फेमस फूड शेफ अस्मा खान, दूसरी बेटी!
फूड शेफ म्हटलं की डोळ्यांसमोर असंख्य पुरुष उभे राहतात… परंतु महिला शेफ यांची फारशी चर्चा होताना दिसत नाही… अशाच एका दुसरी बेटी म्हणून घरात ओळख असलेल्या अस्मा खानची फूड शेफ बनण्याची कहानी… दुसरी बेटी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्यांच्यासाठी अस्मा ने सुरू केलेलं कार्य नक्की जाणून घ्या भक्ती बिसुरे यांच्याकडून
फूड शोज पहाणं ही माझ्यासाठी थेरपी आहे. त्यामुळे नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन घेताना त्यावर ढीगानी फूड शोज आहेत याची आधी खात्री करुन घेतली होती. आता जेव्हा जेव्हा काही बघावंसं वाटतं तेव्हा नेटफ्लिक्सवरचे फूड शोज दिमतीला असतात… चॅाईस तर इतका आहे की विचारायलाच नको. काल असंच बसल्या बसल्या मी लिस्टमध्ये ॲड करुन ठेवलेले शोज आणि त्यांची डिस्क्रिप्शन्स चाळत बसले असताना 'शेफ्स टेबल' मध्ये मला अस्मा खान हे नाव दिसलं… नाव अर्थातच ओळखीचं होतं, त्यामुळे सिरीजचा म्हणुन असलेला सिक्वेन्स बाजूला ठेवला आणि आधी अस्माचा एपिसोड बघायचं ठरवलं.
फूड शोजची आवड असल्यामुळे एकुणच 'शेफ्स' ही जमात माझ्या 'सेलिब्रिटी' लिस्टमध्ये नेहमी वर असते. संजीव कपूर हा माझा 'फॅारेव्हर' अत्यंत लाडका शेफ आहे. त्याच्या पुढचे मागचे रेस्टॅारंटीअर जिग्ज कालरा, शेफ अतुल कोचर, विकास खन्ना, रणवीर ब्रार हे माहिती आहेतच. I respect them immensely. ॲास्ट्रेलियाचा रिक स्टेन या आजोबाच्या सध्या मी आकंठ प्रेमात आहे… (काही काळासाठी तरी त्याने संजीव कपूरला टफ फाईट दिलीये, त्याची इंडिया सिरीज बघितली नसेल तर जरुर बघा) पण 'शेफ' म्हटलं की जी नावं आठवतात त्यात हे सगळे पुरुषच आठवतात. शेफ बायकांची नावं आठवायला जरा ताण द्यायलाच लागतो मेंदूला… तरी आपली गाडी तरला दलाल, मॅगी बेअर, मधुर जाफ्री, नायजेला लॅासन यांच्या फार पलिकडे जात नाही. पण… या सगळ्यांच्या पंक्तीत बसावं असंच नाव आहे, अस्मा खान हिचं! अस्मा साधारणशी माहिती होती, पण 'शेफ्स टेबल' चा तिचा एपिसोड बघुन मी 'पहिल्या भेटीत' तिच्या प्रेमात पडलीये!
अस्मा खान म्हणुन गुगल केलं तर ब्रिटिश शेफ अशी तिची ओळख विकीपिडिया करुन देतो. अस्मा मूळची कलकत्त्याची. मुस्लिम कुटूंबातली. तिच्या आई-वडिलांची दुसरी मुलगी! अस्मा शिक्षणानं कायद्याची पदवीधर आहे. तिच्या घराण्यातली पहिली पी. एचडी. होल्डर आहे. पण तरी, आज वयाच्या पन्नाशीनंतरही 'दूसरी बेटी' ही ओळख अस्मा विसरली नाहीये.
