लॉकडाऊन: इंटरनेट, फ्री पोर्न आणि महिलांची अडचण

Update: 2020-04-26 09:30 GMT

आदिती, यंदा दहावीच वर्ष. उन्हाळी कोचिंग क्लासेस बंद आहे. त्यामुळे ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. ऑनलाइन असल्यामुळे कधी मैत्रिणीसोबत ऑनलाइन चॅटिंगही केले जाते. सोशल मीडियावरही काही काही पोस्ट करत असते. फोटोच्या अॅमपमधून काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे. यात आलेल्या लाइक आणि कमेंट्सला उत्तर देणे असा दिवसाचा वेळ जातो. दोन दिवसापूर्वी राधिकाने (आदितीची आई ) सोशल मीडियाचे अकाऊंट कसे बंद करतात हे विचारण्यासाठी फोन केला. अगदी माहिती जाणून घ्यायची असेल म्हणून अकाऊंट कसे डिलिट केले जाते हे तिला सांगितले. तुला कोणाचे अकाऊंट डिलिट करायचे हे विचारले तेव्हा माझ्या मुलीचे अकाऊंट डिलिट करायचे आहे तिने सांगितले. कारण विचारले असतांना नाही हो करत म्हणाली ह्या आठ दिवसात तिला फेसबुकवर ९०० फ्रेंड रिक्वेस्ट आल्या आहेत. यातील एक दोघे सोडले तर बाकी कोणीच तिच्या किंवा माझ्या ओळखीचे नाहीत. यातील काही जण मेसेंजरवर फालतू मेसेज पाठवतात. कोणीतरी तिच्या फोटोत नको असलेले बदल करून तिच्या मेसेंजरवर पाठवले. तू मला भेटायला आलेच पाहिजे नाही तर हे सगळे फोटो व्हायरल केले जातील. उलट मी सांगितले नाही म्हणू नकोस, ही धमकीही तिला दिली आहे. घरबसल्या दुखणं विकत घेतल्या सारखं झालाय अशी भावना तिने व्यक्त केली.

हे ही वाचा...

(नावे बदललेली ) कोर्पोरेटमध्ये काम करणारी रचना आणि तिचा नवरा राजीव (नाव बदलले आहे). लॉकडाऊन असल्यामुळे रचना आणि राजीव आणि तिचा पती दोघांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. लॉकडाऊन असल्यामुळे रचनाला घरी राहून ऑफिसचे काम आणि घरचे सगळे काम पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. रचना रोज सकाळी वेळेत सगळं आवरून ऑफिसचं काम सुरू करते. राजीव तिला घरकामात मदत म्हणून भाजी आणून देण्याचं काम करतो. हे सगळं आठवडाभर व्यवस्थित सुरू होत. राजीवने रोज जेवणात वेगवेगळ्या फर्माईश करायला सुरुवात केली. रचना तो म्हणेल तसं सगळं करत होती. वर्क फ्रॉम होम जारी असलं तरी रोजच्या मिटिंग्स, अपडेट्स, तासातासाचे रिपोर्ट्स, घरचे काम आणि मदतीला कोणी नाही याचा शीण तिला जाणवत होता. राजीवने आपल्याला कामात थोडी मदत करावी ही रचनाची अपेक्षा होती पण असे काही घडत नव्हते. उलट तो ऑनलाइन जे काही पाहतो ते सगळे पाहाण्यासाठी रचनाला आग्रह करत असे. हे सगळं पाहून त्याप्रमाणे तिने कृती करावी म्हणून तिच्या मागे लागत असे. थोडही त्याच्या म्हणण्याप्रमाणे झालं नाही की, राजीव तिला टोचून बोलत असे. तू वर्क फ्रॉम होम करतीये पण ऑनलाइन केवळ तू फक्त त्याच पुरुषाशीच जास्त वेळ बोलत असते म्हणून तिला त्रास देत असे. त्यामुळेच माझ्याशी असं वागतेस. राजीवच्या रोज वेळी अवेळी अशा पद्धतीने वागण्याचा त्रास रचना सहन होत नव्हता. काय कराव कळेना. कुठे जाताही येत नाही अशा द्विधा अवस्थेत रचना सापडली आहे.

राधिकाची मुलगी असो किंवा रचना सारख्या स्त्रिया असो या लॉकडाऊनमुळे घराच्या आत राहूनही अनेक प्रकारच्या अत्याचाराला सामोर्याा जात आहे. राधिकाला तिच्या मुलीचे अकाऊंट बंद करणे हा पर्याय दिसतो तर रचनाला काय करावे सुचत नाहीये. रचनाने माहेरी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही दोघेचं आहात छान एंजॉय करा असे घरच्यांनी सांगितले. त्यामुळे व्यक्त होण्या आधीच संवाद बंद झाला.

लॉकडाऊनमुळे सर्वजण इंटरनेटचा वापर करत आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड्स सुरू आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून चांगल्या वाईट अशा दोन्ही गोष्टी होतांनाच्या घटना आपण वाचत असतो पाहत असतो. काही वेळा कळत न कळत आपणही ह्याचे बळी पडलेले असतो. जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतं आहे. यासाठी जगातील बहुतांश देशात लॉकडाऊन केले आहे.

