो आम्हाला घेऊन जायला नकार देत होता. कारण तेच... तुम्ही ज्या बोटीतून आलात त्याच बोटीतून परत जा असे सांगितले जात होते. पण यावेळी आम्ही त्याचे ऐकले नाही व एकमेकांना हात देत त्या बोटीपर्यंत पोहचलो आणि बोटीत बसलो. आम्ही त्याला वेगळे पैसे देण्याची तयारी दाखवूनही तो आम्हाला घेऊन जायला नकार देत होता.

आम्ही आठजण बोटीत चढलो. पर्यटकांचा दुसरा ग्रुप चढला. त्यांची तर अत्यंत वाईट अवस्था होती. मोबाईल पैसे साहित्य भिजले होते पण याहीपेक्षा सहा महिने ते चार पाच वर्षे वयोगटातील त्यांची मुले होती. एक मूल तर अक्षरशः लाटेवर हातातून निसटून गेलेले दोन गटांगळ्या खाऊन परत पकडले होते. बहुतेक डॉक्टरांचा तो ग्रुप असावा कारण डॉक्टर नावाने ते एकमेकांना संबोधित होते. मुलांची सुरक्षितता धोक्यात आल्यामुळे त्यातील आया घाबरल्या होत्या आणि चिडलेल्या होत्या.

आम्ही धक्क्यावर परत आलो व पार्किंग कडे जायला निघालो तर समोर आम्हाला बोट ठरवून दिलेला व्यक्ती भेटला. त्याला घडलेला प्रकार सांगितला तर तो हसत हसत म्हणाला "तुमचा फक्त चष्माच गेला लोकांचे फोन, पाकीटे अजून काय काय नेहमीच जात असतं."

त्याचं हे वाक्य ऐकून एक महत्वाची बाब लक्षात आली ती म्हणजे अशा घटना त्यांच्यासाठी नेहमीच्याच आहेत.

हा सर्व प्रकार अनुभवल्यानंतर काही महत्वाचे प्रश्न मनात उपस्थित झाले आहेत. ते म्हणजे...

१. तीन दिवसांच्या अख्या पर्यटनामध्ये मालवण परिसरात एकही पोलिस आम्हाला दिसला नाही.

२. देवबाग जवळच्या धक्क्यावर कुठेही सूचना फलक नव्हते. सुरक्षितता उपाययोजना याविषयी माहिती फलक नव्हते.

३. बोटींमध्ये सुरक्षितता जॅकेट्स नव्हतीच. इतरही सुरक्षित बाबी नव्हत्या.

४. बहुतांश बोटी जुन्या आढळल्या.

५. बोटींचे कसलेचं नियोजन नव्हते.

६. स्थानिक प्रशासन पोलिस कोस्टल गार्ड यापैकी कोणीही तिथे उपस्थित नव्हते की यावर प्रशासनाचे नियंत्रण आहे असे कुठेच दिसून आले नाही.

७. जाताना आवर्जून आधार कार्ड घेऊन गेलो होतो. MTDC मान्यताप्राप्त होम स्टे ला थांबलो होतो पण त्याने फक्त नाव विचारले. तिथे कोणतेही रजिस्टर नव्हते. ओळखपत्र मागणे ही दूरची गोष्ट.सर्व अनागोंदी कारभार. फक्त आणि फक्त व्यवसायिक लोकांचं साम्राज्य.

एकूणच स्थानिक प्रशासन, पोलिस, जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग, कोस्टल गार्ड इ. कोणीच तिथे दिसून आले नाही. एकूणच सगळा व्यवसायिकांचा बाजार. पर्यटकांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याचबरोबर पर्यटकांची आर्थिक लूट हाही वेगळा विषय आहे.हे सगळं अनुभवल्यावर मनात विचार येतो 'येवा कोकण आपलाच असा' नव्हे तर "येवा कोकण आपलाच नसा" आणि "कोकण अजिबात सुरक्षित नसा" हे खरं आहे.

यावर शासनाच्या सर्व संबंधित विभागाने त्वरित दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. आज घडलेल्या दुर्घटनेतून शासनाला जाग येईल ही अपेक्षा.

कोकणातून परत आल्यावर या घटनेविषयी लिहून वॉट्सऍपवर पोस्ट केले होते. ते तेव्हाच फेसबुक वर पोस्ट करायला हवे होते. कदाचित प्रशासनाने दखल घेतली असती असे वाटतंय.

अॅड. डॉ. सुचित्रा घोगरे-काटकर

सातारा

Tags:    

Similar News