विट्याकडच्या एका तमाशातली पांढरी शिपूर बाई जगनने जेव्हा काढून पहिल्यांदा मातंग वस्तीत आणली तेव्हा तिला बघायला आक्खा गाव फुटलेला. आणि जेव्हा ती बाई सोडून गेली तेव्हा दारू पिऊन एकटा पडलेला घायाळ जगन बघायला काळं कुत्रं सुद्धा फिरकलं नाही जगनच्या घराकडं. आता कदाचित तुम्ही म्हणाल की, हे काय! जगनने बाई आणली काय. माघारी गेली. सगळं चार ओळीतच. पण हीच खरी माझी अडचण आहे. जगनच्या गोष्टीची सुरुवात नेमकी कुठून आणि कशी करावी केवळ यासाठी मी आयुष्यातील बरीच वर्षे वाया घालवलीत. गेली कित्येक वर्षे त्याला मनाच्या तळात बांधून ठेवूनही खाली बसायला तयारच नाही जगन. कित्येक वेळा लिहिण्याचा प्रयत्नही केला जगनवर. पण धाडसच झालं नाही? तरीही जगनवर न लिहिता आपण भलत्याच शहाणपणाच्या गोष्टी सांगत राहिलो तर जगनवर तो अन्याय ठरेल? आणि म्हणूनच मोडकी तोडकी का होईना पण गोष्ट सांगणार आहे जगनची. मनाच्या विहीरीत खोल तळात बांधून ठेवलेला जगनचा देहरुपी दगड वर काढून फेकून देणार आहे तुमच्या डोक्यांच्या दिशेने.
तर जगनचं संपूर्ण नाव किंवा आडनाव तुम्हांला सांगून काहीच उपयोग नाही. जगन्या मांग या नावाची भक्कम कवचकुंडलं तो जन्मताच परिधान करून कधीतरी गावच्या मातंग वस्तीत उगवून वर आला होता. सकाळी उठायचं. ओढ्याला जायचं. खसाखसा घायपात कापायचं. नदीच्या एखाद्या डोहात आणून भिजत घालायचं. कधीतरी ते बाहेर काढून सुकवून त्याचा वाक काढायचा. लाकडी फिरक्या घेऊन त्याच्या दोऱ्या विणायच्या आणि गावगाड्यात जनावरांचे गळे बांधायला द्यायच्या. असलं वडलोपार्जित व्यवसायातलं जगननं काहीच केलं नाही. माणसं सांगतात, जगन्या लिहा वाचाय पुरता शाळेत गेला होता. नंतर शाळा सुटल्यावर गावात त्याने पोटापाण्यासाठी अनेक उद्योगधंदे केले. कुणाच्या गुऱ्हाळवर जाळ घालायचं काम केलं. तलावाच्या कामावर मुरूम खोदण्याचं काम केलं. अनवाणी पायानं वड्या ओघळीने जळण काटुक गोळा करीत हिंडला. काम नसलं की दिवस दिवसभर नदीच्या एखाद्या डोहात जाऊन मासे धरण्याचे काम तो करायचा. इतर फावल्या वेळात गावातल्या पोरासोबत चिंचा बोरं हुडकण्याचा त्याचा सिझनेबल धंदा सुरू असायचा. लहानपणापासूनच तो असाच वाढत गेला.
पण आम्हाला कळू लागल्या नंतर आम्ही जो जगन्या पाहिला तो जोंधळ्याच्या ताटा सारखा लांबलचक किडमीडित देहाचा. अंगावर पांढरट सदरा आणि खाली लांबसर लेंगा. केस म्हणाल तर मानेवरून खाली वीतभर लांब पसरलेले. अगदी वेणी घालता येईल असे. त्या केस वाढविण्याला कारणही तसंच होतं. जगन तमाशात काम करायचा. हो तमाशात. चैत्र निघाला की खेडोपाडी यात्रांचा हंगाम सुरू व्हायचा. खेड्यातील या यात्रांमध्ये तमाशा हेच मुख्य आकर्षण. संगीतबारीचा आणि ढोलकीफडाच्या तमाशांचे फड गावोगावी दिवस रात्र रंगू लागायचे. तमाशा खेड्याची लोककला, परंपरा आणि संस्कृती. पठ्ठे बापूराव, विठाबाई भाऊ नारायणगावकर, मालती इनामदार, काळू-बाळू, रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर, मंगला बनसोडे, दत्ता महाडिक, माया तासगावकर अशी अनेक मंडळी या लोककलेचे शिलेदार. तर काही वारसदारसुद्धा.