अस्मा सांगते, त्याकाळी पहिलं अपत्य मुलगी असणंच स्विकारलं जाणं अवघड. मुलीच्या जन्मानंतर आमच्याकडे (भारतात) सन्नाटा असे. मिठाई नाही. फटाके नाही. सेलिब्रेशन नाही. फक्त तिच्या लग्नाच्या खर्चाचं ओझं अगदी जन्माच्याक्षणापासुन आई-वडिलांच्या डोक्यावर… तशात मी दुसरी मुलगी. त्यामुळे माझ्या जन्मानंतर आई ढसाढसा रडली. मी मात्र, नेहमी स्वत:ला आईचा मुलगा मानत टॅामबॅाय होऊन राहिले.
लग्न करायच्या वयात 'माझ्याशी लग्न' ही कल्पनाच नको म्हणुन माझं लग्नही जमायची चिन्हं नव्हती. त्यामुळे मला कॅालेजात घातलं. कॅालेज पूर्ण झाल्यानंतर स्थळ आलं. मुलगा ॲाक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिकवत होता. नकाराचा प्रश्नच नव्हता. लग्न झालं आणि मी थेट लंडनला आले. पुढे मग नवं नातं, परका देश, एकटेपणा, त्यातुन नैराश्य, त्यातुन सगळं नको-नको होणं - हे जे जे स्वाभाविकपणे सगळ्यांच्या बाबतीत घडतं तेच अस्माच्याही बाबतीत घडलं. इथुन पुढचा तिचा प्रवास इंटरेस्टिंग आहे. लंडनच्या रस्त्यांवर एकटीच फिरत असताना एकदा 'पराठे भाजण्याचा'
वास तिच्या नाकात शिरला. ते दार वाजवावं असं वाटुन खुप वेळ तिथे ताटकळली आणि धीर झाला नाही म्हणुन हताश होत शेवटी घरी गेली. त्यावेळी तिला नेमकं काय बिघडलंय हे कळलं - ती सांगते - मला घरच्या, आईच्या हातच्या जेवणाची आठवण येत होती, पराठे, बिर्याणीची आठवण येत होती… आणि मला मात्र स्वयंपाकच करता येत नव्हता!
त्यानंतर तडक भारतात येत अस्मानं आई आणि बहिणीकडे स्वयंपाकाचे धडे गिरवले. लंडनला गेल्यानंतर तिचं 'कुकिंग' बघुन नवऱ्याला धक्काच बसला! मग आजुबाजुच्या दक्षिण आशियाई बायकांशी तिने ओळख करुन घेतली. त्यांना चहाला बोलवलं… (by that time I learnt to make seriously a good chai… हे तिचं वाक्य ऐकलं आणि मग आपल्याला तर किती काय काय येतं असं वाटुन हुरळलेच मी) या बायका कोणी मेड, कोणी नॅनी, कोणी अजुन काही म्हणुन लंडनमध्ये काम करत होत्या. एकत्र भेटी, गप्पा, खाणंपिणं यात सगळ्यांचंच एकमेकींशी जमलं. अस्माचा हात किचनमध्ये चांगलाच बसला होता. त्यामुळे 'घरका खाना' हा सगळ्यांना बांधुन ठेवणारा घटक झाला!
एकमेकींसाठी जेवण रांधतानाच कुणी तरी तिला 'सपर क्लब्ज' बद्दल सांगितलं. सपर क्लब्ज म्हणजे थोडक्यात मेनू सांगुन घरी लोकांना जेवायला बोलवायचं… आणि त्या बदल्यात पैसे घ्यायचे! अस्मा आणि तिच्या मैत्रीणींचं सपर क्लब हिट झालं. पुढे घरी नवरा-मुलांची प्रायव्हसी डिस्टर्ब होतेय म्हणुन तिला ते बंद करावं लागलं. त्यातून एका पबच्या किचनमध्ये तिचं 'पॅाप अप रेस्टॅारंट' सुरु झालं. तिथुन थेट 'दार्जिलिंग एक्सप्रेस' हे तिचं स्वत:चं रेस्टॅारंट! लॅा-पी. एचडी. झालेली बाई लोकांना जेवायला घालणार म्हणत कुटूंबानं नाकं मुरडली पण अस्माला त्यानं काही फरक पडला नाही! तिच्या मैत्रीणींनी सुरुवातीला असलेल्या नोकऱ्या सांभाळून 'दार्जिलिंग एक्सप्रेस' मध्ये योगदान दिलं. पुढे मात्र त्याही फुलटाईम शेफ झाल्या!
