संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने २०१० पासून २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून पाळला जातो. बहुतांश देशांत विधवांची स्थिती वाईट आहे. समाज त्यांना भेदभावाची वागणूक देत असतो. या परिस्थितीत सकारात्मक बदल व्हावा हा या दिनामागचा मुख्य उद्देश. यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने विधवा दिनाचा विषय कोरोनाच्या पार्श्व्भूमीवर ‘Including widows in the work to “build back better” from COVID-19 असा जाहीर केला आहे.
कोविड १९ चे सर्वाधिक परिणाम हे जगभरात स्त्रियांवर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे. स्त्रियांच्या मानवी हक्काचे उल्लंघन वेगवेगळ्या घटनांमधून समोर आले आहे. ज्या स्त्रिया एकट्याने आयुष्य जगत आहेत, त्याच्याबाबतीत अतिप्रसंग, लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणारे प्रसंगही समोर आले आहेत किंबहुना अजून समोरयेत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिव आणि संयुक्त राष्ट्रसंघ महिलाच्या कार्यकारी संचालक फ्यूमझिले मलामबो -नगुका यांनी आंतरराष्ट्रीय विधवा दिनाच्या निमित्ताने भाषण करत असतांना, कोविड १९ महामारीमुळे लोकांचे आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात जगासमोर उभे राहिले आहे असे मत व्यक्त केले. या महामारीमुळे इटली, फ्रान्स, मेक्सिको, थायलंड या देशात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. यामुळे विधवा स्त्रियांचे प्रमाण अजून वाढले असून त्याचे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. जगभरात विधवा स्त्रियांची संख्या आधीच मोठी आहे. या महामारीमुळे यात अजून भर पडली आहे.
वास्तविक पाहता आपत्ती कोणती असली तरी जास्त परिणाम स्त्रिया, मूल आणि वृद्धावर होतांना दिसून येतो. वर्ष २०१५-१६ मध्ये मराठवाड्यातील दुष्काळ- एकल महिला आणि पाणी प्रश्न अभ्यासात असतांना ग्रामीण भागात एकट्या राहणार्याम स्त्रियांना आणि मुलींना हंडाभर पाणी आणण्यासाठी किती पायपीट करावी लागते, पाण्याच्या शोधात आपला एक दिवसाचा रोजगार बुडू नये म्हणून घरातील लहान मुलांना सकाळी उठल्यापासून पाण्याच्या रांगेत भर उन्हात उभे राहावे लागते असे अनेक प्रसंग यावेळी पाहिले होते. आता कोविडच्या अनलॉक फेजमध्ये शहर आणि ग्रामीण भागातील चित्र काही वेगळे नाही. तेव्हा फक्त ‘दुष्काळ’ होता आता ‘महामारी’ आहे.
ह्या महामारीच्या अनलॉकमधील काही प्रसंग
नीता, वय ३५-४० वर्ष. नवर्यावचे अकाली निधन झाले. कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी नवरा भाजीपाला विक्रीचे काम करत होता तिने हे काम पुढे चालू ठेवले. अडीचशे तीनशे फ्लॅटची हाऊसिंग सोसायटीमध्ये चार-पाच वर्षापासून भाजीपाला विक्रीची काम करते. तिला दोन मूल मोठा १४ वर्ष आणि लहान १२ वर्षाचा. दोघेही घराच्या जवळ असलेल्या शाळेत जातात. लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या. मुलांना घरी एकट सोडू शकत नाही. त्यामुळे मुलांसहित रोज भाजी विकायला येते. लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असल्यामुळे त्याच सोसायटीच्या बाहेर सकाळच्या वेळेत भाजीची गाडी पूर्वी लावत होती तशी आताही दोन मुलांना घेऊन लावत होती. सोसायटीमध्ये एकाने आक्षेप घेऊन तिची गाडी लावण्यास मनाई केली. इतकच नाही तर तिच्या भाजीच्या गाडीवर असलेले भाजीचे एक टोपलेही खाली फेकून दिले. तुझ्या आणि तुझ्या मुलांमुळे आमच्या सोसायटीत कोरोना येईल म्हणून तिच्यासोबत भांडण केल. नीताचे म्हणणे होते की, ‘मी भाजी विकली तर मुलांना खायला घालू शकते. माझ्याशी भांडण करून माझ नुकसान ही केल. रोगाच माहित नाही पण कामधंदा करून पोट भरता आल नाही तर उपासमारीन आमच्यासारखे गरीब लोक मरायचे’.