तमाशाच्या या खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, रंगबाजी, फार्स आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते. त्यातील गण म्हणजे विशेषता शाहीर गण गायचा. आणि त्याचे साथीदार चढ्या आवाजात ध्रुपद आळवायचे. गण संपला ढोलकी घुमु लागायची. ढोलक्या घामाघूम झाला की पायात चाळ बांधून आणि स्टेजच्या पाया पडून नर्तकींचा नाच सुरू व्हायचा. नंतर सुरु व्हायची गौळण आणि बाजूला कृष्णाच्या लीला. मग सोंगाड्या स्त्री वेशात मावशी बनून आला की तमाशाला खरा रंग चढायचा. जगन्या ढवळपुरीकराच्या तमाशात हेच सोंगाड्याचं काम करायचा. गोपीका दूध, दही, लोण्याचे हंडे घेवून मथुरेच्या बाजाराला निघू लागल्या की वाटेत अर्धवट बंडीवर पातळ आणि ब्लाऊज नेसून पेंद्याचं रूप घेऊन जगन आडवा येणारच. त्याच्या छातीकडे बघून सगळ्या गवळणी ख्याss ख्याss करून हसायच्या आणि विचारायच्या, मावशे तुझी एक बाजू फुगीर आणि दुसरी बाजू आत कशी गं गेलीया" तर जगन्या लगेच उत्तर देणार, अगं माज्या एका बाजूवर ईज पडलीया बाई. यावर सगळ्या प्रेक्षकात हशा पिकणार असेच अनेक द्विअर्थी संवाद चालायचे. माणसं हसून हसून बेजार होऊन जायची. हास्याच्या लाटा मध्यरात्रीपर्यंत सोडत जगन्या हसवत राहायचा. त्यानंतर सवालजवाब होत. शृंगारिक लावण्या व्हायच्या.
मध्यरात्र उलटून गेली की शेवटी तमाशाचा आत्मा म्हणजे वग सुरु व्हायचा. सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक कथा, नाट्य रूपाने सादर केली जायची. मघाचा सोंगाड्या बनलेला जगन्या आता चढलेल्या रात्रीसोबत वगामध्ये महाराजांचा शिपाई झालेला असायचा. आणि लोकांना हसवत हसवत वग पुढे सरकवत न्यायचा. पहाटेपर्यंत चालणाऱ्या वगाचा शेवट गावकऱ्याना काहीतरी संदेश देऊन द्यायचा. तमाशा संपलेला असायचा. लोकं जगन्याला डोळ्यापुढे सोबत घेऊन निघून जायची. आणि जगनचे तमासगीर रुपी बिऱ्हाड टेम्पोत बसून पुढच्या यात्रेकडे धावू लागायचं.
जगनचं तमाशाचं हे काम हंगामी चालायचं म्हणजे वर्षातलं पाच-सहा महिनेच. त्यानंतर तमाशात सोंगाड्या, राजा, शिपाई बनलेला जगन्या गावात अन्नाला महाग व्हायचा. या काळात तो रोजंदारीवर कुठेतरी कामाला जायचा. पण पावसाळी दिवस असल्याने त्याच्या हाताला जास्त काम मिळायचं नाही. कधी वडिलांच्या कामात तो मदत करायचा. इतर फावल्या वेळेत त्याची नदीवर मासेमारी ठरलेलीच.
