स्वतःच घर जाळून कोळश्याच्या धंदा करण्याची सवय असते एकेकांना !!

जेव्हा सतत एखादी व्यक्ती नकारात्मक राहते तेव्हा तीचं काय होतं? Introert लोक कसे स्वतःच स्वतःच्या आयुष्याची माती करतात जाणून घेण्यासाठी वाचा धनंजय देशपांडे यांचा हा लेख...;

Update: 2022-07-16 05:00 GMT

 गेल्या आठवड्यात इथल्याच एफ बी फ्रेंडचा मेसेज आला की, डीडी तुमच्याशी बोलायच आहे, जरा नम्बर देता का ?

मी सावधपणे आधी "विषय काय आहे?" असं विचारल्यावर म्हणाला, "फॅमिली प्रॉब्लेम आहे, बायको हल्ली फारच निराश व खचून गेल्यासारखी झालीय. तर जरा तुमच्याशी चर्चा करायची आहे"

मग मी नम्बर दिला. आमचे बोलणे झाले. त्यांना मी ऑफिसवर बोलवून घेतलं आणि सविस्तर समजून घेतलं नंतर त्यांच्या मिसेसला घेऊन पण आमची कॉमन मिटिंग झाली. त्यात जे मला लक्षात आलं, त्यानुसार त्यांना थोडं समजावून सांगून उपाय सांगितला. ते त्यांनाही पटलं आणि समाधानाने ते गेले.

तर मंडळी.....

हल्ली समाजात वावरताना एक जाणवत की, काही माणसे एकमेकांच्या मदतिसाठी जशी तत्पर असतात, माणुसकी जपत पाठीशी उभे असतात तशीच काही माणसे स्वतःच घर जाळून कोळश्याच्या धंदा करणारी पण दिसतात. ती अशी का वागत असतील याचा विचार करत असताना लक्षात आलं की, हि मंडळी आत्मकेंद्रित जास्त असतात मात्र लोकांचे लक्ष यांच्याकडे जावे, अशी सुप्त इच्छाही यांची असते.

मुळामध्ये इन्ट्रोव्हर्ट (आत्मकेंद्रित) माणसासोबत

मित्रमंडळी जरा कमीच असतात आणि

एक्स्ट्रोव्हर्ट सोबत गोतावळा मोठा असतो.

आणि म्हणूनच अशी काही इन्ट्रोव्हर्ट मंडळी मग एक्स्ट्रोव्हर्ट बद्दल उगीच गैरसमज मनात करून घेतात. आणि उगीचच त्याच्याशी स्पर्धा करण्याच्या ओघात अनेक नको त्या गोष्टी करून बसतात. ज्यात त्यांचे स्वतःचेच नुकसान जास्त असते. पण हे त्यांना त्यावेळी कळत नाही आणि जेव्हा कळत तेव्हा फार उशीर झालेला असतो. त्यावेळी घर जळून गेलेलं असत पण तरी यांचा पीळ सुटलेला नसतो आणि म्हणूनच अशी मंडळी मग त्या जळालेल्या स्वतःच्या घराचा कोळसा जणू विकत बसतात. म्हणजे लोकांना स्वतःच्या दुर्दैवाबद्दल, स्वतःच्या दुःखाबद्दल उगाळून उगाळून सांगत बसतात की जेणेकरून समोरच्याने त्यांना सहानुभूती दाखवावी.

अशा लोकांना "सिम्पथीजीवी" असं मी म्हणतो.

तुमच्या कर्माने तुम्ही हि स्थिती ओढवून घेतलेली असते मग आता लोकांपुढे गळा काढून काय उपयोग ? गंमत म्हणजे स्वतःचे दुर्दैव समोरच्याला अधिक वाटावे आणि अधिक सहानुभूती मिळावी म्हणून हि मंडळी अनेकदा मग खोटं सुद्धा सांगायला कमी करत नाहीत. किंवा घडलेलं असत थोडं पण वाढवून सांगतात हे लोक जास्त ! म्हणजे गुडघ्याला खरचटलं असेल तर सांगत बसणार की माझा पाय मोडला. आता माझं कस होणार ? वगैरे वगैरे !

मात्र त्यांना काही काळच मित्रमंडळी सुद्धा सहानुभूती दाखवतात

मात्र सत्य काय आहे हे कळल्यावर तेच मित्र मग यांच्या वाऱ्याला फिरकत नाहीत.

पाठबळ देणे तर मग दूरच !

आणि मग हि इन्ट्रोव्हर्ट मंडळी अजूनच निराशेच्या अंधारात जातात. खचण्याच्या अवस्थेत जातात.

त्याचे एक कारण म्हणजे कर्मा रिटर्न्स हा सिद्धांत !

तुम्ही जे केले आहे तेच तुम्हाला परत मिळणार, हे १००% सत्य आहे. तुम्ही सहानुभूती मिळवण्याच्या नादात तुमचं दुःख, रडगाणेच वाटत फिरला. पण तुम्हाला रिटर्न मध्ये मात्र आनंद हवा ! असं कस घडेल ? जे पेरलं तेच उगवणार न ?

डीडी क्लास : त्या जोडप्याला जो उपाय सांगितला तोच शॉर्टमध्ये इथं सांगतो. लोक तुमचं जळालेले घर विझवायला कमी येतील पण अजून पेटवायला जास्त येतील. त्यामुळे आपण किती अडचणीत आहोत, आपल्याला सर्व जगाचं दुःख कस सहन करावं लागत हे सांगत बसू नका. त्यातून बाहेर या. आणि जमलं तर दुसऱ्याच खरंखुरं दुःख जाणून घेणे सुरु करा. आणि त्यातून शक्य झालं तर त्याला आधार द्यायचा प्रयत्न करा. आनंद देण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या ओंजळीतील हि सुगंधी फुले

इतरांना दिली तरी तुमच्या तळहाताला

तो सुगंध मागे राहतोच की !

अडचणी कुणाला नाहीत ? संकट कुणाला नाहीत ? तुमहाला आहेत तशीच मलाही असतीलच की ? पण मी त्याचा विचारच करत नाही. इतकंच नव्हे तर त्या गोष्टीचा बाजार पण करत नाही. आपल्या आपण त्यावर उपाय शोधावा अन तो करून मोकळं व्हावं. लोकांना का ताप त्याचा ? असं माझं मत ! म्हणून मग माझ्या हाती लोंकासाठी दयायला वेळ शिल्लक राहतोच. तो जमेल तसा सुगंधी देतो ! तसेच तुम्हालाही हे सहज जमेल. एकदा प्रयत्न सुरु करून तर पहा ! यश तुमची वाट पाहत असेल कदाचित !

©️ धनंजय देशपांडे

Tags:    

Similar News