ह्या आजारात काही त्रास वेगळे.. काही औषध वेगळी.. हा आजार झाल्यावर काही नियम वेगळे... पण असं काय झालंय की संपूर्ण जग एकदम वर खाली झालं आहे. अस काय झालं की हाडा माणसांची लोक आता दुसऱ्याला वाईट वागणूक देत आहे. व्यवस्था आजारी माणसाला लुटत आहे.
आपल्या घरातील मेलेल्या माणसाला शेवटचा निरोप तरी देता यावं म्हणून जीवाचा आटापिटा होतो. आमच्या कुटुंबात आम्ही पाच जण कोरोना positive झालो. मी, काका-काकू, दोन वहिनी.. घरात दोन छोटी मुलं एक सात महिन्याचं बाळ आणि सात वर्षाची भाची... नशिबाने सुरक्षित राहिली.. नियतीने आम्हांला तेवढा दिलासा दिला इतकंच...
मी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले. त्यानंतर काकू… काकूंना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये शार्दूल नवरे मित्राच्या ओळखीने डॉक्टरांशी बोलले. आधी काकूच सिटी स्कॅन केलं त्यात lungs 80% infection झाल्याचं स्पष्ट झालं... त्यांनी काकूंना कोविड रुग्णालयात शिफ्ट करायला सांगितलं.. मग बेडसाठी धावपळ.. माझा सहकारी निनाद त्याची आई ज्या हॉस्पिटल मध्ये होती तिथे काकूंना नेता येईल असं निनाद म्हणाला..
तेव्हा एकनाथ शिंदे कार्यालयातील मंगेश चिवटे मित्राने मदत केली... हॉस्पिटल मधील डॉ.शिंदे यांना connect करून दिलं.. त्यांनी काकूंचे रिपोर्ट मागितले.. रिपोर्ट त्यांना whatsapp केले.. त्यांनी तेव्हांच सांगितलं परिस्थिती गंभीर आहे. आम्ही सर्व प्रयत्न करू. कोविड हॉस्पिटलमध्ये बेड मिळायला उशीर होत होता, काकू तात्पुरत्या ज्या हॉस्पिटल मध्ये होत्या तिथे त्यांना शिफ्ट करा सांगत होते. सगळीकडून अडकल्यासारखं झालं होतं.. ते चार ते पाच तास आम्ही टेन्शन मध्ये होतो!
शेवटी बेड मिळाला काकू कोविड हॉस्पिटल मध्ये शिफ्ट झाल्या.. एकनाथ शिंदे हा माणूस पालकमंत्री या शब्दाला अक्षरशः जगत आहे. त्यांना जेव्हा कळलं कोरोना झाला आहे.. त्यांनी फोन वरून विचारलं काय झालं, त्यांना इतकंच सांगितलं काकूसाठी काहीतरी करा, त्या सिरीयस आहेत.. त्यांनी लगेच डॉक्टरांशी चर्चा केली.. डॉ.शिंदे यांना कल्पना दिली.. काकू जशी हॉस्पिटल मध्ये आली, तिच्याशी थेट Ambulance मध्ये जाऊन भेटले डॉक्टर भेटले म्हणाले "आई मी तुमचा तिसरा मुलगा आहे, तुला काहीही झालं नाही.. 5 दिवसात बरं करून सोडणार"
काकूंवर नीट उपचार सुरू झाले.. त्यात काकांना ताप आला... काका हार्ट पेशन्ट, आधी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. precaution म्हणून त्यांना पण हॉस्पिटल मध्ये न्यायचं होत.. सगळीकडे हॉस्पिटल फुल्ल.. बेड मिळवण्यासाठी प्रयत्न.. संदेश प्रभुदेसाई यांनी त्यावेळी मदत केली.. कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड आहेत सांगितलं.. मध्यरात्री एकच्या आसपास काका ऍडमिट झाले.
काका आणि काकू दोघे ही ऍडमिट झाल्यामुळे घरच्यांच्या सगळ्यांची टेस्ट करायचं आम्ही ठरवलं.. मी हॉस्पिटल मधून दोन्ही दादा डोंबिवलीत कॉर्डिनेट करत होते. एकनाथ शिंदे यांच्या टीमने विशेषतः मंगेश चिवटे, वन रुपी क्लीनिक यांनी घरच्यांच्या जेव्हा टेस्ट साठी करायची होती तेव्हा मदत उपलब्ध करून दिली.
घरातले दोन्ही लहान मूल, दादा निगेटिव्ह आले पण दोन्ही वहिनी positive.. दोन्ही वहिनी म्हणजे संपूर्ण घराचा कणा.. घरातील संपूर्ण व्यवस्था, कोणाचा आजरपण, व्यवहार सगळं वहिनी बघतात.. बाळ तर सात महिन्याचं.. दुसरी सात वर्षाची भाची.. दोघे आपल्या आई पासून दूर झाली.. त्यांना आईपासून दूर करायची वेळ आली..
बाळाला आणि लेकीला सोडून जाता येऊ शकत नाही म्हणून दोन्ही वहिनींनी निर्णय घेतला घरातच राहतो, इथे उपचार करतो.. मग केडीएमसी मध्ये तिथल्या वॉर्ड ऑफिसर, मेडिकल ऑफिसर सगळ्यांना कळवलं,विनंती केली.. आमदार रवींद्र चव्हाण यांनी घरीच उपचारासाठी मदत केली.. वहिनीचे आत्या -मामा डॉक्टर आहेत त्यांनी फोनवरून औषध, ट्रीटमेंट यावर लक्ष ठेवले. त्या आत्या आणि मामांनी औषधापासून काका-काकू यांची ट्रीटमेंट काय नेमकं सुरू आहे, सगळं नीट आहे हे सांगून दोन्ही दादांना धीर दिला...