अस्मा म्हणते, हे रेस्टॅारंट जेवढं माझं, तेवढंच त्यांचं! माझं घर माझ्या मिळकतीवर चालत नाही, पण त्यांचं तसं नव्हतं. त्यामुळे त्यांनी असलेल्या नोकऱ्या सांभाळून इथे यायचं असं सुरुवातीलाच ठरवलं. पुढे मग व्याप वाढला. बिझनेसमध्ये आम्ही पाय घट्ट रोवलेत याची खात्री झाली आणि त्यांनी पूर्वीच्या नोकऱ्या सोडल्या. माझी शेवटची दक्षिण आशियाई मैत्रीण तिची नोकरी सोडून फुल टाईम रेस्टॅारंटमध्ये आली तो दिवस माझ्यासाठी अचिव्हमेंट होता.
सातवे आसमानपर चढून तिथेच निवांत राहावं अशी ही गोष्ट असली तरी 'दूसरी बेटी' ही ओळख अस्मा विसरली नाहीये.. तिनं आता 'सेकंड डॅाटर फंड' सुरु केलाय. घरात जन्माला आलेल्या दुसऱ्या लेकीसाठीही फटाके वाजावेत, मिठाई वाटली जावी आणि तिचाही वाढदिवस धुमधामसे साजरा व्हावा म्हणुन हा फंड तिनं सुरु केलाय.
आणि खाणं-खिलवणं तर आहेच… भारतीय पदार्थ खायला ब्रिटिश लोक अस्माकडे येतात. पुचका अर्थात पाणीपुरी, छोले भटुरे, बिर्याणी, टिक्क्या, हलवा, शीरा आणि किती काय काय… खात खात, चहा पित… अस्मा सांगते त्या खाद्यपदार्थांच्या, परंपरांच्या गोष्टी ऐकत ऐकत लोकं बसतात आणि पुन्हा पुन्हा येत राहतात.
'शेफ्स टेबल' चा एपिसोड बघुन संपतो तरी अस्मा डोळ्यांसमोरुन हलत नाही. ती एक प्रसंग सांगते. तिची बहीण आणि ती कार्यक्रमासाठी तयार होतायेत. बहीण एक छान कानातलं तिच्या हातात देत म्हणते, हे घाल.. तू प्रिन्सेस दिसशील. अस्मा लगेच सांगते, I am a princess. I don't have to wear all this to show others that I am a princess! अस्मानं या क्षेत्रातली कुठलीही डिग्री घेतलेली नाही. त्यामुळे रुढार्थानं ती शेफ नाही. मिशेलिन स्टार सारखी कुठलीही ओळख तिच्याकडे नाही. पण अस्माचं रेस्टॅारंट हा लंडनमधल्या बातम्यांचा विषय ठरतो. फुड ब्लॅागर्स आणि सोशल मिडिया तिचं कौतुक करताना थकत नाहीत. अस्मा आता 'सेलेब' आहे. तिचं शेफ असणं सिद्ध करायला तिला कुठल्याही मिशलिन स्टार आणि डिग्रीची गरज नाही, she knows she is a chef & a star!
अस्माची ही पहिली भेट मला समृद्ध करणारी आहे. यापुढे शेफ्सच्या नावांमध्ये मी हिचं नाव 'मिस' करणं शक्य नाही!
भक्ती बिसुरे
पत्रकार