जगनची जवानी संपत चालली होती. चाळीशी ओलांडली होती तरी त्याच्या लग्नाचा पत्त्या नव्हता. अशातच फडातील प्रसिद्ध नर्तिका चंद्राचा जगनवर जीव बसला. तिच्यातील नर्तिका जगनला घायाळ करून करू लागली. जगनच्या आत बसलेला सोंगाड्या तिला स्वप्नांच्या दुनियेत फिरवू लागला. रात्री फडाच्या मुक्कामी एका अंथरुणात दोन जीव विसावू लागले. दोघांच्या मनाला द्राक्षाच्या वेलीसारखे सुखाचे घस लोंबकळू लागले. आणि एक दिवस जगनने तिच्या गळ्यात चार काळे मणी बांधले. त्या वर्षीचा तमाशाचा सिझन संपल्यावर येताना तो पांढरी शिपूर देखणी चंद्रा घेऊन गावात उतरला. बघता बघता बातमी मातंग वस्तीतून साऱ्या गावभर फुटली आणि एकच कल्लोळ झाला. बाई बघायला आक्खा गाव फुटलेला. कुणी म्हणू लागलं, जगन्या मांगानं लगीन केलंय. कुणी म्हणू लागलं, जगन्यानं तमाशातली बाई काढली. कुणी म्हणू लागलं, बाई लई नखर्यांची हाय, दोन पोरांची तरी असल. तर कुणी म्हणालं, बारा गावचं पाणी प्यालेली रांड जगन्यानं ठेवली? गावाची सोयच केली की म्हणायची? तर कुणी आणखी काय काय.
महिना उलटला असेल. जगनच्या सोंगाडी पणाला भाळून त्याच्याशी लग्न करून आलेली चंद्रा एका सकाळी त्याला न सांगताच अचानकच गायब झाली. पुन्हा माणसं म्हणू लागली, बारा गावचं पाणी पिलेली आणि रांडपण भोगलेली बाय अशी कुणा एका माणसाबर नांदती व्हय. तर कुणी म्हणालं, नांदून पोटाला काय दगडं खाल्ली असती काय? या काळात मात्र त्याच्याकडे कुणीही माणूस फिरकलं नाही. घायाळ झालेला जगन एकाकी पडला. याच वेळी तो दारूच्या आहारी गेला. पुढे बरेच दिवस तो कुणाला दिसला नाही आणि एक दिवस गावातून अचानक तोही गायब झाला. पुन्हा तो गावाकडे फिरकला नाही. गावही हळूहळू जगनला विसरून जात होतं. पण तो आजूबाजूच्या खेड्यात एखाद्या तमाशाच्या फडात माणसांच्या नजरेला दिसायचा. जवळचा कोणी भेटला तर खिशात हात घालायचा. मिळतील तेवढे पैसे बाहेर काढायचा. म्हणायचा, एवढं आय बापाला दया माज्या खर्चाला हुत्याली.
मात्र दहा वर्षानंतर पन्नाशी गाठलेला जगन्या पुन्हा एक फडातील लावण्या गाणारी काळी सावळी दुसरी बाई घेऊन गावात परतला. ही होती मंगला. त्याच्याच वयाची. नवऱ्याने सोडलेली. जगायला आधार म्हणून त्याची पाठ धरून आलेली. पुन्हा गावातली डोकी जवळ आली. तोंडं हलू लागली. चर्चांना पुन्हा उधाण आलं. रिकाम्या डोक्यांना चघळायला आयता विषय मिळाला. कुणी काय तर कुणी नवीनच काय म्हणू लागलं. या मंगलाने जगन्या सोबत दोन तीन वर्ष संसार केला. याच काळात त्याचे थकलेले आईबाप निघून गेले. जगन्या तमाशाच्या सीझनमध्ये मंगलाला सोबत घेऊन पोट भरण्यासाठी फडात जात होता. माघारी परतत होता. पण काय झालं कुणास ठाऊक. एका वर्षी सिझन संपून येताना मंगला त्याच्यासोबत आलीच नाही. जगन्याचा हाही संसार फार काळ टिकला नाही. जगन पुन्हा एकाकी पडला. एकाकीच राहू लागला. त्याच्या चुलत भावाकडे जेवू खाऊ लागला. त्याच्यातला सोंगाड्या कधीच इतिहास जमा झाला.