याच पार्श्वभूमीवर पॉर्नहबने त्यांच्या वेबसाईटवरील प्रिमियम कंटेंट जगभरातील सर्व देशांमध्ये एका महिन्यासाठी मोफत उपलब्ध करुन देत असल्याची घोषणा केली होती. ही घोषणा ज्या ज्या देशात कोरोनाचा प्रसार वाढला त्या सर्वच ठिकाणी कंपनीने जाहीर केली. परिणामी यामुळे साईटवर येणाऱ्या युझर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. ही घोषणा आधी यूरोपियन देशात दिली गेली होती. २५ मार्चला जगभरातील बहुतांश देश लॉकडाऊन झाल्यामुळे जगभरात ही घोषणा एका परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली होती. यात भारताचाही समावेश आहे.

या पोर्नोग्राफीक वेबसाईट्सचे भारतातील लॉकडाऊन पूर्वीचे युजर्स म्हणजे २५ मार्चच्या पूर्वी ५५% इतके होते. तर ही घोषणा झाल्यानंतर म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी २६ मार्चला ही टक्केवारी ८६% इतकी एका दिवसात वाढली होती. पुढे प्रीमियम कटेंट पाहणाऱ्या भारतीयांची संख्या ९५% इतकी झाली.

लॉकडाऊनच्या काळात भारतात कंडोम विक्रीचे प्रमाण अधिक वाढल्याचे वृत्त ही मार्चच्या अखेरीस प्रसिद्ध झाले होते. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये लोक वेबसाईटवर कोरोना किंवा कोविड (‘Corona’ or ‘COVID’) या नावाने पॉर्न सर्च करत असल्याचे म्हटले आहे. ऐरवी प्रीमियम कंटेंट पहाण्यासाठी ऑनलाइन जी किंमत असेल ती किंमत देऊन हे कंटेंट पाहता येतात. त्यामुळे प्रीमियम कंटेंटच्या युजर्सचे प्रमाण मर्यादित होते. हीच बाब डेटिंग अॅतपच्या बाबतीतही झाली आहे. डेटिंग अॅचपचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

यासोबतच दुसरे वृत्त आहे ते जगभरात स्त्रियांच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे. अशा वेबसाईट्सचा परिणाम मानवी मानसिकतेवर होत असतो. काही वेळा व्यक्ति यातून आक्रमक, विकृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा साईट्स वापरताना आपण काळजी घेणे गरजेचे आहे. जेव्हा अशा साईट्स किंवा अॅतप्स ऑनलाइन वापरले जातात तेव्हा यावर आपल्या संदर्भातील बेसिक माहिती द्यावी लागते. काही वेळेला ह्या महितीचा गैरवापर होण्याचा धोकाही असतो. हल्ली कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेसमध्ये सोशल मीडियाचा वापर हेही कारण नमूद केले जात आहे. न्यायालयीन प्रक्रियेतही इंटरनेटवरील कंटेंट पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येत आहे. म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून आपण काय वापरायचे. किती प्रमाणात वापरायचे हे ठरवणे गरजेचे आहे.

कोरोना विषाणू जसा समाजात वेगाने पसरत आहे तसेच वेगवेगळ्या पातळीवर जेव्हा कोणत्याही घटना घडतात तेव्हा त्याचे सर्वाधिक पीडित हे बालके आणि स्त्रियां असतात हे समजून घेणे गरजेचे आहे. इंटरनेट आणि सोशल मीडिया तुम्ही वापरला नाही तरीही त्याचे बळी जाऊ शकतात हेही लक्षात घेतले पाहिजे. यात स्त्रियांचं प्रमाण मोठ आहे. म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून वापरल्या जाणाऱ्या सोशल साईट्स, सोशल मीडिया हे ‘सोशल भान’ ठेऊनच वापरले पाहिजे. अशा सगळया अत्याचाराला प्रतिबंध म्हणून राज्य सरकारने १०० नंबरवर तक्रार करण्यास सांगितले आहे. काही महिला संस्थाही हेल्पलाइन नंबर दिला आहे. लॉकडाऊन काढल्यानंतर देशात स्त्री अत्याचाराच्या घटनाचे प्रमाण अजून वाढेल अशी शंका, भीती व्यक्त होत आहे. यातून मानसिक आजाराचे प्रमाण वाढू शकते. येणार्या् काळात केवळ कौटुंबिक हिंसाचारावर समुपदेशन करून चालणार नाही तर मानसिक समुपदेशन, मोबाइल इंटरनेट अॅडिक्शनला प्रतिबंध करणारे समुपदेशन, वर्तन समस्या ह्यावरही येत्या काळात मोठ्या प्रमाणात सेवा उपलब्ध करून द्यावा लागतील.

-रेणुका कड

संदर्भ:

१. https://www.cnbc.com/2020/03/20/coronavirus-lockdown-pornhub-is-offering-free-premium-memberships.html

२. https://www.news18.com/news/buzz/pornhub-records-95-percent-increase-in-traffic-from-india-amid-21-day-lockdown-2566267.html

३. https://www.firstpost.com/tech/news-analysis/pornhub-sees-95-per-cent-spike-in-indian-viewership-during-coronavirus-lockdown-report-8234401.html

Similar News