अधुन मधून टीव्हीवर बातमी येतेय लॉकडाऊन मुळे घरगुती हिंसाचारात आणि अत्याचारात इतक्या इतक्या टक्क्यांनी वाढ झाली आहे अशी. आणि सांगितले जात आहे त्यापेक्षा बहुतेक तरी याचे प्रमाण बरेच जास्त असेल. आजच्या परिस्थितीत सर्वसामान्य माणसासाठी हा प्रश्न तितकासा महत्त्वाचा नसला तरीही काही लोकांसाठी मात्र या बिकट परिस्थितीत या कौटुंबिक हिंसाचारामुळे आयुष्य आणखीनच अवघड झाले असेल. पण का होत असेल असे? कुटुंबातीलच मंडळी आपल्याच कुटुंबियांशी का वागत असतील असे? घरात बंद झाल्यामुळे? करायला इतर काही काम नाही म्हणून? करमणूक म्हणून? संताप अनावर होतो म्हणून? या प्रकाराची फारसी दखल घेतली जात नाही व शिक्षा होत नाही म्हणून? का मग ज्या लोकांशी मुळातच पटत नाही त्यांच्या सोबतच इतका वेळ घालवावा लागत आहे म्हणून? माहीत नाही. प्रत्येक ठिकाणची कारणे वेगवेगळी असतील, आणि कदाचित काही ठिकाणी कुठलंही कारण नसेलही...
हे ही वाचा..
जिथे असे कुठलेही कारण नसेल किंवा संबंधित माणूसच विकृत असेल तिथे संबंधित व्यक्तिला झालेल्या कडक शिक्षेशिवाय इतर कुठला इलाज आहे असे मला वाटत नाही पण शक्यतो असे प्रकार फारसे उघडकीस येत नाही.
इतर ठिकाणी मात्र असे नसते तेथे नाते संबंध टिकवण्यासाठी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले पाहिजे, तडजोड केलीच पाहिजे असे बऱ्याच लोकांचे मत असते. तर काहींच्या मते मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करणे, तडजोड करणे म्हणजेच या प्रकाराला मान्यता आणि प्रोत्साहन देणे होय. या संदर्भात काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘थप्पड’ व ‘कबीर सिंग’ या सिनेमात देखील काहीश्या परस्पर विरोधी भूमिका मांडलेल्या आहेत असेही मला वाटले. पण ते सिनेमा आहेत, खरं आयुष्य मात्र बरेच वेगळे असते. आता यात बरोबर काय आणि चूक काय हे संबंधित व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणालाही सांगता येणं, किंवा त्यांनी ते तस ठरवणं देखील कठीण असलं, तरीही मला अस वाटत की यातील बरेचसे प्रश्न आपआपसात मोकळेपणाने चर्चा केल्याने सुटू शकतात आणि मतभेद खुपच टोकाचे असतील तर एकमेकांपासून दूर होण्याचा पर्यायाचा देखील वापर करायला काही हरकत नाही.
पण हा पर्याय देखील उपलब्ध नसेल तर? या कौटुंबिक हिंसाचाराचे व अत्याचारांचे बळी लहान मुले किंवा घरातील वृद्ध असतील तर? तर मग मात्र हीच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे – माणसाने माणसाशी माणसासम वागणे.
आरती आमटे, सामाजिक कार्यकर्त्या