दोन्ही दादा हॉस्पिटल आणि घर सांभाळत होते.. दादांच्या बिल्डिंगमध्ये कोविड रुग्ण कळल्यावर आधी त्यांना त्रास झाला नंतर स्वतःहून एक मैत्रिणीने जेवण पाठवलं मग इतर घरातील महिला तयार झाल्या प्रत्येकाने घरात जेवण पाठवायला सुरुवात केली.. आधी जे टोमणे मारत होते त्याच्या कुटुंबात कोणी कोव्हिडं positive आले तर मग त्यांनी दादांना फोन करून काय करता येईल याची माहिती घेतली.
ह्यात काकू बऱ्या झाल्या.. त्या घरी आल्या.. डॉ.शिंदे यांनी देवदूत म्हणून आम्हांला मदत केली... काका पण 2 जुलैला घरी येतील अस हॉस्पिटलने कळवलं.. आम्ही सगळे निवांत होतो.. दरम्यान मी पण नीट होऊन घरी आले.
काकू, वहिनी negative आल्या..फक्त काकांची वाट पाहत होतो.. काका घरी येणार म्हणून दादा हॉस्पिटल मध्ये विचारायला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं काल तुमच्या वडिलांना mild heart attack येऊन गेला.. म्हणजे काकांना heart attack आला हे एक दिवसाने आम्हाला कळलं, परत टेन्शन वाढलं. हॉस्पिटल नीट communication करत नव्हतं.. काकांशी व्हिडीओ कॉल ते पण दोन मिनिटं.. काका नीट बोलू शकत नव्हते, काकांनी टेन्शन घेतलं होतं.. मला हॉस्पिटल मधून घेऊन जा इतकंच बोलत होते..
काका दादाला सारखे बोलवत होते पण कोविडमुळे दादा भेटू शकत नव्हता, दुरून काचेतून काकांना फक्त दादा एक दोनदा बघून आला.. दोन मिनिटं व्हिडीओ कॉलमध्ये काहीच नीट बोलणं होत नव्हतं.. हॉस्पिटल मध्ये जाताना काका दादाला म्हणाले शिर्डीला जायचं मला.. म्हणून साई बाबांचे फोटो दाखवले, बाळाला व्हिडीओ कॉल मध्ये दाखवलं.. काकांची तब्येत अजून ढासळली...शेवटी cardiac arrest झाल्याचं हॉस्पिटलने सांगितलं. ती रात्र अस्वस्थ करणारी होती.. सकाळी सातला काका गेल्याचा फोन आला.. काकू सिरीयस होती पण ती घरी आली, ज्या काकांना विशेष त्रास झाला नव्हता त्यांना आम्ही गमावलं...
घरात नुसतं आजारपण, पाण्यासारखा पैसा गेला.. हॉस्पिटलची लाखांची बिल.. पण साधं रुग्ण आणि कुटुंबियांना हॉस्पिटल नीट वागणूक देत नाही.. रुग्ण कसा आहे, याची वेळीच माहिती हॉस्पिटल कुटुंबियाना देत नाही...
जेव्हा माणूस रुग्णालयात असतो, तेव्हा त्याला आपली माणस बघायची असतात,त्या बेडवर प्रचंड एकटेपणा येतो.. भीती वाटते... किमान आपल्या माणसांशी बोलल्यावर धीर येतो, आधार मिळतो.. पण हॉस्पिटल हा विचारच करत नाही... 'संवाद' ही मोठी गोष्ट आहे... तीच थांबली की रुग्ण हार मानतो..
काकांना शेवटचा नीट निरोप देता यावा, म्हणून काहींनी मदत केली.. कुटुंबियांना अशा काळात सांगणे की तुमचा भाऊ गेला लांबून त्याला निरोप द्या, मुलाला सांगणे की बाबांना तू आता मिठी मारू शकणार नाही.. असाच नमस्कार कर.. काकूला सांगणे आता नवरा गेला लांबून बघ त्यांना हे कठीण असतं...
आपला माणूस गेला ह्याच दुःख पण तुम्ही करू शकत नाही कारण साधी शववाहिनी त्यात ही पैसे कमवण्यात लोक संधी सोडत नाही... कुटुंबाला सावरायच की या स्वार्थी लोकांच्या तावडीतून आपल्या माणसाचं पार्थिव सोडवून नीट अंत्यसंस्कार व्हावे म्हणून प्रयत्न करायचे.. हे सगळं प्रचंड थकवणार आहे.. माणूस म्हणून मारणार आहे...
आपला माणूस गेला यापेक्षा त्या माणसाला शेवटचा नीट निरोप देऊ शकलो नाही ही कोरोनने दिलेली सगळ्यात क्रूर शिक्षा आहे.. माणसाची काय शेवटची इच्छा असते मंदिरात जायचं होत ती इच्छा ही पूर्ण करू शकलो नाही.... कोरोनाने आम्ही आमच्या घरातला एक माणूस गमावला... या काळात काहींनी त्रास दिला, आरोप केले, टोमणे मारले.. पण त्यापेक्षा अनेकांनी ओळखीच्या अनोळखीच्या लोकांनी मदत केली, धीर दिला, रात्री बेरात्री फोन उचलले...
त्या सगळ्यांचे आभार.. ( कोणाचा उल्लेख राहिल्यास माफ करावे)
पुराणिक कुटुंब म्हणून आम्ही ऋणी आहोत...
- रश्मी पुराणिक, पत्रकार