जगनचं वय वाढत गेलं. वाढत्या वयानं त्याला तमाशाच्या फडात पहिल्यासारखी ना सोंगाड्याची भूमिका मिळत होती. ना राजाची. ना शिपायाची. जगन केवळ आतडी ओली ठेवण्यासाठीच आता फडात तुणतुणे वाजवू लागला होता. तुणतुणेच होतं त्याच्या जगण्याचा आधार. तुणतुणेच बनलं होतं पोट भरण्याचं साधन. तुणतुण्याशीच आता लागलं होतं लगीन. पण काळानुसार जगन थकत गेला आणि तमाशाही बदलत गेला.
एक काळ होता. जेव्हा तमाशा ही फक्त एक लोककला होती. लावणी हा प्राण होता. वग हा आत्मा होता. त्यावर उपाशी का होईना पण कलेने भरलेले पोट घेऊन वावरणारे जगन सारखे सोंगाडे होते. ही कला जिवंत ठेवण्यासाठी उपाशी पोटांच्या खालची कंबर हलवणाऱ्या चंद्री सारख्या नर्तकी होत्या. छम छम वाजणाऱ्या त्यांच्या घुंगरांना दिवस रात्र खेळवणारे भक्कम पाय होते. पण काळाच्या तडाख्याने तमाशाचा ओर्केस्ट्रा केला. खेडोपाडच्या पंचक्रोश्या पहाटेपर्यंत दणाणून सोडणारा "वग" त्याने नामशेष केला आणि त्याची जागा आक्राळ विक्राळ धिंगाणा घालणाऱ्या गाण्यांच्या मिठीत गेली. ढोलकी, डफ, चौंडकं, टाळ, तुणतुणे, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रँगल ही वाद्ये तमाशाची सुरवात करण्यापुरतीच हातात उरली आणि जगन सारख्या वयस्क माणसांच्या हातातील काम कायमचं निघून गेलं. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.
आता बराच काळ उलटलाय. जगन्या आता वार्धक्याकडे झुकलाय. कधी मधी हातात पिवळं कार्ड धरून घरातून बाहेर पडलेला जगन्या दाताच्या कण्या होईपर्यंत उभा दिसतो राशन दुकानापुढच्या लाईनीत. भर उन्हाची त्याची नजर अधिकच होत जाते अंधुक अंधुक. रांग सरल्यावर वजन काट्यावरचं घमेलं पिशवीत रिकामं होत जाताना क्षणभर उजाळून जातात त्याच्या चेहऱ्यावरच्या दाही दिशा. चुलत भावाच्या उंबऱ्याला धान्याच्या पिशवीतली रास ओतून वाट बघत राहतो पोटात भाकरी पडण्याची. मातंग वस्तीतल्या समाज मंदिराच्या पायरीवर सकाळच्या सुर्याची उन्हं अंगावर घेत जगण्याची अशी कोणती उमेग बाळगून बसत असेल तो? आयुष्यभर कलेची सेवा करून तमाशा जगलेला जगन्या मांग त्याच्या पडक्या घरात बीड़ीचा धूर हवेत सोडून आयुष्यभर पाहिलेली स्वप्ने आता उतारवयात जाळून घेत असेल काय? नक्की कुणासाठी जगत असेल जगन्या मांग? कोणत्या आशेवर तो अजून जिवंत राहिला असेल? सोडून गेलेल्या त्याच्या दोन बायका परत येतील ही भाबडी आशा अजूनही त्याच्या मनात पालीसारखी चुकचुकत असेल का? की तमाशा फड मालकांनी बुडवलेला पगार मनिऑर्डरने कधीतरी येईल म्हणून तो पोस्टाच्या समोरुन अजून येरझाऱ्या मारत असेल? मला माहीत नसलेल्या अशा कोणत्या तरी एका बळावर तो नक्की जगत असला पाहिजे, तसं नसेलच तर मग रोज रात्री उशिरापर्यंत समाज मंदिराच्या पायरीवर अंधारात बिड्या जाळत जिवंत सापसारखा वळवळताना का दिसत असेल तो? मंडळी तुम्हाला माहीत असेल तर सांगा मग तुम्ही? कुणी विझवली जगन्या मांगाच्या घरातील चूल? त्याच्या सोडून गेलेल्या दोन्ही बायकांनी की त्याने प्रेम केलेल्या कलेने? की अजून कोणी...???
-ज्ञानदेव पोळ