सरलाबाई वय वर्ष ६०. घरेलू कामगार आहेत. नवऱ्याचे अपघाती निधन झाले. मुलांनी त्यांचा वेगळा संसार सुरू केला. स्वत:चा खर्च चालविण्यासाठी सरलाबाईनी घरकाम सुरू केले. वयामानाने फारस काम होत नाही, तरीही सहा घराची भांडी घासायचे काम करतात. महिन्याला तीन हजार रुपये त्याची मिळकत होती. लॉकडाऊन सुरू झाले आणि काम बंद पडले. मार्चच्या महिन्यात सगळ्यांनी कामाचे पूर्ण पैसे दिले. एक दोन घरातील लोकांनी धान्याची मदत केली. रेशन कार्डवर धान्य मिळेल ही आशा होती पण मुलाने रेशन कार्डवर धान्य मिळणार म्हणून सरलाबाईच्या घरी येऊन रेशन कार्ड घेऊन निघून गेला. सरलाबाई म्हणतात, काम सुरू झाल की कशाची काळजी नाही. जन्मभर कोणापुढे हात पसरले नाही उरलेल्या आयुष्यात हात पसरायची वेळ येऊ नये म्हणजे झाल. मी कामाला जायला तयार आहे पण बाईसाहेब नको म्हणतात. सरलाबाई सांगत होत्या, ‘माझ्या एका बाईन लय मदत केली. त्यांच्या पोराकडुन मला कामाचे पैसे पाठवून दिले. माझ्या मनाला गोड लागना. काम न करता पैसे कसे घ्यायचे. तर अन्य एक दोन ठिकाणी त्यांना कामावर येऊ नका म्हणून जरा काळजीही वाढली आहे.
पुष्पा वय वर्ष ३५. अपघातात नवर्यााचा मृत्यू झाला. मोंढ्यात डोक्यावर भाजीपाला वाहून नेण्याचे काम करते. पुष्पा सांगत होती, भाजीपाला गरजेचे काम म्हणून सुरू होते. पण मोंढ्यात गर्दी झाल्यामुळे मोंढा बंद करण्यात आला. त्यामुळे आमचं काम बंद झाल. हे काम म्हणजे रोज काम करायचं आणि रोज पैसे घ्यायचे. त्यामुळे काम केल्याशिवाय पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे सगळं काम बंद झाल. सगळं कधी सुरळीत होईल माहिती नाही. या तीन महिन्यात जे अनुभव आले ते अनुभव परत येऊ नये अस वाटत. काम लवकर सुरू झाल पाहिजे. आज दोन अडीचमहिने झाले रोज मी माझी मुलगी, सासू भाताशिवाय दुसरे काही खात नाही. लोकांनी केलेली मदत किती दिवस पुरणार. पाच किलो पीठ कसबस एक वेळ चपाती आणि एक वेळ भात अस करून महिना भर पुरवलं. आता पीठ संपून दीड महिना झाला आहे.
महामारी प्रतिबंधासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे विधवांचे जिणं हतबल झाल आहे. कुणापुढेही हात न पसरता स्वाभिमानं जगणाऱ्या विधवांची ही काही प्रातिनिधिक उदाहरणं. अनलॉक फेज सुरू असली झाली असली तरी कष्टकरी लोकांचे जिणं लॉकडाऊन झाले आहे.
जागतिक स्तरावर विधवा स्त्रियांचे जगणे ही असेच आहे. वर्ष २०१५ मध्ये प्रथम जगातील विधवा स्त्रियांच्या जीवनावर अभ्यास केला गेला. हा अभ्यास लुम्बा फाउंडेशनने केला होता. ह्या अभ्यासाचे निष्कर्ष
१ - जागतिक स्तरावर विधवांची संख्या २५८,४८१,०५८ आहे.
२ - मध्य आशिया आणि उत्तर आफ्रिका खंडात वर्ष २०१५मध्ये सिरिया आणि अन्य युद्धजन्य स्थितीमुळे विधवांच्या प्रमाणात २४ % वाढ झाली आहे.
३ - जागतिक पातळीवर सातपैकी एक विधवा अत्यंत गरिबीच्या स्थितीत जीवन जगत आहे.
४ - भारत आणि चीन या दोन देशांत दर तीन स्त्रियांमागे एक स्त्री विधवेचं जीवन जगत आहे.
५ - विधवांची संख्या भारतात ४६ दशलक्ष, तर चीनमध्ये ४४.६ दशलक्ष आहे.
६ - जागतिक स्तरावर विधवांचं सर्वाधिक प्रमाण असलेला भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
पंतप्रधानांनी स्थलांतरित मजुरांसाठी गरीब कल्याण योजना सहा राज्यात सुरू केली असली तरी ही योजना आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी अन्य राज्यातही सुरू करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात मनरेगाची कामे ग्रामीण भागातील महिलांना मिळतील हे आवर्जून पहावे लागणार आहे. शहरातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागणार आहे. हे विधवा स्त्रियांचे जीवन अनुभव असले तरी भारतात २०११ च्या जनगणनेनुसार सात करोड एकल महिलांचे प्रमाण आहे. ह्या लॉकडाऊनचा परिणाम देशातील बहुसंख्य एकल महिलांना कमी अधिक प्रमाणात सोसावा लागला आहे. अशा एकल महिलांकरिता “build back better” करण्यासाठी वर्तमान आणि भविष्यातील गुंतवणूक ही कष्टकरी समाजातील स्त्रियांना डोळ्यासमोर ठेऊन केली तरच त्यांचं जिणं पुन्हा सुखकर होऊ शकते.
रेणुका कड, लेखिका